का हसतोस इतका तू पेटवून वारे
याच्यात घर तुझेही होईल खाक सारे
दानात जे मिळाले आभाळ पाखरांना
देशील काय त्यातुन मज चंद्र सूर्य तारे
वाहून आणते ती लांबून गोड पाणी
एका क्षणात सागर करतो नदीस खारे
माझ्या मनास कोणी अडवून दाखवा तर
बांधा बुरूज मोठे लावा किती पहारे
पोटात लाट ठेवा रोखा प्रलय जगाचा
डोंगर पठार आणिक बुडतील ना किनारे
कैदेत मोर आहे थांबा जरा ढगांनो
आहेत लांडगे ते दिसतात जे पिसारे
झालेत खूप हल्ले माझ्या तनामनावर
बस शेवटास टाका आता तुम्ही निखारे

— रचना : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800