Sunday, June 1, 2025
Homeयशकथाजर्मन विश्व : १८

जर्मन विश्व : १८

“हर्बर्ट ग्रोनेमेयर”

हर्बर्ट ग्रोनेमेयर हे जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या तिन्ही जर्मन भाषिक देशांमधील अत्यंत लोकप्रिय गायक, संगीतकार, निर्माते आणि अभिनेते आहेत. त्यांचे पूर्ण नाव हर्बर्ट आर्थर विगलेव क्लेमर ग्रोनेमेयर असे असून त्यांचा जन्म १२ एप्रिल १९५६ रोजी जर्मनी मधील ग्योटिंगेन शहरात झाला. त्यांचे बालपण, शालेय, महाविद्यालयीन शिक्षण बोखुम मध्ये पूर्ण झाले. अवघे आठ वर्षांचे असताना त्यांनी पियानो शिकायला सुरुवात केली आणि तेव्हाच त्यांना संगीतात रुची निर्माण झाली. ह्या शिकवण्यांचा उपयोग जेव्हा ते संगीतकार म्हणून बोखुम येथील स्थानिक नाटक कंपनीसाठी काम करायला लागले तेव्हा झाला. कोणतेही प्रशिक्षण नसताना त्यांनी सहजपणे अभिनेता म्हणून रंगमंचावर देखील आपली चुणूक दाखवली. त्याचवेळी ते ॲना हेन्केल नावाच्या अभिनेत्रीला भेटले, जी नंतर त्यांची पत्नी झाली.

यथावकाश हर्बर्ट ग्रोनेमेयर यांनी स्वतःचा संगीतकार, निर्माते म्हणून एक अल्बम प्रसिद्ध केला. त्यांचा हा पहिला अल्बम त्यांच्या स्वतःच्या आडनावावर म्हणजे “ग्रोनेमेयर” या नावाचा होता. तो १९७९ मध्ये बाजारात आला पण, अजिबातच चालला नाही. त्यांचा दुसरा अल्बम “झ्वो” १९८१ मध्ये प्रकाशित झाला, पण तो देखील लोकांच्या पसंतीस उतरला नाही. त्याच वर्षी त्यांनी “दास बूट” नावाच्या चित्रपटात काम केले. तो चित्रपट आणि त्यांनी रंगवलेले “लेफ्टनंट वेर्नर” हे पात्र लोकप्रिय झाले. ह्या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले.

पुढील सहा महिने हर्बर्ट ग्रोनेमेयर यांनी पूर्व जर्मनीमध्ये राहिले आणि संगीतावर लक्ष केंद्रित करून स्वतःचे १९८२ आणि १९८३ मध्ये दोन अल्बम आणले. परंतु दुर्दैव असे की ते दोन्ही वाईट पद्धतीने आपटले. याचा परिणाम म्हणून त्यांना त्यांचे संगीत कार्यक्रम व दौरे देखील रद्द करावे लागले. अथक प्रयत्नांचे फळ म्हणून पुढील वर्षी त्यांचा “4630 बोखुम” नावाचा अल्बम मात्र खूप गाजला. त्यातील “मेनर” (Men) हे गाणे जे पुरुषांबद्दल आहे ते खूपच महत्त्वाचे ठरले, ह्यात त्यांनी पुरुषांचे भरभरून कौतुक केले असले तरी वास्तवच मांडले आहे. हे गाणे तुम्ही खालील लिंकवर ऐकू शकता आणि त्याचा इंग्रजी अर्थ देखील वाचू शकता.

