आज गौरी पूजन. त्यानिमित्त गौराई वरील काही रचना पुढे देत आहे.
— संपादक
१. माझी गौराई
आली गौराई माहेरी
झाला आनंदीआनंद
लगबग सगळ्यांची
सारे स्वागतात दंग -१
ज्येष्ठा कनिष्ठा गौराई
आल्या बाई माहेराला
चला करू गं औक्षण
आनंदाने स्वागताला -२
दोन दिसांची पाहुणी
माझी लाडाची गौराई
करा आगतस्वागत
नको त्यात दिरंगाई -३
खीर,घावन घाटले
तिजसाठी रांधियेले
केले षड्रस भोजन
तैसे लाडू बांधियेले -४
गोठ पाटल्या कंकण
भरजरी साडीचोळी
चला सजवू गौराई
रुढी ती मराठमोळी – ५
आदराने भारावती
ज्येष्ठा कनिष्ठा भगिनी
सुखी माहेर पाहती
जाती आशिष देऊनी -६
— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली
२. अभंग : आली सोन पावलांनी
गौरी आगमन | जेष्ठ नक्षत्रात
सण आनंदात | घरोघरी ||१||
तिन दिस फक्त | सण माहेराशी
कधी सासराशी | जल्लोशात ||२||
नारी पुजे गौरी | अखंड सौभाग्य
सत्कर्णी सद्भाग्य | लाभतसे ||३||
कागदी प्रतीमा | पाच मडक्यांची
वा मुखवट्याची | मांडितसे ||४||
अष्टपदी ठसे | गौरी टेकवूनी
स्थापना करूनी | स्थापतसे ||५||
सोळा प्रकारचे | मिष्टान्न भोजन
दिप प्रज्वलन | आराध्याला ||६||
अखंडत्वे पूजा |महालक्ष्मी धन
शारदा स्तवन | विद्या प्राप्ती ||७||
नैवेद्याला होई | ती पुरणावती
मिळते संपत्ती | घरधन्या ||८||
तेरड्याचे रोप | शेवंती महती
कुंतली सजती | आनंदत्वे ||९||
जेष्ठा नि कनिष्ठा | माहेरी येतात
सवे लेकरात | पूजा होई ||१०||
नाना अलंकार | घाली आभुषण
करी पाचारण | माऊलीला ||११||
सौभाग्यवतींना | कुंकू हळदीला
दे खिरापतीला | हातावरी ||१२||
मुळ नक्षत्रात | ते कुंकूमार्चन
होई विसर्जन | त्रिजेदिनी ||१३||
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
३. “शिव गौरी”
अन्नपूर्णा देवीचे करू नित्य पूजन
भुकेल्याला करते तृप्त गौरी प्रेमानं IIधृII
गौरी भौतिक समृद्धी देवता अनन्य
देई अन्नधान्य वात्सल्य संपत्ती धन
मांगल्य कौटुंबिक सौख्य करी प्रदान II1II
शिव म्हणाले ब्रह्म सत्य मिथ्या जगत
गौरीला आला राग शिवांशी संवादात
शिवा तत्व न पटून गौरी पावली अंतर्धान II2II
गौरी गुप्त होता विश्र्वांतील संपले चैतन्य
गोडवा उडाला हरपले सौख्य घरपण
अकस्मात संपले जगातील अन्नधान्य II3II
विश्वातील सर्वांची दशा जाहली अन्नांन्न
शिवाला करिती याचना खायला द्यावे अन्न
शिव प्रार्थी पार्वतीला प्रजेला द्यावे अन्न II4II
रुक्मिणी द्वारकेतील सर्वांना देई भोजन
सुदामा पत्नी जेवू घाली सर्वांना रांधून
सर्व देवींना वंदन होई सर्वांचे कल्याण II5II
— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800