आज २ जानेवारी ! १९४३ साली आजच्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सिध्दगडावर पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोन स्वातंत्र्यवीरांना ब्रिटीशांच्या पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री कुमार कदम मुख्य संपादक, महाराष्ट्र वृत्त सेवा आणि माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ यांनी केलेले त्यांच्या शौर्याचे स्मरण व त्यांच्या स्मारकाच्या उभारणीचा सांगितलेला इतिहास पुढे देत आहे.
या वीर हुतात्म्यांना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
श्री कुमार कदम यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोघांच्या हौतात्म्याची स्मृती जागविण्याकरीता कर्जत-नेरळ-माथेरान परिसरातील राष्ट्रप्रेमी मंडळी १९४६ पासून सिध्दगडवर दरवर्षी २ जानेवारीला पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी एकत्र येतात आणि ‘स्मृतिस्तंभा’वर क्रांतीज्योत पेटवून हुतात्म्यांना अभिवादन करतात.
नववर्षाचे ते आगळे स्वागतच म्हणायला हवे. गेली ७७ वर्षे हा कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीमुळे अभिवादनाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात होऊ शकला नव्हता, मात्र यंदा तो सिद्धगड स्मारक समितीच्या वतीने प्रथेनुसार आदल्या रात्री सिध्दगडावर जाऊन पहाटे साजरा केला जाणार आहे. यावेळी ‘स्मृतिस्तंभा’वर क्रांतीज्योत पेटवून हुतात्म्यांना अभिवादन केले जाईल. तसेच हुतात्म्यांना पोलीस मानवंदनाही देण्यात येईल. काही स्थानिक मंडळींनी रात्री आणि पहाटे भजनाचा कार्यक्रम करून त्यात सहभाग होत असतात.
पहिल्या वर्षी सानेगुरूजींनी तेथे जाऊन स्मृतिस्तंभासमोर दीपप्रज्वलन केले होते. १९७७ मध्ये दिवंगत स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांच्या प्रयत्नाने या स्मृतिस्थळाचे विस्तारीकरण करण्यात येऊन तत्कालीन केंद्रीयमंत्री यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला होता. त्यानंतर सिध्दगड स्मारक समितीच्यावतीने दरवर्षी तेथे १ व २ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते.

‘बेचाळीसची क्रांती’ हा आता भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा एक भाग होऊन गेला आहे. त्यावेळची तरुण मंडळी स्वातंत्र्यप्राप्तीच्या विशाल ध्येयासाठी समर्पणबुद्धीने तळहातावर शीर घेऊन कशी लढली, मृत्युला आलिंगन देण्यासाठी अहमहमिकेने कशी पुढे आली; हे आजच्या तरुण पिढीला माहित व्हावे यासाठी सिध्दगडवरील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हुतात्मा वीर कोतवाल यांचे नाव आजच्या तरुणांना माहीत असेलही, परंतु त्यांनी बेचाळीसच्या लढ्यात ‘आझाद-दस्ता’ कसा स्थापन केला. देशाच्या अन्य भागातील भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांशी संबंध कसे जुळविले. त्यात त्यांना किती अडचणी आल्या. त्यांना खेड्यातील गोरगरीबांनी कशी मदत केली. शहरातील तरुणांना त्यांनी आपल्या तुकडीत सामील करून त्यांच्याकडून पराक्रमाची कामे कशी करून घेतली आणि शेवटी २ जानेवारी १९४३ ला सिध्दगडच्या पवित्र भूमीवर त्यांचे बलिदान झाले या सार्या घटना रोमांचकारी आहेत.
