(हिंदी – कामलता, इंग्रजी – star glory, cypress wine, ipomoea quamoclit, humming bird vine)
उन्हाळयाच्या सुट्टीत एका नातेवाईकांकडे बऱ्याच वर्षांनी गणेशवेलची रोपे दिसली. ही रोपे पाहून रोपे मागण्याचा मोह टाळता आला नाही. फार प्रेमाने गणेशवेलची रोपे त्यांनी मला काढून दिली. त्यातील काही रोपे आईला लावायला दिली आणि काही माझ्याकडे आणली.
घरी आल्यावर रोपे छानपैकी एका कुंडीत लावली आणि इथून पुढे सुरु झाला प्रवास.. आज पहिले फुल येईपर्यंतचा. इथून पुढेही चालू राहील. पण हा पहिला टप्पा म्हणायला हरकत नाही.
त्याला किती पाणी द्यायचे, ऊन – सावली काय नि किती आवडते याची माहिती आंतरजालवर शोधली. घरात वापरलेल्या भाजीपाल्यांचे राहिलेले अवशेष खत म्हणून वापर केला. वेलीच्या वाढीवरून लक्षात आले की, ती आपल्याबरोबर छान रुळली आहे. याची झलक दाखवली ती पहिल्या वहिल्या नाजूक कळीने.
आद्य कळी दिसल्यावर अपार आनंद झाला.. एकच असली तरीही.. आणि वेध लागले फुलाचे…
हल्ली मोबाईल मुळे कधीही, कुठेही, कसेही छायाचित्रण करता येते. यामुळेच कळीचे छायाचित्र घेणे सुरु झाले. नित होणारी वाढ पाहणे वेगळेच समाधान देते.
फुलपाखरे, गुंजारव करणारे पक्षी (humming bird) यांना गणेशवेल फार प्रिय आहे. गणेशवेलचे पाने, फुले, मूळ्या औषधीय उपयोगी आहेत पण वैद्य किंवा जाणकारांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे.
रोप मिळाल्यापासून साधारण दोन महिन्यात आज कळीचे फुल झाले. प्रभात प्रसन्न झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच. गणेशवेल लवकरच अजून फुलांनी बहरेल.. लाल चुटुक चांदण्या हिरव्या गालिचावर मोहिनी घालतील.
एक आस मात्र मनी आहे.. गणेशवेलचे इतरही रंग मिळावेत..

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹सुंदर लेख, छान माहिती 🌹
धन्यवाद