डॉ. विजय शिरिषकर
नमस्कार मंडळी.
आज पासून आपण दर मंगळवारी “झेप” हे प्रेरणादायी व्यक्तिमत्वांविषयीचे सदर प्रसिद्ध करीत आहोत. जेष्ठ लेखक, कवी श्री सुनील चिटणीस हे सदर लिहिणार आहेत. त्यांचे अनेक लेख, वृत्तांत, कविता आपण यापूर्वी आपल्या पोर्टल वर वाचल्या आहेतच. नवीन सदरासाठी श्री सुनील चिटणीस यांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
मी खेड येथील एल पी इंग्लिश स्कुल या शाळेत शिकत असताना विजय शिरिषकर हा माझा वर्गमित्र होता. त्याच्या घरची अत्यंत गरिब परिस्थिती होती. “अठरा विश्वे दारिद्र्य ” हे शब्द सुध्दा अपुरेच म्हणायला हवेत. तो आधी मुंबईला फितवाल बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील एका चाळीस चौरस फूट एवढ्या झोपडीत कुटुंबासह रहात होता. बकाल झोपडपट्टी म्हटलं की पोरं वाह्यात, मवाली, बकाल दादागिरी, हाणामारी हे ओघाओघाने येतेच. त्यातून विजय कसा बरं सुटणार? मग या वाया गेलेल्या पोराला कोंकणातल्या अळसुरे (खेड – रत्नागिरी) या त्याच्या मुळ गावी गुरे राखायला म्हणून पाठवलं गेलं. गुरे राखली तरच दोन वेळचं जेवण मिळणार अन्यथा उपाशी, या बोलीवर आलेला तो गुरं राखून अर्धा दिवस आमच्या शाळेत यायचा कारण शिकायची जिद्द निर्माण झाली होती. फारच भयानक अवस्थेतून पायरी पायरी चढत ओलांडत तो एम डी, डॉक्टर झाला.
विजयने सुरवातीला काही वर्ष नोकरी केली. पण स्वतःचा दवाखाना सुरू करायचाच हे स्वप्नं त्याला गप्प बसू देत नव्हते. शेवटी त्याने नोकरी सोडली आणि स्वतःचा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि त्याचेच फळ म्हणजे आज वसई येथे धन्वंतरी टॉवर्स हा अकरा मजली, चाळीस हजार चौरस फूटांचा चक्क मिनार त्याने उभा केला.

आयुष्यात स्थिर स्थावर होताच समाजाचे माझ्यावर अनंत ऋण आहेत हे भान जागृत ठेवून विजय सामाजिक कार्यात भाग घेऊ लागला. दर वर्षी किमान तीन मुलांना शिक्षण देण्याची पूर्ण आर्थिक जबाबदारी त्याने स्वतः घेतली. खेळांसाठी मुलांना आर्थिक मदत करणे त्याने सुरू केले. गावावरून आलेल्या अडल्यानडल्या गावकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला.

हे सर्व सुरू असताना जेष्ठांकरीता काहीतरी सेवा सुरू केली पाहिजे, त्यांच्या अडी अडचणी सोडवल्या पाहिजेत, त्यांच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रु वाहताना पहायला मिळाले पाहिजेत ही भावना प्रकर्षाने वाढायला लागली अन त्यातूनच जन्माला आला “डॉ विजय शिरिषकर वृद्धाश्रम”. वसईजवळच पापडी – उमेळा फाट्यावर त्याने हा वृद्धाश्रम सुरू केला असून आजमितीस पन्नासहून अधिक आजी आजोबा या वृद्धाश्रमात दाखल असून काही आजी आजोबा प्रतिक्षा यादीवर आहेत, हे विशेष. या वृद्धाश्रमाची खास देखरेख करण्यासाठी त्याने किंजल ट्रस्टचे श्री अनुसे सर यांची यशस्वी मदत घेतली आहे. स्वच्छ नीट नेटका परिसर, खोल्या, आवश्यक त्या त्या गरजांची पुर्तता, वैद्यकीय सेवा सुविधा, त्यांच्या करिता मनोरंजनाच्या सोयी सुविधा अन या पेक्षाही हे पन्नास जण म्हणजे पूर्वीच्या काळी एका मोठ्या वाड्यात वास्तव्य करणारे एक मोठ्ठे कुटुंब या भावनेनी समस्त आजी आजोबा व त्यांचा नातू म्हणजेच डॉ. विजय शिरिषकर इतकं कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं निर्माण करून आपल्या स्वतःच्या आई बाबांची जितकी काळजी घ्यावी त्याच तन्मयतेने, वेळप्रसंगी त्यांच्या डोळ्यातील टिपे पुसण्याचे, रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नाते जपण्याचे अनमोल कार्य त्याच्या हातून होत आहे, याचा मला मित्र म्हणून खूपच अभिमान आहे.

विजयने ‘ वाया गेलले पोर ‘ हे त्याचे आत्मकथन लिहिले आहे. हे आत्मकथन अत्यंत वाचनीय असून ते वाचताना अनेकदा आपल्या डोळ्यातून अश्रु ओघळत रहातात. त्याचे कौतुक करावे तितके थोडेच असे आपोआप वाटत रहातेच. आजही डॉ. विजयची अन माझी जुळून आलेली अत्यंत ऋणानुबंधाची मैत्री छान सप्तरंगी इंद्रधनुसारखी अशीच आहे.
माणुसकी संपत चाललेय असं आपण म्हणतो पण अजून काही काही मनांमध्ये माणुसकीचा ओला झरा, श्रावणातली हवी हवी ओलेती रिमझिम, ऐन उन्हाळ्यात शितल थंडाईचा गारवा देणारी डॉ. विजय शिरिषकर यांचे सारखी मानवतावादी व्यक्तिमत्व समाजात आहेत जी इतरांना खरोखरच आशेचा किरण असतात. असे किरण प्रत्येकाच्या शेणाने सारवलेल्या वा चकचकीत ग्रॅनाईटच्या लाद्या बसवलेल्या अंगणात वा ओपन स्पेसमधे पडत राहू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना.

— लेखन : सुनील चिटणीस
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
झेप ही प्रेरणादायक कथा.