संगीत संयोजनाबरोबर हर्बर्ट ग्रोनेमेयर यांनी दूरचित्रवाणी वरील कार्यक्रमांमध्ये अभिनेता म्हणून काम करणे चालूच ठेवले. पुढील एका अल्बममध्ये त्यांनी तत्कालीन राजकीय सत्तेविरुद्ध अगदी उघडपणे नाखुशी दर्शवली. “सॉमर इन लेसमोना” नावाच्या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केले,यासाठी त्यांना ‘ॲडॉल्फ ग्रिम’ पारितोषिक मिळाले. एव्हाना त्यांचे संगीत क्षेत्रातील कार्य जर्मनी पुरते मर्यादित राहिले नव्हते. त्यांच्या गाण्यांचे इंग्रजी मधील भाषांतर देखील प्रसिद्ध होऊ लागले होते. १९८८ मध्ये ö अशा जर्मन नावाने प्रसिद्ध झालेल्या अल्बमचे इंग्रजी भाषेत नाव होते “what’s app this”. या अल्बमच्या यशामुळे त्यांना कॅनडा देशात दौरे करण्याची संधी मिळाली. तेथील श्रोत्यांना देखील त्यांनी मंत्रमुग्ध करून सोडले.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा दारुण पराभव झाल्यानंतर एका रात्रीत बांधलेली बर्लिन बॉल जेव्हा पाडली गेली आणि पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आले तेव्हा, लुक्सुस नावाच्या अल्बम मध्ये ग्रोनेमेयर यांनी लोकांच्या भावभावना मांडल्या. अत्यंत संवेदनशील अशा कलाकाराने असे काही करणे सहाजिकच होते.

ग्रोनेमेयर १९९८ दरम्यान लंडन येथे वास्तव्यास गेले. तिथे त्यांनी “ब्लाइब्ट आलेस अंडर्स” (Everything Remains Different) असा अजून एक सुपरहिट अल्बम श्रोत्यांना दिला. त्याच वर्षी त्यांची पत्नी आणि त्यांचा भाऊ चारच दिवसांच्या अंतराने गेले. त्या धक्क्यातून त्यांना बाहेर पडायला आणि परत कार्यमग्न व्हायला एक वर्ष गेले.

ऑगस्ट २००२ मध्ये आलेला मेंश (Human) नावाचा ग्रोनेमेयर यांचा अल्बम “प्लॅटिनम अवॉर्ड” चा मानकरी ठरला. तो प्रसिद्ध होण्याआधीच त्याच्या अनेक प्रति विकल्या गेल्या होत्या. त्याच्या चाहत्यांचा अंदाज घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा. हजारो, लाखो श्रोते आणि बेधुंद करणारी गाणी…

असे दोन वर्ष सतत ग्रोनेमेयर यांचे दौरे चालू होते. २००४ मध्ये त्यांनी अथेन्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक गेम्ससाठी गाणी बनवली तर २००६ मध्ये त्यांनी FIFA World Cup साठी गाणे गायले. दोन्ही खूप गाजली आणि प्रेक्षकांच्या उत्साहाला बहार आला.जर्मनीत अतिप्रिय असणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठीचे गाणे इथे ऐका …

जगात ज्या काही ठराविक क्षेत्रांसाठी जर्मनी देश ओळखला जातो, त्यातील एक म्हणजे संगीत आणि दुसरे म्हणजे फुटबॉल. या दोन्हीचा संयोग इथे पाहायला मिळतो. हर्बर्ट ग्रोनेमेयर चे योगदान ह्यात अनमोल आहे हे सांगायची गरज नाहीच. २०११ मध्ये आलेला त्याचा अल्बम शिफस्फेरकेहेर (schiffsverkehr) जर्मनी, ऑस्ट्रिया तसेच स्वित्झर्लंड मध्ये प्रथम क्रमांकाचा अल्बम म्हणून गाजला. अंदाजे साडेपाच सहा लाख श्रोत्यांनी या अल्बमला अगदी डोक्यावर घेतले.

टाईम मासिकाकडून हर्बर्ट ग्रोनेमेयर यांना २००५ मध्ये युरोपियन हिरो असे प्रेमाने व सन्मानाने म्हटले गेले. हा देखील त्यांच्या कामाचा एक प्रकारचा गौरवच आहे. २०१४ मध्ये त्यांना प्रसिद्ध “डावरेन्ड येट्झ्ट” ला गोल्डन कॅमेरा पारितोषिक प्रदान करण्यात आले. २०१५ मध्ये त्यांना राष्ट्रीय संगीत पुरस्कार देऊन देखील गौरविण्यात आले.

काही दिवसांपूर्वी आपण जर्मनी चे शास्त्रीय संगीत आणि संगीतकार माहीत करून घेतले होते जसे की मोझार्ट किंवा बीथोवेन आणि आता आपण हर्बर्ट ग्रोनेमेयर यांच्या माध्यमातून जर्मनी मधील आत्ताच्या संगीताची थोडक्यात ओळख करून घेतली. तुम्हाला कोणते आवडले आहे ते आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम