नमस्कार, वाचक हो.
केरळ मध्ये आयुर्वेदाशी संलग्न असा अजून एक प्रसिद्ध व्यवसाय आहे तो म्हणजे आयुर्वेदिक मसाज उपचार. पारंपरिक संस्कृतीचा एक खास हिस्सा – मालिश किंवा मसाज म्हणण्यापेक्षा शरीरासाठी गरजेची आणि फायद्याची अशी ही एक उपचार पद्धती म्हणणे योग्य राहिल.
आयुर्वेदामुळे रोग तात्पुरते बरे होण्यापेक्षा समूळ नष्ट होऊन उत्तम निरोगी शरीर पुन्हा लाभू शकते हे आपणास माहित आहेच. पण आयुर्वेदिक मालिशही तितकेच उपयोगी पडते ज्याने मन तर प्रसन्न होतेच पण त्वचेला तजेलपणा येतो, त्वचेचे अनावश्यक घटक असतील ते बाहेर टाकले जातात.
स्नायूंना मोकळेपणा येतो. केसांसाठी फायदा होतो. डोके हलके होते. शरीराला आरामासोबत उत्साह देतो आणि याबरोबर इतरही अनेक चांगले फायदे दिसतात.केरळला लाभलेल्या अतुलनीय वन संपदेपैकी काही औषधीय वनस्पती, पुष्पौषधी, काही मसाले आणि याशिवाय विविध प्रकारची औषधीय सुगंधी तेलांचा पुरेपूर वापर मालिश करताना केला जातो. वाफ दिली जाते.आयुर्वेदिक केंद्रामध्ये मालिश करण्याऱ्यांसाठी वेगळा अभ्यासक्रम असतो, त्याची परीक्षा असते. मालिश करणारे आवश्यक ते शिक्षण घेऊन आलेले अनुभवी असतात. अभ्यंग, शिरोधारा, तक्रधारा असे विविध प्रकार आपणास याचे पाहायला मिळतात.
फिरायला आलेले पर्यटक तर याचा आनंद घेतातच पण काहीजण तर आवर्जून वेळ काढून आयुर्वेदिक मसाज उपचार करून घेण्यासाठी वर्षातून एकदा तरी यायचा प्रयत्न करतात, येतातही.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800