२६/०९/२०२२.
आजचा दिवस खूप महत्वाचा होता. याचसाठी केला होता अट्टाहास .. असेच म्हणावे लागेल.
सकाळी ब्रेकफास्ट घेउन आम्ही तयार झालो. ग्रँड कॅन्यन रेलरोड टुर तर्फे आजचा आमचा प्रवास होता. सकाळी आठ वाजता आमच्या हाॅटेलवर ट्रॅव्हल्सची व्हॅन आम्हाला घ्यायला आली. व्हॅन एकदम आरामदायी होती. आम्ही दहा प्रवासी होतो. निरनिराळ्या देशातील लोक होते ते.
आमचा ड्रायव्हर एकदम हसतमुख आणि भरपूर बोलका होता. जेआर असे त्याचे नाव होते. संपुर्ण प्रवासात तो अनेक किस्से, भौगोलिक माहिती आम्हाला पुरवत होता. गेट टू ग्रँड कॅन्यन या रेल्वेस्टेशनवर आम्ही एका ट्रेनमध्ये बसलो. हा ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर होता. गाडीत सर्व सुखसोयी आणि स्वच्छता होती. सुरेख अशी डायनींग कारही होती. विविध प्रकारचे नाश्ते आणि पेयांचा आस्वाद प्रवासी लुटत होते. गाडीत गर्दी, गडबड अजिबात नव्हती. मात्र सारे हमसफर मजेत, आनंदात होते. आजुबाजुच्या निसर्गासोबत संवाद करत चालले होते.

मधून मधून प्रवाश्यांची खबरबात घेणारा मदतनीसही होता. तो अॅरिझोना स्टेटचा इतिहासही सांगायचा. फोटोग्राफर होती. गिटारवादक होता. त्याने सुरेल संगीताने प्रवाशांचे मनोरंजन केले. पाईन ट्रीच्या जंगलातला हा आगगाडीचा संथ प्रवास अगदी अविस्मरणीय होता.
आम्ही ग्रँड कॅन्यन स्टेशनला पोहचलो. दोन तासाचा हा आगगाडीचा प्रवास कसा संपला ते कळलेच नाही. इथे आमची व्हॅन व ड्रायव्हर हजरच होते. प्रथम लंच घेतले, आणि नंतर प्रत्यक्ष ग्रॅड कॅन्यन ची सफर सुरु झाली.
अतिशय सुंदर, रेखीव आखीव गांव. इथे रहाण्यासाठी बैठे बंगले असतात. पण त्यासाठी तीन वर्षे आधी बुकींग करावे लागते.पहिल्या व्ह्यु पाॅईंटला आम्ही ऊतरलो आणि निसर्गाच्या त्या विस्तीर्ण, भव्यतेच्या दर्शनाने नि:शब्द झालो. अमेरिकेतल्या सात आश्चर्यांपैकी ग्रँड कॅन्यन हे एक नैसर्गिक भूगर्भीय आश्चर्य ! कॅन्यन म्हणजे दरी, खिंड आणि या दरीतली पर्वतासमान भासणारी अनेक आकारांची नैसर्गिक शिल्पे. लाखो वर्षापासून सातत्याने निसर्गचक्राच्या बदलानुसार ती निर्माण होत आहेत.
कोलोरॅडो नदीचा प्रवाह इथे पहायला मिळतो. जवळ जवळ ४४७ किलोमीटर पर्यंत कोलोरॅडो नदीचा प्रवाह इथे पसरलेला आहे.
जमिनीतून वर झेपावणारे असंख्य खडक या नदीच्या पाण्याच्या दाबाने कातरत गेले. शिवाय वाराही या खडकांना सतत कापत असतो आणि त्यातून ही असंख्य शिल्पे तयार झाली आहेत आणि मैलौन् मैल ती पसरलेली आहेत. बघणार्याच्या नजरेला जो दिसेल तो आकार. इथे राजवाडे, मंदीर दालने, गड किल्ले, गाभार, माणसे, प्राणी, पक्षी, अगदी गणपती, नंदीबैल, गरूड पक्ष्यांसारखे आकार पहायला मिळतात आणि निसर्ग हाच किमयागार !
ग्रँड कॅन्यनचे दोन विस्तीर्ण भाग आहेत. नाॅर्थ रीम आणि साउथ रीम.
आम्ही साउथ रीम परिसरात होतो. नाॅर्थ रीम येथे अनेक साहसी लोक ट्रेकींग, हायकिन्ग, गिर्यारोहण वगैरे करतात. आम्ही इथे डक ऑन द राॅक (duck on the rock) या पाॅइंटवर उतरलो.
अक्षरश: एक धारधार चोचीचं बदक पंख आत गोळा करुन एका प्रचंड दगडावर बसलंय् असाच भास होतो. १९५० साली आयसेन हॉवर यांनी या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी ते एक सामान्य नागरिक होते. त्यानंतर ते अमेरिकेचे प्रेसीडेंट बनले.
अर्थात हे सर्व आकार वारा वादळ पाण्यांनी बदलू शकतात. शंभर वर्षानंतर इथे कदाचित हे आकार नसतील. ते बदललेले असतील.
आमच्या गृपमधल्या एका अमेरिकन माणसाने मला चक्क “नमस्ते” असे म्हणून त्या लाल खडकांमध्ये खूप दूरवर बोट दाखवून म्हटले, See ..there is a Vishnu Temple” आणि खरोखरच, आपल्या हिंदु मंदिरासारखाच तो आकार होता.
या प्रवासात एक जाणवत होतं की जगाच्या पाठीवर माणूस हा फक्त माणूस असतो. त्यांच्या भावना, विचार, मनातली आंदोलने सारखीच असतात. तिथे वंश, धर्म, जात, भाषा याच्या कुठल्याही भिंती नसतात.
ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय याचा अनुभवच इथे जणू घेता आला. एक घारीसारखा पक्षी आकाशात विहरत होता. क्षणभर मला वाटले याच्या पंखावर बसावे आणि या भव्य दरीतली ही निसर्गाची किमया न्याहळावी. स्वर्ग म्हणजे आणखी वेगळे काय असेल ?
थोडे पुढे गेल्यावर वॉच टाॅवर पाॉईंटला कोलोरॅडो नदीचा प्रवाह पहायला मिळाला. याठिकाणी मात्र तिचा प्रवाह मलीन वाटला.
वाॅच टाॅवर पाॅईंटच्या परिसरात काही वर्षापूर्वी एका ढगामुळे, विमान कोसळून, हवाई कर्मचार्यांसकट सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले होते. याठिकाणी लिहिलेले ते वृत्त वाचत असताना एक महत्वाचे वाक्य माझ्या लक्षात राहिले “Where the technology and human efforts fails these disasters happen.” निसर्गासमोर मानवी प्रयत्न निष्फल ठरतात हेच खरे.
नोव्होवा नावाची एक इंडीअन जमात इथे आहे. त्यांनी त्यांचं हेरीटेज जपलेलं आहे. बदलत्या जगाचा भाग त्यांना व्हायचे नाही. अॅरिझोनाचा काही भाग हा त्यांचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून मानला जातो. तिथे अमेरिकन फेडरल रुल नसून नोहोव्हा जमातीचे रुल्स आहेत. त्यांचा अध्यक्षही निराळा आहे.

आम्ही ग्रँड कॅन्यनहून परतताना नोवोव्हा रिझोल्युशनला भेट दिली. तिथे मास्क घालणे सक्तीचे होते. त्यांचे आर्ट आणि क्राफ्ट चे दुकान सुंदर होते. तिथे त्यांची जीवनपद्धती दाखविणार्या कलाकृती पहायला मिळाल्या.
त्यांच्या जीवनाचे एकच ध्येय, या पृथ्वीचे रक्षण. निसर्गाला मूळ स्वरुपातच सांभाळणे.
मनात आले, खरोखरच आज काळाची ही गरज आहे.
क्रमशः

– लेखन : राधिका भांडारकर. ह.मु.अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800