आपल्या न्यूज स्टोरी टुडे च्या नियमित लेखिका, पुणे येथील राधिका भांडारकर या सध्या अमेरिकेत आहेत. खास आपल्या पोर्टल साठी त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णने आपल्याला नक्कीच मोहित करतील. भांडारकर मॅडमचे मन:पूर्वक आभार. सुखद वास्तव्य आणि पर्यटनासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा
– संपादक
गेल्या वीस बावीस वर्षात आमच्या अमेरिकेत अनेक वार्या झाल्या. अर्धा पृथ्वीगोल व्यापणार्या अमेरिकेतील अनेक पर्यटन स्थळांना, शहरांना भेटी दिल्या. मात्र अमेरिकेतील एक महान आश्चर्य असणार्या ग्रँड कॅन्यनला भेट देण्याचा योग मात्र या खेपेस आला. या भेटीत वेचलेले अनेक मनोरम क्षण मी आपल्याशी वाटू इच्छिते. हा आनंद आपणासही मिळावा हीच इच्छा मनी बाळगून….
भाग १ (२४.९.२०२२)
आज सायरा (नात), ज्योतिका (कन्या), मी आणि विलास (जोडीदार) अटलांटाहून अमेरिकन एक्सप्रेसच्या विमानाने अॅरिझोना स्टेट मध्ये फ्लॅगस्टाफ या गावात आलो. प्रवासात डॅलसला आमचा चार तासाचा हाॅल्ट होता.
ग्रँड कॅन्यनला जाण्यासाठीचे हे पर्यटन स्थळ आहे.
इथल्या स्थानिक वेळेनुसार आम्ही रात्री साडे नऊला पोहचलो. ज्योतिकाने कार रेन्ट केली. सुंदर, मोठी ऐसपैस कार.
डलासला आम्ही डिनर घेतलेच होते. एग रोल्स, फ्राईड राईस, चिकन नुडल्स वगैरे.
फ्लॅगस्टाफ हे अमेरिकेतल्या अँरिझोना झोना राज्यातले, वाळवंट विस्तृत पर्वत आणि पाईन वृक्षांनी वेढलेले एक शहर.
कमी लोकसंख्या असलेलं आणि बेकारी नसलेलं शहर. यावेळेस इथले तपमान पंधरा ते सोळा डीग्री सेंटीग्रेड होतं. छान गुलाबी थंडी होती.

फ्लॅगस्टाफला हाॅलीडे ईन मध्ये बुकींग होतेच.
छान आरामदायी हॉटेल मध्ये आम्ही लगेच झोपेच्या अधीन झालो. प्रवासाने थकवा आलाच होता. अटलांटा आणि अॅरिझोनाच्या वेळेत तीन तासाचा फरक आहे…
(२५/०९/२०२२)
सकाळी लवकरच जाग आली. ज्योतिकाने दिवसभराची भटकंती योग्य पद्धतीने आखलेली होतीच.
ब्रेकफास्ट घेउन आम्ही लगेच निघालो. ज्युस, दही सीरीअल्स, आॅम्लेट वगैरे अमेरिकन ब्रेकफास्ट होता.
आजचे ध्येय होते हॉर्स शू बेन्ड हिल्स..
ड्राईव्ह अतिशय सुंदर होता. अॅरिझोना म्हणजे जगातील सर्वांत मोठे वाळवंट ! रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला विस्तीर्ण ओसाड प्रदेश. मध्ये मध्ये दिसणारी खुरटी पण हिरवट झुडुपे.गडद पिवळ्या रंगाची रानफुले.लालसर रंगाचे गवत. लांबच लांब पसरलेले पर्वत. अगदी निरभ्र निळे अथांग आकाश. निसर्गाचं एक अत्यंत निराळं पण देखणं रुप पाहून विस्मयीत झालो. भारतातले कच्छचे रणही आठवले.
वाटेत अनेक नैसर्गिक सँड ड्युन्स दिसले. अगदी रचून ठेवलेल्या वाळूच्या ढिगार्यासारखे दिसत होते.
आता आम्ही संपूर्ण डोंगरांच्या विळख्यातच होतो जणू. जिथे पहाल तिथे हे लाल रंगांचे दगडी कॅन्यन. या डोंगरांमध्ये निसर्गानेच अनंत आकाराची शिल्पेच बनवली आहेत जणू ! इतकी रेखीव आणि आकृतीबंध ! बघणार्याच्या नजरेने त्या शिल्पांना कुठलीही नावे द्यावीत. महाल मंदिरे, कळस, मखर, गाभारे नृत्यांगना, राजे, प्राणी, काहीही. अतिशय रेखीव आणि कोरीव. आणि हे सारंं नैसर्गिक !
मानवनिर्मीत शिल्पकला आतापर्यंत ठिकठिकाणी पाहिल्या. पण इथे एकमेव शिल्पकार म्हणजे निसर्ग. आम्ही रस्त्यात थांबत, फोटो काढत या निसर्गाच्या अप्रुपतेच्या आठवणी साठवत होतो.

हाॅर्सशूबेन्ड हाही एक नैसर्गिक चमत्कारच आहे. समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीवर स्थित आहे. एका उंच डोंगराभोवती घोड्याच्या नालेसारखी कोलॅरॅडो नदी वळसा घेत वाहते. समुद्रसपाटीपासून ही नदी एक हजार मीटर ऊंचावर आहे. आम्ही व्ह्यु पाॉईंट वरुन हे मनोहर दृष्य डोळ्यात साचवले. हिरवीगार संथ नदी.. जणू इतस्तत: विखुरलेल्या डोंगरांची सखीच…
व्ह्युपाॅइंटपर्यंत बरेच चालावे लागले होते. रणरणतं उनही होतं. मात्र हवेत सुखद गारवा होता. वार्याच्या झुळकी आनंददायी होत्या. प्रदूषणरहित वातावरण. आणि डोक्यावरचे नितांत निळे आकाश. त्यामुळे उन्हातले चालणे सुद्धा अजिबात कष्टदायी नव्हते.
मी सहज म्हटलं, भारतात अशा ठिकाणी खाद्य पेयांच्या टपर्या असतात. इथे तसे काहीच नाही. माझी नात लगेच म्हणाली, “here they dont want to ruin the nature”
किती खरे आहे हे !!
इथे फक्त निसर्गाच्या सहवासात रहा. आनंद वेचा. वाटेत लंच घेउन हाॅटेलवर परतलो.
संध्याकाळ थोडी रिलॅक्स्ड मुडमधे व्यतीत केली.
क्रमशः

– लेखन : राधिका भांडारकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484000