पुन्हा एकदा चालायला सुरुवात केल्यावर समोर भलाथोरला डोंगर ! आता डोंगर चढायची आणि उतरायची सवय झाली होती, त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. अतिशय निसर्गरम्य वातावरण, सोबत मानवाचे वंशज चारी बाजूला…
डोंगर चढून उतरून झाल्यावर सपाट भाग लागला, जवळपास दोन तृतीयांश अंतर पार केले होते. दुपारचे दिड-दोन वाजले होते, मागच्या विश्रांती स्थानी पोटात गेलेले अन्न गायब झाले होते ! कडकडून भूक लागली होती. प्रत्येकाने त्याची बॅग तपासली आणि काय आश्चर्य आम्हाला शिदोरी मिळाली…
आमच्या आयोजकांनी, परिक्रमा करताना भूक लागल्यास अन्न बरोबर असावे म्हणून प्रत्येकास ५-६ ठेपले, दही, चटणीचे पाकिट दिले होते ! धन्य ते आमचे आयोजक की ज्यांनी आमची अत्यंत सुयोग्य अशी काळजी घेतली…
मी दमलो, की बसत होतो आणि विश्रांती झाली ती चालत होतो, ठरवलेच होते… परिक्रमा पूर्ण करायचीच!काहीही होवो, निश्चय होता आणि पाठीशी स्वामी समर्थ होतेच..
आता विश्रांती स्थान नजरेच्या टप्प्यात आले होते. येथेही सर्व व्यवस्था होतीच, पूर्ण जेवण, अर्धे जेवण, पिण्याचे पाणी, हात धुण्याचे पाणी, ताटवाटी धुण्याची व्यवस्था आणि ही सर्व सेवा विनामूल्य बरें ! फार अवघड गोष्ट आहे ही !
आपण शहरात कुणाला चहा सोडा पाणीही देत नाही, बाकीच्या गोष्टी दूरच…
असो, तर पुन्हा एकदा विश्रांती घेऊन पायांची चालढकल सुरू झाली… खूपच दमायला होत आहे, तरीपण एक ऊर्जा, एक शक्ती, कुठून मिळत होती हे देवच जाणे…
पावले अलगद आणि सातत्याने पडत होती, तोंडाने आराध्य दैवताचे नामस्मरण, हातात काठी, खांद्याला बॅग, मस्त वाटत होतं… टवटवीत आणि ताजतवानं !
मध्यंतरात पुन्हा एकदा चढ आणि उतार लागला… आता याची सवय झाली होती! मधूनच पायर्याही होत्या, सिमेंटचा रस्ता ही होता… सोबतीला पक्षी चितळ आणि हनुमंत सेना होतीच !
कोणाला तरी बिबट्याने दर्शन दिले होते… मस्तपैकी चालत चालत भोर माता मंदिरा पाशी आलो… छान पैकी दर्शन घेतले, चहा घेतला, थोडासा आराम केला आणि निघालो…
पुन्हा चालायला सुरुवात केल्यावर माझ्या लक्षात आले की, सुरुवातीला मी पाणी ओलांडताना केलेली हुशारी आता माझ्या अंगाशी आली होती…
पाय उबले होते, बोटांना फोड आले होते आणि पायाला थोडीशी सुज…
एव्हाना चार वाजून गेले होते. माझा चालण्याचा वेग आता मंदावला होता…
मी सहकार्यांना सांगितले, तुम्ही तरुण आहात! मी तुमच्याबरोबर आता वेगाने चालू शकत नाही, तुम्ही पुढे व्हा! मी मागोमाग हळूहळू नक्की येतो ! काळजी करू नका, बेफिकीर रहा !
पण मंडळी कुठली ऐकायला तयार ? नाही ! तुम्ही आमच्या बरोबरच चालायचं !
तरीपण एके ठिकाणी जरा थांबलो असताना, गप्पांच्या नादात आमचं मंडळ पुढे गेलं… त्यांना वाटलं मी पुढे आहे, मी समजलो त्यांच्या लक्षात आहे की, मी मागे आहे..!
सॉलिड गंमतच…
त्यावरून झालेली धमाल पुढे सांगेन, असो !
चालायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की आता बूट घालून चालणे अशक्य आहे !
तेव्हा शांतपणे… बूट काढले, हातात घेतले, सॉक्स काढले, खिशात घातले आणि निघालो…
एका हातात बूट, एका हातात काठी, खांद्याला बॅग आणि तोंडात समर्थांचे नाम !
बोलता-बोलता सात किलोमीटर अंतर, तेही अनवाणी कसे पार झाले हे कळलेच नाही…
आणी समोर गेट दिसले…
संपूर्ण परिक्रमा मार्गास सुरुवातीस आणि शेवटी
गेट्स आहेत ! गेट मधून बाहेर पडलो… पुन्हा एकदा शिव मंदिरापाशी आलो… भवनाथ महादेवाचे दर्शन घेतले…
आणि एकदाचा रूमवर आलो…
दारावर थाप मारली. आतून आवाज… कोण आहे ? परक्या माणसाला खोलीत प्रवेश नाही!
आवाज जरा संतापलेला होता, तरी ही दार उघडले गेले…
मी नम्रपणे सांगितले, मी शशिकांत गंधे आहे ! आत येऊ ?
ठिकाय, ठिकाय ! या !
“ताबडतोब, गरम पाण्याने आंघोळ करा, औषध घ्या आणि झोपा! उभे राहू नका… बसा ! मी गरम पाण्याची बादली आणतोय, झटकन आंघोळ करा ! कपडे बदला, काहीतरी खाऊन घ्या आणि मग ही गोळी घ्या आणि झोपा..! आम्ही दुसऱ्या आश्रमात जाऊन येतो, दार आतून बंद करू नका, शेजाऱ्याला सांगा, बाहेरून दार लावतील ते! आम्ही निघतो !” असे म्हणून आमचे गटप्रमुख सावंत साहेब त्यांच्या फौजेसह निघूनही गेले…
अर्थातच त्यांनी सांगितलेले सर्व केले आणि निद्राधीन झालो ! दुसरे काय करणार मी ?
अंथरुणावर पडलो मात्र… झोप कधी लागली हे कळलंच नाही !
भाग ३ ब समाप्त.
भाग ४ लवकरच !
…क्रमशः

– लेखन : गंधेकाका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800