शक्ति
१९८० चे दशक खऱ्या अर्थाने अमिताभ बच्चन ने गाजवलं होते. बरोबर चाळीस वर्षा पूर्वी “शक्ति” चित्रपट रिलीज झाला होता. तारीख होती १ ऑक्टोबर १९८२.
खरं तर १९५० ते १९८० ह्या कालखंडात भारतीय सिनेमाची व्याख्या आधी दिलीप कुमार आणि नंतर अमिताभ बच्चन या दोन दिग्गजांनी बदलूनच टाकली होती. आणि या दोघांनाच ह्या सिनेमात एकत्र आणून दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि लेखक सलीम-जावेद यांनी अशक्यप्राय गोष्ट करून दाखवली. जागतिक सिनेमाने अशी अभिनयाची जुगलबंदी ह्या आधी कधीच पाहिली नाही. हे दोघेही बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठे स्टार होते आणि त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेते मानले जातात.
रमेश सिप्पी यांना दिलीप कुमारसोबत काम करण्याची नेहमीच इच्छा होती आणि शिवाजी गणेशन यांची भूमिका असलेला ‘थांगा पाठक्कम’ हा चित्रपट त्यांना सापडला आणि त्याच्या रिमेकचे हक्क त्यांनी मिळवले आणि त्यांनी सलीम-जावेद यांना पटकथा लिहिण्यास सांगितले.
अमिताभ यांनी या चित्रपटाबद्दल ऐकले आणि त्यांनी सिप्पी ना विचारले की तो या चित्रपटाचा भाग कसा नाही ? आणि मग सलीम-जावेदच्या लक्षात आले की मूळ कथेत मुलाच्या भूमिकेला फारसा वाव नाही आणि लगेच त्यांनी चित्रपट पूर्णपणे पुन्हा लिहून काढला. अमिताभ आणि दिलीप दोघांनाही स्क्रिप्ट खूप आवडली. अमिताभ यांच्यासाठी तर त्यांच्या स्फूर्ती दैवता सोबत अभिनय करणे हे स्वप्न जणू पूर्ण झाले होते. दिलीप कुमार अमिताभच्या समर्पणाने खूप प्रभावित झाले होते.
एकदा चित्रीकरणादरम्यान, अमिताभ त्यांच्या ओळी वाचत असताना मोठ्या आवाजात बोलत असलेल्या चित्रपटाच्या क्रूवर तो प्रचंड नाराज झाला होता. दोघेही एकमेकांवर अलोट प्रेम करणारे आणि परस्परांच्या कलागुणांवर विश्वास ठेवत असल्याने इगो वगैरे भानगडी अजिबात आडव्या आल्या नाहीत. काही समीक्षकांना असे वाटले की स्क्रिप्ट दिलीपच्या बाजूने झुकली गेली आहे कारण मुलगा शांत आहे आणि त्याचा राग मनात त्याने दाबून ठेवला आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच अमिताभ वडिलांकडून दुखावला गेल्याने खूप शांत पणे सहन करत असतो, कारण तो वडिलांचा खूप आदर करत असतो. मात्र तोच अमिताभ जेंव्हा कुलभूषण खरबंदा, ज्याने त्याची लहानपणी सुटका केली असते आणि नंतर त्याला तुरुंगातून जामीन देतो तेव्हा अमिताभ दिलीपला सांगतो की, एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून तो जेवढा यशस्वी आहे तेवढाच तो एक बाप म्हणून अयशस्वी आहे आणि त्या क्षणी तो घर सोडतो. आणि तेव्हापासून तो मागे हटत नाही. त्याच्या दृष्टीने कुलभूषण हे त्याचे नवीन वडील आहेत आणि त्यांच्या साठी तो काहीही करायला तयार असतो.
चित्रपटात अनेक संस्मरणीय संघर्षाची दृश्ये आहेत आणि सलीम-जावेद यांनी ती उत्कृष्टपणे लिहिलेली आहेत. प्रत्येक संघर्षाच्या दृश्यात दिलीप कुमार यांच्या संवादांना अमिताभ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे आणि प्रेक्षक फक्त मंत्रमुग्धच झाले. सिनेमा रिलीज च्या वेळी, प्रेस अमिताभशी बोलत नव्हती आणि बहुतेक परीक्षणे दिलीपच्या बाजूने होती. दिलीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र तिथेच स्टेज वर दिलीपने अमिताभचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी रमेश सिप्पी यांना सांगितले की अमिताभ बरोबर कॅमेरा समोर परफॉर्म करणे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होते .
खरं तर दोन्ही अभिनेते, उत्कृष्ट स्क्रिप्ट असेल तर त्या चित्रपटाला संस्मरणीय करून ठेवायचं असा चंग बांधूनच काम करत आणि अमिताभ आजही तेच करतो. शक्ति मध्ये राखीच्या मृत्यूशय्येतील दृश्य हे अभिनयातील उत्कृष्ट दर्जाचे जिवन्त उदाहरण आहे. अमिताभच्या सूचनेनुसार ह्या दृश्यात एकही शब्द बोलला जात नाही परंतु दिलीप आणि अमिताभ ह्या दोघांचेही भाव मंत्रमुग्ध करून जातात.
राखी माझ्या मते एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. परंतु तिच्या प्रतिभेला फार थोड्या चित्रपटात वाव मिळाला आहे. ह्याच सिनेमात आणखी एक छान सीन म्हणजे अमिताभ घरी परततो आणि त्याच वेळी पोलीस अटक वॉरंट घेऊन येतात. त्यावेळी राखीच्या डोळ्यातील आर्तता मनाला चीर पाडून जाते.
काहींच्या मते ह्या चित्रपटाने अमिताभच्या अष्टपैलुत्वाला न्याय दिला नाही कारण ह्यात तो कॉमेडी आणि डान्ससह वन मॅन शो करत नव्हता. परंतु सलीम-जावेदच्या स्क्रिप्ट्स असलेल्या दीवार, त्रिशूल आणि काला पत्थर इत्यादी मध्ये तो असाच धीरगंभीर, रागीट आणि ह्रदयात ज्वालामुखी घेऊन बसला होता. आणि त्या सर्व भूमिका यशस्वी झाल्या.
स्मिता पाटीलसोबतचे अमिताभचे रोमँटिक सीन्स अफलातून होते. जेव्हा त्याला कळते की ती गरोदर आहे तेव्हा तो तिला त्याच्याशी लग्न करण्याबद्द्ल विचारतो आणि ती त्याला का ? असे विचारते. माझ्या मते हा सर्वोत्तम प्रपोजचा सीन आहे. अॅक्शन सीन्स जबरदस्त आहेत, अमिताभ पोलिसांच्या जीपमधून पळून जातो आणि ट्रेन जवळ येताच ट्रेनच्या रुळांवरून पळतो हे दृश्य विश्वास ठेवण्यासारखे आहे. तेव्हा कोणतेही CGI किंवा VFX नव्हते आणि टायमिंग अचूक असणे आवश्यक होते. अतिशय अफलातून सीन होता तो.
आर डी बर्मन चे कर्णमधुर संगीत हा चित्रपटा चा आत्मा आहे. “हमने सनम को खत लिखा” हे गाणे सदाबहार आहे.
एकूणच शक्ती मध्ये संगीत, संघर्ष, कारुण्य आणि सर्वोत्कृष्ट संवाद ह्यांचा अनोखा संगम आहे.
माझी पिढी ह्या आणि अश्याच सिनेमांवर जगली आहे. नव्या पिढीला मी आवर्जून सांगेन, हा सिनेमा नक्की एकदा तरी बघा, कारण अतिउच्च दर्जाच्या अभिनयाचं जणू काही हे विद्यापीठच आहे.

– लेखन : दीपक ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800