Saturday, April 26, 2025
Homeलेख‘जनसंपर्क’: आकाश कवेत घेणारे क्षेत्र !

‘जनसंपर्क’: आकाश कवेत घेणारे क्षेत्र !

भारतात दरवर्षी २१ एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय जनसंपर्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जनसंपर्क क्षेत्राचा सर्वागीण आढावा घेणारा लेख पुढे देत आहे. लेखक श्री विश्वजित भोसले हे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी असून पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया च्या मुंबई शाखेचे  सहसचिव आहेत. त्यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे. आपणा सर्वांना जनसंपर्क दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
— संपादक

आज कोणतेच क्षेत्र जनसंपर्काच्या प्रभावापासून दूर राहिलेले नाही . त्यामुळेच जनसंपर्क हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असणारी व्यक्ती ही नेहमीच महत्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणूनच या क्षेत्राची व या कामाची थोडक्यात ओळख करून घेणे आवश्यक आहे.

जनसंपर्क : उगम व विकास
जनसंपर्क म्हणजे  व्यावसायिक स्वरूपाचा संवाद होय.आधुनिक जनसंपर्काचा उगम विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिका व युरोपमध्ये झाला. आय.व्ही. बेटर ली यांना जनसंपर्क क्षेत्राचे जनक मानले जाते. त्यांनी जनमताला प्रभावीपणे आकार देण्याची कला म्हणून जनसंपर्क क्षेत्र विकसित केले.

प्रारंभी, जनसंपर्काचे कार्य फक्त माध्यमांशी संवाद साधणे आणि संस्थांची चांगली प्रतिमा तयार करणे इतपत मर्यादित होते. परंतु काळानुसार याचा विस्तार झाला आणि तो आज बहुराष्ट्रीय ते स्थानिक कंपन्या, केंद्र व सर्व राज्यांचे सरकार, विविध स्वतंत्र संस्था, राजकारण, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यांच्यासाठी अपरिहार्य झाला आहे.

जनसंपर्क आणि संवाद : सहसंबंध
जनसंपर्क म्हणजे संबंधित  संस्था व जनतेमध्ये विश्वास, समजूत आणि सहकार्य निर्माण करणारी एक  सतत चालणारी जनसंपर्क प्रक्रिया  समजून घेताना त्याचे मुलभूत घटक समजून घेणेही  महत्वाचे ठरते. जनसंपर्काच्या माध्यमातून नवीन विषय समजावून सांगताना कोण ? काय ? कधी ? कसे ? केंव्हा ? कोठे ? या प्रश्नांची खरी व पारदर्शकपणे उत्तरे द्यावी लागतात तरच तो प्रभावी जनसंपर्क ठरतो. तसेच जनसंपर्कात जे सांगितले जाते तेच व तसेच लोकांपर्यंत पोहचते काय व त्याचा अपेक्षित परिणाम साधला जातो काय हे पाहणे महत्वाचे ठरते. परिणाम साधला जात नसेल तर संवादात येणारे अडथळे लक्षात घेत संवाद साधनांत व प्रर्क्रियेत अनुरूप बदल करावा लागतो. थोडक्यात प्रभावी संवाद हा यशस्वी जनसंपर्काची गुरुकिल्ली आहे.

जनसंपर्काचे महत्व
जनसंपर्क क्षेत्र हे शासनाच्या कल्याणकारी राज्यासोबातच, विविध संस्था, उद्योग, किंवा व्यक्तीच्या यशामध्ये मोलाची भूमिका बजावते. एखाद्या संस्थेची प्रतिमा घडवणे, तिच्या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि संकटाच्या वेळी योग्य माहितीचा प्रसार करणे हे जनसंपर्काचे मुख्य उद्दिष्ट असते. राजकारण, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात जनसंपर्क अत्यंत आवश्यक ठरतो आहे. वाढती व्यावसाईक स्पर्धा ही जनसंपर्क क्षेत्राच्या उगमापासून पोषक ठरत आली आहे. चांगला जनसंपर्क अधिकाधिक लोकांना जोडतो आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण करतो. बदलत्या तंत्रज्ञाना सोबत अपडेट राहत असतो.

प्रभावी जनसंपर्काची माध्यमे
प्रभावी जनसंपर्क साधण्यासाठी पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही प्रकारची साधने महत्त्वाची भूमिका बजावतात.

सर्वप्रथम, प्रसिद्धी पत्रके ही त्या त्या संस्थेच्या बातम्या, उपक्रम, किंवा नविन घडामोडी माध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी ठरतात. आवश्यकतेनुसार  पत्रकार परिषदेद्वारे माध्यम प्रतिनिधींशी थेट संवाद साधता येतो, ज्यामुळे अधिक स्पष्ट व सखोल माहिती दिली जाते. तसेच उपस्थित केलेल्या शंकांचे यथायोग्य रित्या निराकरण केले जाते. पण पुरेशा तयारीनिशी पत्रकार परिषद आयोजित केल्या गेली नाही तर ती अंगलट येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

इलेक्ट्रॉनिक मीडिया (रेडिओ, टिव्ही) हे जनतेपर्यंत तात्काळ पोहोचण्यासाठी प्रभावी ठरते.

आज सोशल मीडिया हे सर्वात वेगवान व प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, यु ट्यूब  यांसारख्या अनेक माध्यमांतून जनतेशी थेट संवाद साधता येतो. या व्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील संस्थांकडून ई-मेल मार्केटिंग, ब्लॉग लेखन, वेबिनार्स आणि पॉडकास्ट्स यांचाही वापर वाढत चालला आहे.

आजच्या डिजिटल युगात वाढत जाणारी मुद्रित व ईलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडियाचा प्रभाव, ऑनलाइन न्यूज पोर्टल्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून जनसंपर्क क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. पारदर्शकता, विश्वासार्हता, संवाद कौशल्य आणि रणनीतीपूर्वक मांडणी ही या क्षेत्रातील यशाची त्रिसूत्री आहे आणि म्हणूनच जनसंपर्क हे प्रपोगंडा, जाहिरात यापासून वेगळे ठरते.

भारतीय जनसंपर्क क्षेत्र :
भारतात स्वातंत्र्यानंतर जनसंपर्काचे महत्त्व अधिक वाढले. सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जनसंपर्काच्या क्षेत्रात ‘साईट’, ‘खेडा’ सारखे विविध उपक्रम राबवले. जनसंपर्काचे यश पाहता नंतर खाजगी कंपन्यांनीदेखील आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी व प्रतिमा निर्मितीसाठी जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास सुरुवात केली. आजच्या डिजिटल युगात वाढत जाणारी मुद्रित व ईलेक्ट्रॉनिक माध्यमे,  सोशल मीडियाचा प्रभाव, ऑनलाइन न्यूज पोर्टल्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून जनसंपर्क क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. पारदर्शकता, विश्वासार्हता, संवाद कौशल्य आणि रणनीतीपूर्वक मांडणी ही या क्षेत्रातील यशाची त्रिसूत्री आहे. आणि म्हणूनच जनसंपर्क हे प्रचार, जाहिरात यापासून वेगळे ठरते.

आज केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व खाजगी क्षेत्र हे जण संपर्काचा प्रभावी वापर करत असून या तिघांचे जनसंपर्काचे दृष्टिकोन, साधने व कार्यपद्धती वेगवेगळी आहे. शासन हे व्यापक लोकहितासाठी जनसंपर्क करते. केंद्र शासन हे राष्ट्रीय पातळीवर काम करत असल्याने त्यांचे जनसंपर्क धोरण अधिक व्यापक असते. त्यात डिजिटल मीडिया, प्रसारमाध्यमे, तसेच अधिकृत प्रवक्ते यांचा समावेश होतो. धोरणात्मक निर्णय व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. राज्य शासन हे राज्यस्तरीय असल्याने जनसंपर्क अधिक राज्य व स्थानिक पातळीवर केंद्रित असतो. यामध्ये भाषिक व सांस्कृतिक घटक अधिक प्रभावी ठरतात. याउलट खाजगी क्षेत्रातील जनसंपर्क अत्यंत आधुनिक, जलद व ग्राहककेंद्रित धोरणांचा वापर करते. सोशल मिडिया, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, ब्रँडिंग स्ट्रॅटेजीज यांचा जास्त प्रभावी वापर खाजगी क्षेत्रात केला जातो, कारण आर्थिक वृद्धी व व्यावसायिक स्पर्धा हा खाजगी क्षेत्राचा पाया आहे.

पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया :
भारतातील जनसंपर्क व्यवसायाची आणि व्यावसायिकांची प्रतिमा उंचावणे, नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देणे आणि  जनसंपर्क व्यावसायिकांमध्ये ज्ञान व अनुभवाचे आदानप्रदान घडवून आणणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी १९५८ साली पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आली. भारतीय संस्था कायदा, 1961 अंतर्गत संस्था नोंदणीकृत आहे. संस्थेच्या देशात विविध ठिकाणी शाखा आहेत. या शाखा स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवतात. संस्थेकडून उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पुरस्कार आणि सन्मानही दिले जातात.

पहिली अखिल भारतीय जनसंपर्क परिषद ही नवी दिल्ली येथे २१ एप्रिल १९६८ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी २१ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय जनसंपर्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिवशी या संस्थेच्या देशभरातील शाखा व विविध शिक्षण संस्था यांच्याकडून भारतातील जनसंपर्क कार्य आणि व्यावसायिकांवर प्रकाशझोत टाकणे, जनसंपर्काची राष्ट्रीय विकासात भूमिका अधोरेखित करणे, या क्षेत्रातील बदलते प्रवाह जाणणे, नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना या क्षेत्राची ओळख करून देणे या उद्देशाने विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात येते.  

सध्या डॉ. अजीत पाठक हे ‘पीआरएसआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पीआरएसआय’ने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. डॉ. पाठक हे  ‘आंतरराष्ट्रीय पब्लिक रिलेशन्स असोसिएशन’च्या  कार्यकारिणी मध्ये निवडले गेले आहे. तसेच ‘ग्लोबल अलायन्स ऑफ पब्लिक रिलेशन्स अँड कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट’चे सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत.

जनसंपर्क : आव्हाने आणि संधी
सध्याच्या डिजिटल युगात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनसंपर्क या क्षेत्रांनी एकत्र येत अनेक नव्या शक्यता निर्माण केल्या आहेत. व्यवसाय, प्रसारमाध्यमं, शासकीय संस्था तसेच वैयक्तिक ब्रँडसाठी या तिन्ही क्षेत्रांची महत्त्वाची भूमिका बनली आहे. जनसंपर्क क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आता या क्षेत्रांची चांगली जाण असणे गरजेचे आहे. माहितीचे संकलन, विश्लेषण हे अधिक गतिमान व क्लिष्ट बनणारे आहे .त्यामुळे अर्थातच याचा प्रभाव संवाद प्रक्रियेवर पडणार आहे. गोपनीयता, नैतिकता व कायदेशीर बाबी यांचा विचार करत जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस अधिक सजगपणे व मानवी संवेदना जपत भूमिका पार पाडावी लागणार आहे. या सर्व बाबींचा व या क्षेत्राच्या वलयाचा विचार करता जनसंपर्क क्षेत्र हे आकाशाला कवेत घेणारे ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

विश्वजीत भोसले

— लेखन : विश्वजीत भोसले. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी मन की बात हा पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरून नवा पायंडा पाडला आहे. त्यातून जनसामान्यांच्या मधील प्रेरणादायी कामे, व्यवसाय, घटना यावर आधारित चर्चा हा पर्याय महत्त्वाचा आहे.
    १०, १२ वी च्या परीक्षा जीवनाला दिशा देणार्‍या असतात. त्या संदर्भात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
    आज २१ एप्रिल रोजी राष्ट्रीय जनसंपर्क दिवस म्हणून विश्वजीत भोसले सरांचा सविस्तर लेख आवडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on हे मंजूर नाही…..
शितल अहेर on हे मंजूर नाही…..
सौ. सुनीता फडणीस on हे मंजूर नाही…..
चेतना विनायक सवदी on संस्कृतीचा ठेवा
चेतना विनायक सवदी on संस्कृतीचा ठेवा
चेतना विनायक सवदी on संस्कृतीचा ठेवा
श्रुती सरदेसाई on संस्कृतीचा ठेवा
सौ. सुनीता फडणीस on संस्कृतीचा ठेवा
शितल अहेर on सखी अलका