“कविता ही माणसाला जगण्याची ताकद देते आणि जीवन समृध्द करते” असे उद्गगार सुप्रसिध्द कवी व गीतकार दीपक शेडगे यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेने नुकत्याच आयोजित केलेल्या “पर्जन्यरंग” या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना काढले. “कविता हा माझ्या आत्म्याचा उद्गगार असून कवितेच्या माध्यमातून मी स्वतःचाच शोध घेत असतो आणि आजूबाजूच्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीचा, सभोवतालच्या निसर्गाचा तसेच माणसांच्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा मी कवितेतून प्रयत्न करीत असतो” असेही काव्य लेखनामागील आपली भूमिका विशद करताना ते म्हणाले.
विरार, वसई पासून कल्याणपर्यंत विविध भागातून सुमारे ३० ते ३५ कवी व कवयित्रींनी प्रस्तुत “पर्जन्यरंग” काव्य संमेलनात पावसाच्या कविता वाचून पावसाच्या विविध रंगछटा सादर केल्या.
उपस्थित रसिक प्रेक्षकांनी त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कोमसापचे केंद्रिय संमेलन समन्वयक व कोपसाप मुंबई जिल्हा समितीचे सल्लागार रवींद्र आवटी हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. कवयित्री, गीतकार गौरी कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तर कोमसाप मुंबई जिल्हा अध्यक्षा, लेखिका, प्रकाशिका लता गुठे, दादर शाखेचे माजी अध्यक्ष, कवी, बाल साहित्यिक सुर्यकांत मालुसरे हेही कार्यक्रमास उपस्थित होते. दादर शाखेचे कार्यवाह मनोज धुरंधर यांनी सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
दादर शाखेचे माजी अध्यक्ष सुर्यकांत मालूसरे यांचाही कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाखेचे विद्यमान कार्याध्यक्ष अशोक शिंदे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
छान कार्यक्रम 👌👌👌