Homeयशकथाझेप : 23

झेप : 23

अनिल राजपिसे”

कधी कधी आयुष्यात अशा काही व्यक्ती भेटतात की त्या आपल्या विचार विश्वावर कायमचा ठसा उमटवून जातात. काही उद्योग पाहतो आणि आपण प्रभावित होतो; परंतु काही उद्योग असे असतात की ते केवळ व्यवसाय नसून राष्ट्रनिर्मितीचे, पर्यावरण संवर्धनाचे आणि हजारो कुटुंबांच्या भविष्याचे केंद्र बनतात. अशाच एका अद्भुत प्रवासाचा अनुभव मला नुकताच आला.

माझा मुलगा अहमद, माझे सहकारी श्री. योगेश देसाई यांच्यासमवेत नुकताच मला सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे उभारलेल्या राज प्रोसेसच्या अत्याधुनिक CBG (Compressed Bio Gas) प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला. ही भेट म्हणजे केवळ एका उद्योगाची पाहणी नव्हती, तर एका ध्येयवेड्या, दूरदृष्टी असलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मराठी उद्योजकाच्या स्वप्नांचा प्रत्यक्ष अनुभव होता. या प्रकल्पाचे शिल्पकार आहेत अनिल राजपिसे. काही अपरिहार्य कारणांमुळे ते त्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांची उपस्थिती नसतानाही त्यांच्या कार्याची छाप प्रत्येक ठिकाणी जाणवत होती.

राजपिसे सरांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती देण्याची जबाबदारी श्री. रोहित माने यांच्यावर सोपवली होती. त्यांनी अत्यंत आत्मीयतेने, अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि संयमाने आम्हाला संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली.
प्रकल्प पाहताना सर्वात प्रथम मनात आलेला विचार म्हणजे, “हा केवळ एक उद्योग नाही, तर भारताच्या हरित ऊर्जेच्या भविष्यातील एक भक्कम पाऊल आहे.”
विशेष अभिमानाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच या ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे. देशातील पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात हा प्रकल्प एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जात आहे. केंद्र सरकार ज्या हरित ऊर्जा क्रांतीचे स्वप्न पाहत आहे, त्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार देणाऱ्या प्रकल्पांमध्ये या प्रकल्पाची गणना होत आहे.
नेपिअर गवतासारख्या कृषी स्रोतांपासून बायोगॅस निर्मिती करून त्याचे CBG मध्ये रूपांतर करणे ही अत्यंत दूरदृष्टीची कल्पना आहे. आज संपूर्ण जग ऊर्जा संकट, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या समस्यांशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणपूरक, शाश्वत आणि स्वदेशी ऊर्जेचा मार्ग दाखवणारे हे कार्य खरोखरच राष्ट्रसेवेचे कार्य आहे.

अनिल राजपिसे सरांच्या यशामागे कोणतीही मोठी पार्श्वभूमी नव्हती, कोणतेही तयार साम्राज्य नव्हते. त्यांनी आपल्या कष्टाने, जिद्दीने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने स्वतःचा मार्ग निर्माण केला. अनेक संकटे, अडथळे आणि संघर्ष यांचा सामना करत त्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले आहे.

आज आपण जे भव्य प्रकल्प, आधुनिक कार्यालये, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हजारो लोकांचा सहभाग पाहतो, त्यामागे अनेक वर्षांची मेहनत, त्याग आणि अविरत संघर्ष दडलेला आहे. यशाचा मुकुट प्रत्येकाला दिसतो; पण त्या मुकुटा मागील काट्यांचा प्रवास फार थोड्या लोकांना माहिती असतो.

खंडाळा येथील प्रकल्प पाहिल्यानंतर आम्ही पुणे येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. तेथील व्यवस्थापन, शिस्त, कार्यपद्धती आणि कामाची संस्कृती पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो. आज राज प्रोसेस समूहा मध्ये सुमारे १२०० कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच १२०० कुटुंबांच्या आयुष्याला या उद्योगाने स्थैर्य, सुरक्षितता आणि आशा दिली आहे. कोणत्याही उद्योजकासाठी हीच सर्वात मोठी समाजसेवा असते.याहून मोठा अभिमान म्हणजे एका मराठी उद्योजकाने आपले कार्य जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. कंपनीचे ब्राझील येथे आंतरराष्ट्रीय कार्यालय कार्यरत आहे. महाराष्ट्रातील एका उद्योजकाची स्वप्ने आज सातासमुद्रापार पोहोचली आहेत. ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे.

अनेकदा असे म्हटले जाते की मराठी माणूस नोकरीत चांगला असतो; उद्योगात नाही. पण अनिल राजपिसे सरांसारखी व्यक्तिमत्त्वे या चुकीच्या समजुती मोडून काढतात. ते सिद्ध करून दाखवतात की मराठी माणूस केवळ उद्योग करू शकतो असे नाही, तर जागतिक स्तरावर नेतृत्वही करू शकतो.

आमच्या भेटीदरम्यान आम्ही अनिल सरांच्या वतीने श्री. रोहित माने यांचा सन्मान केला. त्यांनीही अत्यंत नम्रतेने सरांच्या वतीने आमचा सत्कार केला. हा सन्मान केवळ औपचारिक नव्हता; तो परस्पर आदर, विश्वास आणि माणुसकीचा सुंदर आविष्कार होता.

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक कंपन्या मोठ्या होतात, पण प्रत्येक कंपनी मोठी संस्कृती निर्माण करू शकत नाही. राज प्रोसेस मध्ये आम्हाला एक वेगळीच कार्यसंस्कृती अनुभवायला मिळाली. प्रत्येक कर्मचारी संस्थेचा भाग असल्याचा अभिमान बाळगत होता. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील संवादात आदर होता. व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता होती. प्रत्येक ठिकाणी सकारात्मक ऊर्जा जाणवत होती.खरंतर कोणत्याही उद्योगाची खरी ताकद यंत्रांमध्ये नसते; ती माणसांमध्ये असते. आणि माणसे जिंकण्याची कला अनिल राजपिसे सरांनी आत्मसात केलेली दिसते.

आज मी तरुणांना, विद्यार्थ्यांना, उद्योजकांना आणि शेतकरी बांधवांना एक गोष्ट सांगू इच्छितो, भविष्य ऊर्जा क्षेत्रात आहे. येणाऱ्या काळात ग्रीन एनर्जी, बायोफ्युएल, CBG, सौर ऊर्जा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान हेच विकासाचे केंद्रबिंदू असतील.
ज्या लोकांनी आजपासून या क्षेत्राचा अभ्यास केला, त्यामध्ये गुंतवणूक केली आणि नावीन्य आणले, तेच उद्याचे नेतृत्व करतील. भारताची ऊर्जा क्रांती सुरू झाली आहे आणि त्यामध्ये अनिल राजपिसे सरांसारखे उद्योजक अग्रस्थानी आहेत.

मी मनापासून म्हणू इच्छितो की अनिल राजपिसे सर हे केवळ उद्योगपती नाहीत; ते स्वप्नांना दिशा देणारे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी सिद्ध केले आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करता येते.
त्यांच्या कार्याला माझा मनःपूर्वक सलाम ! श्री. रोहित माने आणि संपूर्ण राज प्रोसेस परिवाराचेही मनःपूर्वक आभार. आपण दिलेला वेळ, दाखवलेली आत्मीयता, केलेले मार्गदर्शन आणि अनुभवलेली उत्कृष्ट कार्यसंस्कृती आम्ही कायम स्मरणात ठेवू.

शेवटी एवढेच…
“काही लोक उद्योग उभे करतात, काही लोक संपत्ती उभी करतात, पण काही असामान्य व्यक्ती अशी असतात, ज्या उद्योगासोबत माणसे घडवतात, रोजगार निर्माण करतात, समाज घडवतात, देश घडवतात आणि शून्यातून विश्व निर्माण करतात.” अनिल राजपिसे सर हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.
त्यांच्या कार्याला, संघर्षाला, दूरदृष्टीला आणि राष्ट्रहिताच्या भावनेला माझा मनःपूर्वक प्रणाम !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !

— लेखन : महेबूब कासार. निवृत्त उपायुक्त, वस्तू व सेवाकर विभाग, नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments