महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा यंदा अष्टशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना गुरुस्थानी असलेले आणि महानुभाव पंथाच्या पंचकृष्णांमध्ये असलेले श्री गोविंद प्रभू महाराज यांची जयंती, काल सर्वत्र साजरी झाली. त्यानिमित्त महानुभाव पंथ आणि श्री गोविंद प्रभू महाराज यांचे कार्य या विषयी विशेष लेख….
आपल्या देशातील अनेक धर्मसंपदांपैकी एक असलेला महानुभाव पंथ हा महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेला असून उत्तर भारतात तसेच काही प्रमाणात दक्षिण भारतातही या पंथाचे संत, महंत आणि अनुयायी व उपदेशी साधक आहेत.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या गुरुस्थानी असलेले व महानुभाव पंथाच्या प्रश्नांमध्ये असलेले श्री गोविंद प्रभू महाराज यांचे स्थान सांप्रदायिकांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.
विशेष म्हणजे श्री गोविंद प्रभू यांनी श्री. चांगदेव राऊळांकडून दीक्षा ग्रहण करून अमरावती जिल्ह्यातील ऋद्धपूर येथे वास्तव्य करून त्या स्थानाला पावन केले. त्यांचे तत्वज्ञान, आचार विचार आणि त्यांची जीवनविषयक दृष्टी आजही सर्व समाजाला प्रेरणादायक आहे. किंबहुना ते सामाजिक कार्याचे प्रथम प्रणेते होते, असे म्हणता येईल.
गोविंद प्रभू महाराज यांचे जीवन कार्य समजून घेण्याआधी आपण महानुभाव पंथा विषयी जाणून घेऊ या..
यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे स्तोम माजले होते. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला.
खरे तर ‘महानुभाव’ या नावाने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत.
महानुभाव पंथातील लोक कृतयागात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात श्रीकृष्ण आणि कलियुगात चक्रधर असे चार अवतार मानतात. त्यांच्या मते दत्त हा एकमुखी होय. द्वारकाधीश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धपूरचे गोविंदप्रभू
आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात. त्यांपैकी दत्तात्रय, श्रीकृष्ण चक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत.
महानुभाव तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराचे
(१) अवतरदृश्यावतार, (२) परदृश्यावतार,
(३) उभयदृश्यावतार असे तीन प्रकारचे अवतार आहेत. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धार करू शकतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सन्निधानाने आपला उद्धार करून घेतात. मात्र जीवाचे उद्धरण म्हणजे अद्वैत्यांची मुक्ती नव्हे. मुक्तीनंतरही जीवाचे अस्तित्व टिकून राहते. ईश्वराकडून शब्दज्ञान झाले, तरी मोक्षमार्गाने जाण्यासाठी अनुसरणाच्या मार्गाचा अवलंब करून वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापूर्वी सर्वेंद्रिये कार्यक्षम असताना संन्यास घेणे आवश्यक आहे.
संन्यास घेऊन परमेश्वराला अनुसरल्यानंतर देहान्तापर्यंत साधकाला ‘असती−परी’ आचरावी लागते.
महानुभावांचे उपदेशी आणि संन्यासी असे दोन वर्ग असून उपदेशी वर्ग लौकिक जीवनात चातुर्वर्ण्य पाळतो. संन्यास दीक्षेनंतर मात्र जातिनिर्बंध पाळण्याची आवश्यकता नाही. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर;
भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध व उद्धवगीता, दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत.
श्रीचक्रधर व श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले आणि पंथीयांच्या नित्यस्मरणाची मोठी सोय केली. केसोबासांनी लीळाचरित्रातील काही लीळा निवडून त्या संस्कृत भाषेत पद्यबद्ध केल्या व आपला रत्नमालास्तोत्र ग्रंथ निर्माण केला.
नागदेवांच्या जीवनावरील स्मृतिस्थळ हा चरित्रग्रंथ प्रथम नरेंद्र व परशराम बासांनी तयार केला, असे म्हणतात. पुढे त्याचे मालोबास व गुर्जर शिववास यांनी संस्करण केले.
केशवराज सूरी यांनी सिद्धान्तसूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ हे पंथीय तत्त्वज्ञान विशद करणारे ग्रंथ तयारे केले. श्रीचक्रधरांनी नित्यदिनचर्या सांगणारा छोटा पण महत्त्वाचा ग्रंथ पूजावसर हा वाङ्देववास यांचा मुनिव्यासांनी श्रीचक्रपाणी, गोविंदप्रभू व चक्रधर यांच्या ‘संबंधा’ने पवित्र झालेल्या स्थळांची स्थानपोथी लिहिली.
