‘कुटूंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमामुळे जगप्रसिद्ध असलेले, प्रा विसुभाऊ बापट हे त्यांच्या कार्यक्रमा
बरोबरच त्यांची शालीनता, विनम्रता, शिस्त, प्रामाणिक पणा अशा अनेक विध गुणांमुळे ओळखल्या जातात.
‘कुटूंब रंगलंय काव्यात’ या सदराच्या निमित्ताने आम्हाला त्यांच्या या गुणांचा कधी थेट तर कधी अप्रत्यक्ष लाभ होत आला.
कार्यक्रमासाठी ठिकठिकाणी जावे लागत असूनही विसुभाऊनी एखाद दुसरा अपवाद वगळता सदर लेखनात खंड पडू दिला नाही. एखाद्या दिवशी ते लिहू शकणार नाहीत, असे त्यांना वाटले तर, ते त्याची न चुकता पूर्व कल्पना देत असत. या मुळे प्रसिद्धीचे नियोजन करणे खूपच सुकर होत असे. असो. लिहू तेव्हढे थोडेच.
विसुभाऊनी या सदरासाठी ५३ भाग लिहिले आहेत. आज हा ५४ वा भाग समारोपाचा आहे. विसुभाऊंना उदंड आयुष्य लाभो, त्यांना आणि रसिकांना पुढील जीवनात भरभरून आनंद लाभो, या मनःपुर्वक शुभेच्छा.
– संपादक
मित्रवर्य देवेंद्र भुजबळ साहेबांची व माझी पहिली भेट १९८६/८७ दरम्यान ‘मुंबई दूरदर्शनवर’ झाली.
दूरदर्शन निर्माते श्री. सुधीर पाटणकर यांनी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा एक प्रयोग मुंबई दूरदर्शनवर सादर करण्यासाठी मला नागपूर वरून बोलावून घेतले. तिथेच कार्यरत असलेल्या देवेंद्रजींचा माझा परिचय झाला. त्यानंतर आमच्या तशा विशेष भेटीगाठी कांही झाल्या नाहीत.
पण एक दिवस मी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क कार्यालयात गेलो असताना त्यांनी मला बरोबर ओळखले. देवेंद्रजी मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले आणि आमच्या अतिशय दिलखुलास गप्पा सुरू झाल्या.
भुजबळ साहेब महाराष्ट्राच्या माहिती संचालक पदावर काम करीत होते, प्रचंड लोकसंग्रह असलेल्या साहेबांनी त्यावेळी माझी एक मुलाखत घेतली. ‘ओंकार काव्य दर्शन ‘ हा माझा शालेय कार्यक्रम मी कसा आणि केंव्हा सुरू केला ? सुप्रसिद्ध समाज कार्यकर्त्यां अनुताई वाघ यांच्या आदेशानुसार मी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी बाराशे वर कार्यक्रम कसे विनामूल्य सादर केले ? कसा कसा फिरलो ? याबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली. अशी तयार झालेली मुलाखत त्यांनी प्रथम शासनाच्या महान्यूज पोर्टलवर तर प्रकाशित केलीच शिवाय त्यांच्या पुस्तकांतही अग्रक्रमाने छापली.
माहिती संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनीच मला लिहिते केले आणि ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा संपूर्ण इतिहास मला लिहायला सांगितला. त्यांच्या पोर्टल पेपर मधून प्रत्येक भाग प्रकाशित करायला सुरुवात झाली आणि आजपर्यंत त्याचे त्रेपन्न (५३) भाग प्रकाशित झाले आहेत. आज ५४ वा समारोपाचा लेख प्रकाशित होत आहे.
देवेंद्रजींच्या या पोर्टल पेपर मुळे माझ्या एकपात्री कार्यक्रमाला जागतिक प्रसिद्धी मिळाली आहे.
जगातील मराठी लेखक, कवी, रसिकांपर्यंत माझा एकपात्री कार्यक्रम पोहोचला तो देवेंद्र भुजबळ साहेबांमुळेच !
“सा क व्य विकास मंच” या जगभरातील मराठी साहित्यिकांच्या संस्थेमार्फत अमेरिकेतून आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन कवी संमेलनात’ मला प्रमुख पाहुणा म्हणून मानाचे स्थान मिळाले.
मी सा.क.व्य.संस्थेशी जोडला गेलो ते देवेंद्रजीं मुळेच.!
या पोर्टल वरील माझ्या लेखांमुळे अनेक जुन्या मित्रांशी, जुन्या कवी, लेखकांशी, जुन्या रसिकांशी माझा पुन्हा एकदा नव्याने संपर्क झाला. नव्या दमाने लिहिणाऱ्या जगातील नव्या लेखक-कवीं बरोबर, नवीन रसिकां बरोबर माझी मैत्री झाली…माझ्या कार्यक्रमांची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचली. पुढेमागे त्यांच्याकडे माझे एकपात्री प्रयोग आयोजित केलेही जातील, यांची मला खात्री आहे.
‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चा प्रयोग सादर करायला गेल्यावर कांही ठिकाणी आमच्या पोर्टलवर लिखाण करणारे कवी-लेखक मला प्रत्यक्ष भेटलेत आणि त्यांच्या बरोबर माझी चांगली मैत्रीही झाली आहे.
मा. देवेंद्र भुजबळ साहेब,आपण मला लिहायला लावलंत, माझे लेख आपल्या पोर्टलवर प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी प्रकाशित केलेत, जगातील मराठी रसिक वाचकांपर्यंत माझे कार्यक्रम पोहोचविण्याची अमूल्य संधी मला दिलीत त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आदरणीय वहिनी साहेबांच्या सहकार्यालाही सलाम.!
रसिक वाचकहो,
आपला निर्माण झालेला स्नेह -लोभ वृध्दिंगत व्हावा, हीच अपेक्षा.!!!!

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर
(सादरकर्ते – ‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800