१. पुनवेची रात
पुनवेची रात अन् चंद्रा तुझा हा नखरा
का दावितो पुन्हा पुन्हा गोल तुझा हसरा चेहरा
आसमंती तारका येता, प्रकाश सर्वत्र पसरला
रोमारोमांत फुलले चांदणे,
पुनवेच्या रातीला ।।१।।
आकाश उजळता वाटे, अनेक दीप प्रगटले
चित्रांगण निळ्या नभात, आज कुणी रेखिले
सागरी लाटांवर स्वार होत, वारा उधाण झाला
शांत समयी गाज ऐकते, पुनवेच्या रातीला ।।२।।
ऋतु बदलता रुप वसुंधरेचे आगळेच दिसते
शितल कधी उष्ण, कधी मेघांतून चांदणे झरते
रंगरुप नवे येता, सृष्टीलाही बहर आला
धवल होऊनी धरा मोहरली, पुनवेच्या रातीला ।।३।।
नक्षत्रांनी फेर धरता, अंबरी खेळ रंगला
तेजस्वी चांदण्यांसवे चंद्र तेजाळून धुंदला
खुदकन हसता चंद्रिका, सुगंध रातराणीचा बहरला
चांदवा प्रेमास साक्षी होई, पुनवेच्या रातीला ।।४।।

– रचना : सौ. मोहना टिपणीस. पुणे
२. कोजागिरी
उन्मेषाच्या रंगत गेल्या अश्र्विनातील नवरात्री
टिपूर चांदणे पुनवेचे नभी चमके कोजागिरीरात्री
केशरयुक्त दुधाच्या चरव्या गच्चीगच्चीवर होत्या
निरखित शशीबिंबाला परी चांदणेच प्राशीत होत्या
खेळ मनोहर खेळती नाना तसेच गप्पाष्टक रंगले
कुठे नेत्र नेत्रांना भिडले हसरे यौवन गाली फुले
पृथ्वीवरी या काय चालले पाहू म्हणती शिवपार्वती
भ्रमण यानातून करतांना पृच्छा एकच ते करिती
‘को जागर्ति ?’, ‘को जागर्ति’ एकच स्वर येता कानी
तडफदार तो बाल शिवाजी वदला ‘अहं जागर्मि‘
जागृत राहूनि कार्य तयाने ‘छत्रपतीं ‘चे हो केले
यमसदनी यवनांस लोटूनि स्वराज्य संस्थापित केले
अर्थपूर्ण कोजागिरी सजली इतिहासाच्या पानात
हाच प्रश्र्न परी प्रत्येकाने कां न विचारा आपणास ?
लांचलुचपत, चोरी, दरोडा, बलात्कार नि खून किती
अमुच्या उघड्या डोळ्यांनाही अनाचार हे ना दिसती
मुर्दाड, कोरड्या मनात नाही माणुसकीचा गहिवर
तिथे नांदतो फक्त उसासा, भीती, जरब ती भयंकर
आतषबाजी, झगझगाट तो वैभव ओसंडून वाहे
पुनवेच्या त्या बिंबालाही डाग काजळीचा आहे
‘कोजागर्ति’ अर्थ जाणूनि साजिरी करा कोजागिरी
बेबंदशाहीला वेसण घालूनि धवल चांदणे शुभ्र करी

– रचना : स्वाती दामले
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🙏छान कविता, कोजागिरी पौर्णिमेच्या कवित्रींसोबत न्यूझस्टोरीटुडे सांभादांना शुभेच्छा 🌷👍