महानुभाव पंथातील पंचकृष्ण अवतारांमधील श्री गोविंद प्रभु महाराज हे थोर समाजसुधारक होते. किंबहुना सुमारे आठशे वर्षांपूर्वी सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून देखील त्यांचा उल्लेख करण्यात येतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर जवळील काटसुरे तथा मातुलग्राम या गावी अनंत नायक आणि नेमाइसा या ब्राह्मण दांपत्याच्या पोटी इ.स. ११८७ भाद्रपद शुद्ध १३ शके ११०९ रोजी रात्री अकरा वाजता श्री गोविंद प्रभु यांचा जन्म झाला. त्यांचे जन्म नाव गुंडम असे होते, त्यांच्या बालपणीच मातापित्यांचे निधन झाल्यावर त्यांचा सांभाळ मावशी आणि मामा यांनी केला. लहानपणापासूनच श्री गोविंद प्रभु हे अतिशय बुद्धिमान होते. वयाच्या सातव्या वर्षी मौजीबंधन झाल्यावर ते शिक्षणासाठी रिद्धपूर येथे आले. त्यानंतरच्या काळात द्वारावती येथे जाऊन त्यांनी संन्यास घेतला. तसेच श्री चांगदेव राऊळ यांच्या कडून शक्ती स्वीकार केला, म्हणजेच शिष्यत्व पत्करले. त्यांनी रिद्धपूर येथेच सामाजिक कार्यात आयुष्य वेचले, त्यामुळेच रिद्धपूर या क्षेत्राला महानुभावांचे तीर्थस्थान तथा श्री क्षेत्र काशी मानले जाते. श्री गोविंद प्रभु यांना ईश्वरी अवतार मानले गेले तरी, त्यांचे जीवन अनेकविध सामाजिक घटनांनी भरलेले आहे.
महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप चक्रधरस्वामी यांचेही ते गुरू होते. श्री गोविंद प्रभू महाराज हे ब्रह्मचारी होते, ही गोष्ट त्यांच्या कडकडीत वैराग्याची आदर्श गोष्ट मानली जाते.ते जन्मभर अनासक्त वृत्तीने राहिले. त्यांनी कशाचाही लोभ धरला नाही. पण याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे उच्च नित्य सर्वाभूती समान दृष्टी त्यांनी ठेवली.उच्चनीच असा भेदभाव कधी मनात आणला नाही, त्यामुळेच ते सामाजिक समतेचे प्रणेते मानले जातात.
श्रीगोविंद प्रभु यांच्याविषयी अनेक सामाजिक समतेबाबत त्यांच्या कार्याच्या कथा सांगितल्या जातात. त्यात विशेषतः आणि कुणब्याच्या घरी जेवण करणे, कष्टकरी व अनाथ यांना मदत करणे, दुष्काळ निवारण करणे, वजन मापे चुकीची सांगणाऱ्याला शिक्षा करणे, दोन गावातील भांडण सोडवण्यासाठी शिष्टाई करणे, यासारख्या घटनांचा उल्लेख येतो.
श्री गोविंद प्रभू महाराज वयाच्या २५ व्या वर्षी श्री चक्रपाणी अवताराच्या भेटीला गेले असता गोविंदप्रभु यांनी चक्रपाणि महाराजांना पाहताच क्षणी दंडवत घातले. त्या सरशी चक्रपाणी महाराजांनी गोविंद प्रभूच्या डोक्यावर सुप ठेवले आणि सुपवार खराटाचा घाव मारला. त्याबरोबर चक्रपाणी अवतारने गोविंद प्रभू या दोन्ही शक्तीच्या दिक्षा दिल्या, आणि गोविंद प्रभुने त्या शक्तीचा स्वीकार केला.
गोविंद प्रभू यांना श्री हरपाळदेव यांना आपला शिष्य मानून श्री चक्रधर हे नामाभिधान दिले. ते भगवान श्री चक्रधर महानुभाव पंथाचे संस्थापक तथा प्रर्वतक बनले.या अर्थाने गुरू श्री गोविंद प्रभु यांच्या शिष्य रूपाने म्हणाजे स्वामींच्या रूपात महानुभाव पंथाला एक ज्ञानवंत, विचारवंत आणि संस्थापक मिळाला आणि महानुभाव पंथाची वाटचाल सुरू झाली म्हणून श्री गोविंद प्रभूंचे महानुभाव पंथातील स्थान महत्त्वपूर्ण असे आहे.

– लेखक : मुकुंद अर्जुनराव बाविस्कर
ज्येष्ठ पत्रकार, नाशिक
– संपादक : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
