शब्दांनी विचार जागे करणारे, लेखणीतून समाज सांस्कृतिक मूल्यांची मशाल हातात घेऊन चालणारे आदरणीय श्री देवेंद्रजी भुजबळ यांना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्याहस्ते विश्वभरारी फाउंडेशन तर्फे मिळालेल्या सन्मानाबद्दल न्यूज स्टोरी टुडे चे मनःपूर्वक अभिनंदन !
देवेंद्रजी यांच्या प्रेरणादायी लेखनाचा दीर्घ प्रवास आहे. प्रेरणादायी पुस्तके, देशविदेशात दिलेली प्रभावी भाषणे, सातत्याने विविध विषयांवर केलेले सखोल लेखन— हे केवळ लेखन नाही, तर समाजमन घडवणारे विचारसंस्कार आहेत. शंभरहून अधिक पुरस्कार व सन्मान हे त्यांच्या लेखणीच्या ताकदीचे जीवंत साक्षीदार आहेत.
कर्तृत्वशील आणि कधीही न थकणारे व्यक्तिमत्त्व कामसू, धडाडीचे, नावीन्याचा ध्यास घेणारे आणि निवृत्तीनंतरही न थांबणारे हे व्यक्तिमत्त्व —आजच्या पिढीसाठी “सेवानिवृत्ती म्हणजे विश्रांती नव्हे, तर नव्या सुरुवातीचा टप्पा” हे शिकवते.
‘न्यूज स्टोरी टुडे’ हे मूल्याधिष्ठित माध्यम आहे. कोरोनाच्या कठीण काळात सुरू केलेले ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेब पोर्टल म्हणजे नकारात्मकतेपासून दूर राहून सकारात्मक, मराठी भाषेचा सन्मान राखणारा, साहित्य–संस्कृती–कला-आरोग्य–सेवा–विचार यांना व्यासपीठ देणारा दीपस्तंभ आहे. राजकारण, गुन्हेगारी, बदनामीकारक मजकुरापासून जाणीवपूर्वक दूर राहण्याचा हा निर्णय खरोखरच अनुकरणीय आहे.
नवोदित लेखक, कवी, कवयित्री यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि प्रसिद्धी देण्याचे ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेब पोर्टलचे कार्य म्हणजे साहित्याची रोपवाटिका जपण्यासारखे कार्य आहे. अनेक लेखकांचे शब्द या पोर्टलमुळे समाजापर्यंत पोहोचले.
पुरस्कार म्हणजे समाजाने दिलेली पोचपावती असते. राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंख्य मान सन्मान म्हणजे जणू सातत्य, प्रामाणिकपणा, मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि लोकहिताचा ध्यास यांची समाजाने दिलेली पोचपावती आहे.
सहचारिणीचे सौ. अलका भुजबळ यांचे सहकार्य, निर्मितीतील सहभाग आणि स्वतःचे योगदान — हे या संपूर्ण प्रवासाला भक्कम आधार देणारे आहे. दोघे मिळून साहित्य व माध्यमविश्वात आदर्श जोडगोळी ठरली आहे.
शासकीय सेवेतील प्रामाणिक वाटचाल, दूरदर्शनमधील सर्जनशील योगदान, निवृत्तीनंतरही माध्यमाशी नाळ न तोडता नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन डिजिटल पत्रकारितेकडे केलेले यशस्वी पाऊल — हा प्रवास प्रत्येकासाठी “वय नव्हे, विचार महत्त्वाचे” हे शिकवतो.
अशा बहुआयामी, विचारशील, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाला मिळणारा प्रत्येक सन्मान हा केवळ त्यांचा नाही, तर मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा विजय आहे. आदरणीय देवेंद्रजी भुजबळ व आदरणीय सौ अलकाताई भुजबळ या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि लेखणीला अखंड ऊर्जा लाभो व अजून नवनिर्मिती होवो हीच सदिच्छा ! व परमेश्वर चरणी प्रार्थना !
विश्वभरारी फाउंडेशन मार्फत मिळालेल्या पुरस्काराबाबत हार्दिक हार्दिक अभिनंदन…!
मनःपूर्वक कौतुक…!!
आणि शतशः नमन…!!!

— लेखन : डॉ. चंद्रकांत हलगे. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
