Monday, September 1, 2025
Homeसेवागणेशोत्सव : विविधांगी महत्व

गणेशोत्सव : विविधांगी महत्व

आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. हे आगमन म्हणजे फक्त धार्मिक विधी नाही, तर आनंद, उत्साह, श्रद्धा आणि एकोपा यांचा सुंदर संगम आहे.

काल बाजारपेठा गर्दीने गजबजलेल्या दिसत होत्या. कोणी पुजेचे साहित्य घेत होते, कोणी बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जात होते. ढोल- ताशांचा नाद, “गणपती बाप्पा मोरया !” चा जयघोष, फुलांची दुकाने, सजावटीच्या वस्तू – या सगळ्यामुळे बाजारपेठेचे वातावरण अप्रतिम झाले होते. संपूर्ण गाव, शहर, आणि प्रत्येकाच्या मनात आनंद आणि भक्तीची लहर होती आणि ही लहर १० दिवस असणार आहे.

गणपती बाप्पा सर्वांचे एवढे लाडके का आहेत, बरं ? कारण कोणतेही कार्य सुरू करण्याआधी सर्वात प्रथम गणपतीची पूजा केली जाते. “कामाचा श्री गणेशा” ही म्हण सर्वांना ठाऊक आहे. गणेश हा विघ्नहर्ता अडथळे दूर करणारा, नवसाला पावणारा, भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारा आणि बुद्धीचा देव – ज्ञान, शहाणपण आणि समृद्धी देणारा देव आहे. म्हणूनच गणपती सर्वांच्या आवडीचे आहेत.

पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने स्नानासाठी जाताना आपल्या अंगावरील उटण्याच्या मळापासून एक पुतळा तयार केला आणि त्याला प्राणप्रतिष्ठा दिली. त्याचे नाव ठेवले “गणेश”. तिने गणेशाला आदेश दिला की घराचे रक्षण कर. तेव्हाच भगवान शंकर आले. पण गणेशाने त्यांना घरात जाण्यापासून थांबवले. शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे मस्तक छाटले. हे पाहून पार्वती खूप दुःखी झाली. तिने शंकराला विनंती केली. तेव्हा भगवान शंकरांनी हत्तीचे मस्तक आणून गणेशाला जोडले आणि त्याला पुन्हा जीवन दिले.यामुळे गणेशाला गजमुख, गजानन ही नावे मिळाली.

गणपती बाप्पाची अनेक नावे आहेत, ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, गजानन इत्यादी. विशेष म्हणजे गणपतीची बारा नावे प्रसिद्ध आहेत :
१. वक्रतूंड २. एकदंत,३. कृष्णपिंगाक्ष, ४. गजवक्त्र, ५. लंबोदर, ६. विकट, ७. विघ्नराजेंद्र, ८. धूम्रवर्ण, ९. भालचंद्र, १०. विनायक, ११. गणपती, १२. गजानन

गणेश चतुर्थी हा उत्सव १० दिवसांचा आहे. सकाळ-संध्याकाळ आरती, भजन, कीर्तन, नृत्य, नाट्य /////आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे हा उत्सव अधिकच रंगतदार होतो.

गणेश मंडळांच्या मिरवणुका, सजावट, सामाजिक उपक्रम आणि सामूहिक प्रार्थना यामुळे संपूर्ण समाज एकत्र येतो.

हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा आहे.लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं, ज्यामुळे हा उत्सव आपल्याला राष्ट्रीय एकतेचं आणि समाजातील बंधुभावाचं प्रतीक बनवतो.

गणेश फक्त पूजा करण्यासाठी नाहीत. त्यांचे प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी शिकवते. मोठे कान चांगले ऐकायला शिका, लहान डोळे लक्ष केंद्रित करा, मोठे पोट सहनशीलता आणि संयम ठेवा. एकदंत एकाच ध्येयावर लक्ष ठेवा.ही शिकवण जीवनातील यशाचा मंत्र आहे.

मित्रांनो,
गणेश चतुर्थी आपल्याला फक्त आनंद आणि उत्साह देत नाही, तर शिस्त, श्रद्धा, एकोपा, आणि संस्कृतीची जाणीव करून देतो., म्हणूनच आपण सर्वांनी मिळून हा उत्सव आनंदात, पण शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा.
चला तर मग, सगळ्यांनी एकत्र म्हणूया
“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !”
धन्यवाद.

— लेखन : प्रभाकर कासार. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments