Tuesday, September 16, 2025
Homeलेखग्राहकराणी जागी हो !

ग्राहकराणी जागी हो !

मुक्त अर्थ व्यवस्थेमुळे भारतीय बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. अशा वेळी ग्राहकांना ‘ग्राहक राजा जागा हो’ असं म्हणण्यापेक्षा ‘ग्राहकराणी जागी हो‘ असं प्रकर्षाने म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण बाजारपेठेत अधिक काळ रमणारी महिलाच आहे. १५ मार्च या जागतिक ग्राहक दिनानिमित्त हा विशेष लेख….

कुटुंबाची अर्थव्यवस्था आज महिलाच सांभाळत आहे. मग तो भाजीपाला असो की सोने खरेदी! स्त्री हीच केंद्रबिंदू म्हणून पुढे येत आहे. खरेदीचे जसे मानसशास्त्र आहे, तसेच विक्रीचेही मानसशास्त्र असते. मार्केटिंगचा विचार करताना या भूमिकेला अधिक महत्त्व येते. त्यामुळेच जाहिरातीमध्ये लहान मुलांचा व स्त्रियांचा अधिक खुमासदारपणे वापर होताना दिसतो.

स्त्रियांच्या मानसिकतेचा विचार केल्यास, नवनवीन वस्तूंची खरेदी करणे, हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्याचे दिसते. तथापि, खरेदी करताना महिलांकडून अनेकदा आवश्यक काळजी घेतली जातेच असं नाही. त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे ही कळत नाही. हातगाडी वर मिळणारी पर्स बार्गेनिंग करून ती घेते. पैसे कमी केल्याचे समाधान जसे तिला असते, तसेच अमुक मॉल मध्ये जास्त पैसे देऊन पर्स घेण्याचे समाधानही तिला असते. त्यामुळे ही फसवणूक असल्याचे तिला वाटत नाही. मात्र तिची ही मानसिकता महागात पडू शकते.

खरेदी करताना महिला जास्त चोखंदळ असतात. त्याच्या बरोबरच त्यांनी जागरूक व सजग असणेही आवश्यक आहे. खरेदी का, कुठे व कशी करतो, असे प्रश्न जर महिलांना पडले, तरच ती खरी “ग्राहकराणी” होईल.

अनावश्यक खरेदी ही एक फसवणूकच आहे.
पूर्वी महिला अधिक काटकसरीं असत. “टाकाऊतून” “टिकाऊ” आमच्या आईच्या पिढीपर्यंत आम्ही अनुभवले. मात्र, आता काळ बदलला आहे. बाजारपेठा फुलू लागल्या. महिला स्वतंत्र झाल्या. जग गतिमान झाले. अपेक्षा व राहणीमानही बदलले. अशा जमानात जुने टाकून नवे येऊ लागले; पण त्यामुळे आपण अनावश्यक खरेदी करतो का ? याचा विचार महिलांनी करावा.

कोणीतरी सांगितले किंवा दुसऱ्याकडे आहे, आपल्याकडेही तसेच असावे या भावनेतून गरज नसतानाही खरेदी होत असल्याचे दिसते. मालाची विक्री करण्यासाठी आकर्षक जाहिराती केल्या जातात; मात्र अनेक महिला त्याला बळी पडल्याचे दिसते.
महिलांनी या बाबी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. खरेदी आपल्या गरजेसाठी, आरोग्यासाठी व समाधानासाठी करतो, पण आज खरेदी करून किती समाधान मिळते ? याचा विचार व्हायला हवा. खरेदी करून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असेल, पश्चातापाची वेळ येणार असेल, तर ती जागरूकता कशी म्हणता येईल ?

मालावरील एम.आर.पी. पाहिले पाहिजे. फसवणूक, भेसळ होऊ नये म्हणून ब्रँडेड वस्तू घेताना त्यामध्येही ‘डुप्लिकेशन’, किंवा नाम साधर्म्यामुळे फसवणूक होत असते. विशेषत: औषधांबाबत डुप्लिकेशन जीव घेणे ठरू शकते. वस्तूचे वजन तपासणी, आयएसआय मानांकित वस्तू खरेदी करणे, विक्री व विक्रीपश्चात सेवांचा वापर करणे, पावतीचा आग्रह करणे व ती जपून ठेवणे, सोने खरेदी करताना हॉलमार्कसह १८, २२, २३, २४ कॅरेटसची तपासणी व गुणवत्ता पाहणे गरजेचे आहे.

घराची खरेदी असो, की भाजी खरेदी चोखंदळपणा बरोबरच सजग व जागरूक राहणे काळाची गरज आहे. महिलांच्या हाती पैशाबरोबरच निर्णय क्षमताही आली आहे. उद्याचे मार्केटिंगही लहान मुले व महिलांवरच केंद्रित असेल. अशावेळी महिला जागरूकतेने सामोरी गेली, तरच खऱ्या अर्थाने ती ‘ग्राहकराणी‘ ठरेल.

आज स्त्री सबला होऊ पाहत आहे. त्यामुळे पुढील काळात ‘मुकी बिचारी, कुणीही हाका’ असली मेंढरे बनू नका. उठल्या-सुटल्या कुणीही फसवा असले ‘ग्राहक’
बनू नका. असं म्हणण्याची वेळ या ‘ग्राहकराणी’ वर नक्कीच येणार नाही, असा विश्वास वाटतो.

गजेंद्र क्षीरसागर

– लेखन : गजेंद्र क्षीरसागर. अध्यक्ष,
अहमदनगर जिल्हा, ग्राहक पंचायत महाराष्ट्र
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments