“जन गण मन” या आपल्या राष्ट्रगीताचे स्वर कानावर पडताच आपली मान अभिमानाने ताठ होते. जिथे असू तिथे आपण स्तब्ध उभे राहतो. असं हे आपलं थोर राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिभेतून साकारलं आहे. गुरुदेवांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना वंदन करून थोडसं त्यांच्या विषयी जाणून घेऊ या…….
पश्चिम बंगाल मधील कोलकता येथील पिराली ब्राह्मण कुटुंबात रवींद्रनाथ टागोर यांचा ७ मे १८६१ रोजी जन्म झाला.
जन्मजात प्रतिभा लाभलेल्या रवींद्रनाथ यांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. पुढे भानुसिंह या टोपणनावाने त्यानी काव्य लेखन केले.
रवींद्रनाथ यांच्या घराला उच्च शिक्षणाची परंपरा होती. त्यामुळे त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडमधील लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज मध्ये पाठविण्यात आले. परंतु कोणतीच पदवी न घेता ते १८८० साली भारतात परतले.
चार भिंतीमधील शिक्षण माणसाला खरं घडवू शकत नाही, या विचारातुन त्यांनी खुल्या हवेतील शांतिनिकेतनचा जग प्रसिद्ध अभिनव प्रयोग केला.
रवींद्रनाथ केवळ कवी, गीतकार, साहित्यिक संगीतकार, चित्रकार, शिक्षणतज्ञ नव्हते तर ते थोर देशभक्त विचारवन्त होते. त्यांनी सुरू केलेले संगीत हे त्यांच्या नावाने म्हणजेच रवींद्र संगीत म्हणून ओळखल्या जाते.
भारतीय संगीत, साहित्य यावर त्यांची अमीट छाप पडली आहे. “गीतांजली”च्या रचनेबद्द्ल त्यांना जगातील सर्वोच्च असा नोबल पुरस्कार १४ नोव्हे १९१३ रोजी देण्यात आला. हा पुरस्कार मिळालेले ते भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिले विजेते आहेत.
रवीन्द्रनाथांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना १९१५ साली “सर” ही पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांड झाले. या नृशंस हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर पदवी त्यांनी ब्रिटिश सरकारला परत करून आपला स्वाभिमान आणि देशप्रेम प्रकट केले.
भाषिक अस्मितेमुळे १९७१ मध्ये पाकिस्तान पासून स्वतंत्र झालेल्या बांगला देशने त्यांचे “आमार शोनार बांग्ला” हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.
महाराष्ट्र आणि रवींद्रनाथ यांचा विशेष ऋणानुबंध आहे. आपल्या संत साहित्याने रवींद्रनाथ प्रभावित होते. संत तुकाराम महाराज यांचे अभंग त्यांनी बंगालीत अनुवादित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे प्रेरणास्थान होते. महाराजांवर त्यांनी खंडकाव्य लिहीले आहे.
रवींद्रनाथ यांच्यामुळे मराठीतील अनेक साहित्यिक प्रभावित झाले आहेत. रवींद्रनाथ यांनी चाकोरीबद्ध जीवनाला नवी दिशा दिली. जगात त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. अशी ही थोर विभूती ७ ऑगस्ट १९४१ रोजी अनंतात विलीन झाली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना भावपूर्ण अभिवादन.– लेखन : देवेंद्र भुजबळ. +91 9869484800
नमस्कार मित्रांनो,
आज गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने श्रीमान देवेंद्र भुजबळ साहेबांच्या कल्पक संपादनातून या जगप्रसिद्ध कवी, लेखक , निसर्ग चित्रण करणारे महान चित्रकार, शांतीनिकेतनचे महामहीम , “गीतांजली या महान काव्यरचनेचे” रचनाकार ज्यामुळे या काव्य रचनेला जागतिक स्तरावरील नोबेल पारितोषिकने सन १९१३ मध्ये सन्मानीत करण्यात आले. ज्यांच्या अद्भूत लेखणीतून आपले “जनगणमन” हे राष्ट्रगीत प्रसवले , अशा महान देशभक्तांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या विविधांगी कार्याला नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण करतो.
राजाराम जाधव,
उलवे, नवी मुंबई