वीर कोतवाल महिनोनमहिने जंगलात भटकायचे. सतत मुक्काम बदलायचे. इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पसार व्हायचे. ते माथेरानचे रहिवाशी. त्यांचा असाच एक मुक्काम, माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या, नेरळपासून ३५ किलोमीटरवरील सिध्दगडवर होता. त्यांच्या या मुक्कामाचा संशयही सहजासहजी कोणाला येणे शक्य नव्हते; परंतु एका फितुराने ब्रिटीशांना खबर दिली. परिणामी १ जानेवारीला रात्री शंभर हत्यारी पोलिसांनी सिध्दगडवर जाऊन; पहाटेच्या वेळी झोपी गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना वेढा घातला आणि त्यांच्यावर बंदुकीने हा चढविला. त्यात कोतवाल आणि हिराजी पाटील यांना वीरमरण आले.
१९४२च्या ‘चलेजाव चळवळी’च्या काळात ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणार्या या दोन्ही हुतात्म्यांची प्रेते सरकारी जागेत दहन करण्यास बंदी घालण्यात आली होती. शेवटी सिद्धगड येथील घिगे कुटुंबीयांनी आपल्या खाजगी जागेत या दोन्ही हुतात्म्याना अग्नी दिला.
कोकणपट्टीत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या जलप्रलयात सिध्दगडवर उभारलेला १२ फूटी स्मृतिस्तंभ आणि तेथे जाणारा संपूर्ण रस्ता वाहून गेला होता. ज्या ठिकाणी वीर कोतवाल आणि वीर विराजी पाटील आपल्या सहकार्यांसह दबा धरून बसले होते ती मोठी शिळा तसेच ज्या ठिकाणाहून इंग्रजांनी गोळीबार केला ती शिळा; हे तेथील घटनेचे दोन ‘साक्षीदार’देखील पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेले होते. कर्जत तालुक्यातील काही पत्रकारांनी, त्यांना ही माहिती मिळताच, लगेचच सिध्दगडवर जाऊन स्मृतिस्तंभाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळपास तीन महिने सरकारी यंत्रणेने या दुर्घटनेकडे ढुंकूनदेखील पाहिले नव्हते. अखेर स्थानिक पत्रकारांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सरकारी यंत्रणा हलली आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून स्मृतिस्तंभाच्या दुरूस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला भाग पाडले होते.
सिध्दगड हे पर्यटन स्थळम्हणून विकसीत करण्यासाठी सन २००५ मध्ये महाराष्ट्र सरकारने ३० लाख रुपये मंजूर केले होते. त्यानंतर शासनाने येथील स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी येथे विविध योजना राबविल्या आहेत त्यामुळे आता या पवित्र भूमीवर वर्षभर लोक येत असतात यावर्षी हुतात्म्यांच्या बलिदानास ८० वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त ८० दीव्यांग बंधू-भगिनींना सिद्धगड येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी पाचारण केले जाणार आहे.
सिध्दगडचा हा परिसर लोकांनी सदैव गजबजलेला असावा, त्याला पवित्रस्थानाचे महत्त्व प्राप्त व्हावे, अबालवृद्धांनी हुतात्म्यांच्या बलिदानातून स्फुर्ति घ्यावी, देशभक्तीने प्रेरीत होऊन देश घडविण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे असे या परिसरातील सामान्य जनतेला नेहमीच वाटत असते.
या ठिकाणी सिद्धगड स्मारक समितीचे वतीने दरवर्षी एक जानेवारीच्या रात्री पासून विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्यामुळे सिद्धगड आता ठाणे, रायगड, पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राची पंढरी बनली आहे.
सुदैवाने सध्याच्या राज्य सरकारने गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा वसा घेतलेला आहे. तशी घोषणा तरी झाली आहे. त्यांनी हे प्रकरण अधिक गांभीर्याने घ्यायला हवे.
सिध्दगडची गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा पाहून
कविवर्य कुसुमाग्रजांच्या पुढील काव्यपंक्तींची आठवण झाल्याशिवाय राहात नाही –
कशास आई भिजविसि डोळे उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदण्ड तव पायांमधले खळाखळा तुटणार, आई; खळाखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार !

– लेखन : कुमार कदम. मुख्य संपादक, महाराष्ट्र वृत्त सेवा आणि माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800