थोर लेखिका, कवयित्री अमृता प्रीतम यांचा उद्या ३१ ऑगस्ट रोजी जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली शब्दांजली.

अमृता प्रीतम यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
कॅनव्हासला भेटायला एकदाच काय ती गेली…!
अन् शब्दात बांधली जाताना कविता अजरामर झाली…!
खरं तर असं काही होईल
असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं !
कॅनव्हासनं कवितेला असं सप्तरंगात गाठलं नव्हतं !
कॅनव्हास अन् कविता यांच्यात व्हायची खडाजंगी…
कॅनव्हासला नकोशी व्हायची कवितेची शाब्दिक दबंगी !
कॅनव्हास अन कवितेचा छत्तीसचा आकडा…
कवितेला वाटायचं मी किती सरळ… याचाच रस्ता वाकडा….!
एक दिवस चित्रकार कवीला जेव्हा भेटला…!
त्याच्यातल्या त्या कवितेला कॅनव्हास आपलासा वाटला…!
ज्याला आजवर समजायची ती निव्वळ एक रंगीत पेपर…!
आज तोच कॅनव्हास तिला भासू लागला स्वप्नातला जादूगार !
शब्दांच्या पलीकडलं कदाचित कॅनव्हासवर टिपता येतं असावं…
एक काव्य आपल्या कलेतून चित्रकारासही जपता येतं असावं !
भेटायला आलेली ती
आज त्याची हरेक किनार वाचत होती…!
त्याला देखील आज ती आपलीच चित्रकार भासतं होती…!
कॅनव्हास जरी इमरोजचा तरी अमृताच त्यात बहरलेली…
कविता म्हणायला अमृताची पण इमरोजच्याच विश्वात हरवलेली…!
तुझं रांगट… देखणं… रंगीत रूप… मला कसं रे नाही उमगलं…!
मला देखील तुझं हळवं… भावस्पर्शी मन कुठे गं लवकर समजलं…!
जेव्हा जेव्हा चित्रकारानं कवितेचं भावविश्व जाणलं अन् कवीनं चित्रकलेला आपलं मानलं…
तेव्हा तेव्हा कॅनव्हास वरची कलाकृती एक अजरामर कविता झाली…
अन् ती प्रत्येक कविता जी कॅनव्हास ने जपली ती चित्रकाराची अजरामर कला ठरली…!
भाव-भावना आनंद-दुःख प्रेम-करुणा संवेदना-सहवेदना…
डोळ्यातलं पाणी अन ओठांवरची गाणी…
जे कलेत ते कवितेत…!
अन्
जे कवितेत तेच कलेत…!
आपल्यातल्या इमरोजला अमृता नित्य भेटावी…!
कॅनव्हासवरची अदाकारी कवितेत तिनं टिपावी..!
तेव्हाच प्रत्येक कविता बहरताना हरेक कला होईल अजरामर…!
इमरोज अमृताच्या कॅनव्हास कवितेसारखी….!

— रचना : तृप्ती काळे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800