Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यक्रांतीज्योती : काही कविता

क्रांतीज्योती : काही कविता

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून महान कार्य केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला. तर १० मार्च १८९७ रोजी पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला.

भारतीय स्त्री वादाची जननी मानल्या गेलेल्या
सावित्रीबाईं विषयी त्यांच्या जयंतीनिमित्त या काही कविता.

सावित्रीबाईं ना आपल्या वेबपोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक

१. क्रांतीज्योती सावित्री

शिक्षणाची तू विद्या
क्रांतीज्योती सावित्री
सारसस्वतांची तु विद्या
क्रांतीज्योती सावित्री ॥१॥

तू सिमोल्लंघन केलेस
जुनाट अंधश्रध्देचे
नवे आव्हान केलेस
स्री शिक्षणाचे ॥२॥

तु जगलिस आत्मविश्वासाने
लढलिस बुरसटलेल्या
समाजाशी जिद्दीने
अनितीने विकलेल्या ॥३॥

तू लेखिका तू शिक्षिका
व्यवस्थेची नवी दिशा
तुच नारी सुशिक्षिका
प्रबोधनाची तु आशा ॥४॥

क्रांतीज्योती सावित्री
शिक्षणाची तु सुरुची
ज्ञान ज्योती कवियत्री
नव्या निर्माणाची सुरुची ॥५॥

पंकज काटकर

– रचना : पंकज काटकर. काटी, जि:उस्मानाबाद

२. क्रांतीज्योती

रंजले गांजले । पाहवेना डोळा ।
ह्यदयाचा गोळा । तडफडे ।।

शोधले कारण । मार्ग योग्य धरू ।
सुशिक्षित करू । बहुजनां ।।

उद्धराया जन । निर्भीड आचार ।
शिक्षण विचार । सांगितला ।।

उघडली शाळा । विरोध घेऊन ।
धीराने साहून । कष्ट भारी ।।

कुणी फेके शेण । दगडांचा मारा ।
निश्चयाचा तारा । क्रांतीज्योती ।।

खांद्याला तो खांदा । पतीला देऊनी
घडविला त्यांनी । इतिहास ।।

शिक्षण पेरले । उगवली आस ।
केला तो विकास । गरिबांचा ।।

बनवी माणूस । वाचूनी पुस्तक ।
तेजस्वी मस्तक । शिक्षणाने ।।

आली घरोघरी । गंगा शिक्षणाची ।
धुतली मनाची । जळमटे ।।

माना उपकार । फुले दांपत्याचे ।
फेडा पांग त्यांचे । शिकुनिया ।।

जिजाऊ सावित्री । माझ्या दोन आई ।
पैलतिरी जाई । नौका माझी ।।

– रचना : प्रा. मोहन काळे. अकोला

३. || अक्षरज्योती ||

सावित्रीबाई फुलेंनी
फार मोठे कार्य केले
अज्ञानाच्या तमातूनी
स्त्री शक्तीला मुक्त केले ||

क्रांतीज्योत पेटविली
स्त्री शिक्षणाची जिद्दीने
शिक्षणाने फुलवली
कितीतरींची जीवने ||

नारी उध्दाराचा ध्यास
वसा आजन्म घेतला
त्रास विरोध त्यापायी
निर्भयपणे सोसला ||

बळ दिले शिक्षणाचे
जिद्द दिली उध्दाराची
जाग्या झालेल्या नारीला
दिली ओळख स्वतःची ||

बीज हे स्त्री शिक्षणाचे
आज वटवृक्ष झाला
विनम्र अभिवादन
त्यांच्या कार्यकर्तृत्वाला ||

ज्योत्स्ना तानवडे

– रचना : ज्योत्स्ना तानवडे. पुणे

४. क्रांती ज्योती सावित्रीबाई

माय सावित्रीने दिला नारीमुक्तीचा तो नारा
अचंबित झाला तेंव्हाच भारत देश सारा |धृ|

अंबराच्या त्या स्पर्शाला नारी कैसी आसावली
प्रगतीचा ध्यास तिचा रस्ते आज विसावली
भरारी तिची आसमंती वाढे तिचा दरारा
अचंबित झाला तेंव्हाच भारत देश सारा |१|

धिटाईस विरोधता सुशिक्षित समाजाने
शेण,कागद, कपटे खावी फुले दाम्पत्याने
लढा स्वयं ध्येयाप्रती अन्न वस्र नि निवारा
अचंबित झाला तेंव्हाच भारत देश सारा |२|

क्रांतिकारी समाजात जन्मले ते बुद्धिमान
ज्योतिबा सावित्रिला नव्हते स्वतःचे संतान
यशवंत दत्तक घेता विरोध परिवारा
अचंबित झाला तेंव्हाच भारत देश सारा |३|

साथ देतसे पतीस ज्योतिबांची अर्धांगिनी
स्रीचा उद्धार करूनी चमकली सौदामिनी
करा शब्द संचयन सोडूनिया परंपरा
अचंबित झाला तेंव्हाच भारत देश सारा |४|

प्लेग साथीमध्ये उभा अस्पृशांना दवाखाना
पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन देई शिक्षणा
सावित्रीचा वसा सरस्वतीचे गुणगान करा
अचंबित झाला तेंव्हाच भारत देश सारा |५|

पोस्ट तिकिट परवाना मिळाला सरकारा
काव्यप्रसिद्धी बावनकशी सुबोध रत्नाकरा
मान मिळाला नारीला सावित्रीचा जयकारा
अचंबित झाला तेंव्हाच भारत देश सारा |६|

शोभा कोठावदे

– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई

५. खुले आसमंत
(अष्टाक्षरी)

पदराच्या ओझ्याखाली
ज्ञान होते झाकलेले
अंधाराच्या खुंटीवर
मन स्रीचे टांगलेले ॥१॥

उंब-याला लावलेले
दार निती नियमांचे
कारागृही जणू काही
जीणे होते गुलामांचे ॥२॥

शिक्षणाच्या हातोड्याने
जीर्ण रुढी तोडल्यात
सावित्रीने लेकी बाळी
शाळे मधे धाडल्यात ॥३॥

विज्ञानाने भले झाले
भरे ज्ञान सत्संगती
आसमंती ही भरारी
माय होते राष्ट्रपती ॥४॥

मुक्ती दिवस स्रियांचा
आसमान झाले खुले
ध्यानी सदा असू द्या
माय ती सावित्री फुले ॥५॥

लेकी तुम्ही सावित्रीच्या
तुम्ही आता सरदार
तेजाळली बुध्दीमत्ता
शब्द झाले तलवार ॥६॥

यशवंत पगारे

– रचना : यशवंत पगारे. बदलापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा