ॐकारस्वरुपा !
अनंत विश्वाच्या ब्रह्मांडनायका
हे गणपतीदेवा, सिध्दीविनायका, वरदविनायका, मयुरेश्वरदेवा,
हे गिरिजात्मकदेवा ; हे महागणपती देवा ; हे बल्लाळेश्वरदेवा ; हे एकदंतदेवा ; हे गौरीसुतनंदना ; हे लंबोदरदेवा ; हे भालचंद्रदेवा ; हे महेश्वरदेवा ; हे चिंतामणीदेवा ; हे मंगलमूर्ती ; हे गजाननदेवा ; हे गजकर्णदेवा ; हे लंबकर्णदेवा ; हे एकाक्षरदेवा ; हे विघ्नेश्वरदेवा ; हे प्रथमेशदेवा ; हे महामंगलमुर्तीदेवा ; हे अविघ्नदेवा ; हे मोरया देवा ; हे बुध्दीनाथदेवा ; हे गणपतीबाप्पा देवा ; हे अमित देवा ; हे गणाध्यक्षदेवा ; हे वक्रतुंडदेवा ; हे सुखकर्ता ; हे दू:खहर्तादेवा ;
हे अनाथांच्या नाथा…
तुज नमो ! तुज नमो ! तुज नमो !
तव चरणी मम साष्टांग दंडवत !
कोटी नमन देवा !
या कलियुगात एकोणिसाव्या शतकापर्यंत पृथ्वीतलावर पर्यावरणाचे संतुलन अगदी व्यवस्थित होते. पण, या विसाव्या शतकाच्या सहाव्या दशकानंतर निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या बदलास सुरुवात झाली.विसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकात तर फार मोठ्या प्रमाणात निसर्ग आणि पर्यावरण यात बदल होऊ लागले. त्याचा परिणाम, निसर्गाच्या ऋतुचक्रावर व पर्यावरण संतुलनावर होण्यास सुरुवात झाली. पण हे सिध्दीगणेशदेवा, त्याचा परिणाम सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या कौटुंबिक, सामाजिक जीवनावर होऊ लागला आहे. सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण होऊ लागले.
हे गणाधिपतीदेवा !
आत्तापर्यंत सर्व माणसांना आणि तुझ्या सर्व भक्तगणांना सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सण समारंभ उत्तमरित्या साजरे करता येत असत. पण, आता या एकविसाव्या शतकात मात्र धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच, कौटुंबिक परिस्थिती फार म्हणजे फारच बदललेली आहे. या आधीच्या शतकात लोक तुझे आणि इतर देवदेवतांचे सण मोठ्या उत्साहात, सात्विकतेने छान कलाविष्काराने, आनंदाने साजरे करीत असत. हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत असे. त्यामुळे, या सणांची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असत.
हे गणेशदेवा,
आता या एकविसाव्या शतकात सणासमारंभ व लोकांच्या स्वभाव फारच बदललेले आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि अन्नधान्य भेसळ प्रदूषण यांचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत होते. तेच प्रमाण दूस-या दशकात सत्तर टक्यांपर्यंत वाढले. अतिशय भयंकर बाब म्हणजे या दशकात अत्यंत जीवनावश्यक असणा-या जीवनरक्षक औषंधामध्येही भेसळ होण्यास सुरुवात झाली. हे सिध्दीगणेशदेवा, एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात आता तर उपरोल्लेखित सर्व प्रकारच्या प्रदूषणांचं प्रमाण हे नव्वद टक्यांपर्यंत पोहोचलं आहे. त्यातल्यात्यात कहर म्हणजे वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणाने तर शंभरी पार केली आहे. अशी ही अत्यंत दुष्कर्मे एकविसाव्या शतकाच्या या तिसऱ्या दशकातील काही असूरांपेक्षाही घातक अशा अत्यंत क्रूर अशा माणसांनी केली आहेत व करीत आहेत.
तसेच, दिवसेंदिवस अशा दूष्टप्रवृत्तीच्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे, तुझ्या भक्तांना व सर्वसामान्य सर्व जनतेला जीवन जगणे खूप कठीण होत चालले आहे. यापूर्वीच्या इतर सर्व युगात हे मंगलमूर्तीदेवा, हे विघ्नहर्तादेवा तू अनेक दूष्ट, क्रूर राक्षसांना ठार करुन सर्व भक्तांचे रक्षण करुन त्यांचे जीवन सुखानंदाचे केले आहेस. तसेच, धर्माचेही रक्षण केले आहेस. त्यासाठीच हे गणराया, गणाध्यक्षदेवा तुझ्या चरणी प्रार्थनापत्र ठेवीत आहे.
हे बुध्दीनाथदेवा,
या कलियुगातील, या शतकातील दूष्ट, क्रूर व पापी माणसांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे, हे दूराचारी, अधम लोक राक्षसांपेक्षाही अधिक क्रूरपणे वागून राक्षसाला ही लाज वाटेल अशी अत्यंत घृणास्पद, अत्यंत नीच कृत्ये करीत आहेत.
राक्षस जर भक्तांना जास्त त्रास द्यायला लागले की, ब्रह्मदेव किंवा महादेव त्यांना ठार मारुन सर्व लोकांना व भक्तांना सुखी जीवन प्राप्त करुन देत असत. पण आज दुष्टांनी आचार विचारांचे, नीती नियमांचे सर्व नियम पायदळी तुडविले आहेत. मनमानी पद्धतीने, बेजबाबदारपणे, निर्दयीपणे, माथेफिरू सारखे वागणारे बरेच दूष्ट, आणि राक्षसांहूनही भयंकर क्रूर अशी माणसे कोणत्याही कुटुंबातील लोकांना आणि सार्वजनिक जीवनातही अघोरीपणे चोरी, दरोडे, महिलांवर अत्याचार, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे करीत आहेत.
तसेच, क्रूरपणे मुलं, मुली, तरुण, तरुणी, वृध्द लोकांची हत्या करीत आहेत. अशा लोकांचे प्रमाण तसेच, त्यांच्या गुन्ह्यांचेही प्रमाण वाढतंच चाललं आहे. अशा लोकांवर कडक कारवाई होऊन त्यांना कडक शिक्षा होत नाही असेच सध्याचे चित्र दिसून येत आहे. अशा लोकांवर कायद्याचा किंवा सरकारचा अंकुश राहिलेला दिसून येत नाही. कारण महिलांवरील अत्याचाराचे व चोरी, खून, दरोडे, अंमली पदार्थांची तस्करी यांचे प्रमाणही वरचेवर वाढतंच चालले आहे.
सामान्य लोकांना कुणीच वाली राहिलेला नाही असेच सध्याचे जनजीवनाचे चित्र आहे. नोकरी, व्यवसायासाठी स्वतःच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या माणसांना, बायकांना कामावरून संध्याकाळी जे घरी परत येवू का नाही ? याची शाश्वती राहिलेली नाही. कारण रस्त्यावरुन गाडी चालवताना कोणत्याही नियमांचे पालन न करणारे काही वाहनधारक बेफामपणे, बेभान होऊन अतिवेगाने वाहने चालवणारे बेजबाबदार, उर्मट वाहनधारक अतिवेगाने वाहने चालवून निष्पाप, सामान्य लोकांचे प्राण घेत आहेत. अशा गरीब लोकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. अशा दूष्ट, कृतघ्न लोकांचे प्रमाणही खूप वाढत चालले आहे. तसेच, तीन दशकांपासून सर्व प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. त्यातल्यात्यात एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात तर सर्व प्रकारच्या प्रदूषणाने कहरच केला आहे.
जगातील सर्व देशांतील तसेच, भारत देशातील व विशेषतः महाराष्ट्रातील बव्हंशी दूष्ट, क्रूर, भ्रष्टाचारी, कृतघ्न व पापी माणसांनी जंगलांचा, मोठमोठ्या वृक्षराजींचा विनाश केला आहे. त्यांच्या दूष्कृत्यांचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. त्यामुळे, पृथ्वीचं पर्यावरण संतुलन खूप अस्थिर झालेलं आहे. तसेच, निसर्गसृष्टीतील ऋतूचक्रावरही त्याचा फार मोठा परिणाम झाला होत आहे. त्यामुळे, पावसाळा, उन्हाळा व हिवाळा या ऋतूंमध्येही खूप बदल झाला आहे. शासन व त्यांच्या शासकिय यंत्रणाही या दूष्टांना क्रूर अशा राक्षसीकृत्य करणा-या गुन्हेगारी माणसांना कडक शिक्षा करीत नाही. त्यामुळे, सामान्य जनांना, न्याय मिळणे खूप कठीण झाले आहे.
हे विघ्नविनाशकदेवा, सुखकर्ता, दू:खहर्ता गणपतीदेवा तुझ्या भक्तांच्या जीवनाच्या सुखशांतीसाठी तूचं आता सर्व भक्तांवर कृपा कर आणि दूष्ट, क्रूर अशी दूष्कृत्ये करणा-या राक्षसी माणसांना चांगलं वागण्याची त्यांना सद्बुद्धी दे आणि तरीही त्यांची दूष्कृत्ये जर अशीच चालू राहिली तर अशा क्रूर, राक्षसी माणसांचा विनाश कर.कारण, हे सिध्दीविनायकदेवा तूच म्हटलेलं आहेस की, प्राण्यांच्या साधूनाम। विनाशायचं दूष्कृताम! संभवामी युगे युगे! म्हणूनंच तुझ्या चरणी सर्व भक्तांच्या सुखानंदासाठी साष्टांग दंडवत आहे.
एकदंताय विद्महे!
वक्रतुंडाय धीमहि।
तन्नोदंती प्रचोदयात।
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !

— लेखन : मधुकर ए. निलेगांवकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800