Homeसाहित्य"तितली" प्रस्तावना

“तितली” प्रस्तावना

आपल्या पोर्टलच्या नियमित लेखिका शुभांगी पासेबंद यांच्या “तितली” कादंबरी साठी डॉ  निर्मोही  फडके यांनी लिहिलेली सुंदर प्रस्तावना पुढे देत आहे. लेखिका शुभांगी पासेबंद यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
— संपादक

‘कादंबरी’ हे साहित्य लेखनातलं एक आव्हान आहे. मराठी साहित्याचं वाचन किंवा अभ्यास करणाऱ्यांच्या परिवारात ‘कादंबरी’ ही नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. मुळात भारतीय साहित्य-संस्कृतीचा परीघ हा मौखिक लोककथा, वेद-साहित्य, रामायण, महाभारत महाकाव्यं, मध्ययुगीन आख्यान परंपरा इत्यादींनी विस्तारलेला आणि पुष्ट आहे. त्यामुळेच कदाचित भारतीय भाषांमधल्या साहित्यकृतींचं लेखन-वाचन करणाऱ्यांच्या ‘डीएनए’ मध्ये ‘कादंबरी’ सारखी दीर्घ लेखनकृती लिहिण्याचे आणि वाचण्याचे ‘पेशन्स’ आजही जाणीव-नेणिवांच्या पातळीवर जागृत राहिले असावेत.

जाणीवपूर्वक जगताना दमन झालेल्या किंवा केलेल्या काही मानवी भावनांच्या नेणिवेच्या गूढरम्य पटाचे धागे जेव्हा एखाद्या कादंबरीतून विणले गेलेले दिसतात, तेव्हा ती कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. लेखिका शुभांगी पासेबंद लिखित आणि निखिल प्रकाशनाकडून प्रकाशित ‘तितली’ ह्या त्यांच्या पहिल्याच कादंबरीच्या बाबतीत ‘वाचकाला खिळवून ठेवण्याचा’ हा निकष सर्वार्थानं लागू होतो.
शीर्षकावरून ह्या कादंबरी बाबत वाचक आराखडे मांडतील की, ही नायिकाप्रधान कादंबरी असावी. ती तशी आहे, मात्र तरीही त्यात विषय-आशय यांच्या बाबतीत एक अंगभूत वेगळेपण आहे.

शुभांगी पासेबंद ह्यांनी जेव्हा मला ही कादंबरी वाचण्यासाठी पाठवली तेव्हा आधी एक वाचक म्हणून मला कादंबरीच्या विषयानं आकर्षित केलं. आमच्या मैत्रीपूर्ण नात्याला अनुसरून त्यांनी माझ्यावर ‘तितली कादंबरी ची प्रस्तावना लिहिण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे, ‘तितली ला. वाचकांसमोर आणताना त्याबद्दल थोडक्यात, पण नेमकेपणानं काही मांडत आहे.

लेखिका शुभांगी पासेबंध

‘तितली’ ही एका तरुणीची कहाणी आहे. जी भूतकाळ आणि वर्तमानकाळ ह्या दोन बिंदूंवर आंदोलित होताना दिसते. ‘तितली’ ही नायिका तिच्या नावाप्रमाणे साधी, चांगल्या अर्थाने चंचल जीवन सौंदर्याचे कण टिपणारी आहे. तिचं इतिहास विषयाचं अभ्यासक असणं हे तिच्या आयुष्याला कसं कलाटणी देतं, हे वाचक ‘तितली’मधून अनुभवतो.
मराठी साहित्यात अनेक कादंबऱ्यांचे विषय हे इतिहासकालीन घटनांचे संदर्भ घेऊन, त्यांचा वर्तमानकाळाशी संबंध जोडत मांडलेले दिसतात. त्या प्रत्येकाच्या मांडणीत वैविध्य आहे, हे नमूद करायला हवं. ‘तितली’ कादंबरी तशाच प्रकारच्या संकल्पनेतून आकारास आली आहे, तरीही आपलं वेगळेपण राखून आहे.

हमनवाबाद ह्या ऐतिहासिक ठिकाणी तितली ह्या तरुणीचं जाणे, त्यामागचं तिचं प्रयोजन, तिला भेटलेली नवी माणसं, तिच्या आयुष्यात आधी असलेली माणसं, मार्गातल्या अडचणी, तिचे अनुभव, तिचं त्यावरील चिंतन, तिच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी आणि तिचा निर्णय इत्यादींचा आडवा-उभा छेद घेत मांडलेला कोलाज म्हणजे ‘तितली’ होय. ही ‘तितली’ जितकी रंगीबेरंगी आहे, तितकीच काळी-पांढरी-ग्रे देखील आहे. मानवी भावनांची आणि संबंधांची गुंतागुंत ती मुद्दाम उलगडत नाही, तर सहजरीत्या आपल्यासमोर ठेवते. एके ठिकाणी तितली म्हणते, ‘आयुष्य जसं समोर आलं, तसं मी त्याला तोंड देत गेले. ‘आधुनिक काळातली असूनही ती स्वतःला ‘आधुनिक’ मानत नाही. मात्र तथाकथित आधुनिकतेच्या पलीकडचं असं नवविचारांचं वारं मात्र सवे घेऊन ही तितली स्वैरपणे नाही, पण स्वच्छंदपणे जगू पाहते. तिच्या ह्या मनस्वी जगण्याला छेद देणारी तिची स्वतःची रक्ताची माणसं आहेत. प्रेमसंबंधातील माणसं आहेत. मात्र ती स्वतःच्या इवल्याशा पंखाच्या बळावर जमेल तशा नव्या भराऱ्या मार्ग शोधत राहते. फसवणूक, धोका, निराशा, दुःख आणि वेदना इत्यादींच्या पलीकडचा आनंद-मार्ग शोधण्याचा तितलीचा प्रवास म्हणजे ‘तितली’ ही कादंबरी.

सुरुवातीला ज्या डीएनएचा उल्लेख केला, तो आपल्या इतिहासाशी जुळलेला आपला डीएनए आयुष्यात आपल्याला पुन्हा त्या भूतकालीन वळणावर आणून सोडत असतो का ? बेगम बानो आपल्यामध्येच आहे, हे तितलीला का वाटू लागते ?
असे सवाल आपल्याला पडतात, तेव्हा ही कादंबरी मानसशास्त्रीय सिद्धान्ताचा एक मजबूत धागा आपल्या रचनेत विणत गेल्याचं लक्षात येतं. तर गावात विवाहितेची हुंड्यापायी आत्महत्या, जातीबाहेर किंवा धर्माबाहेर विवाह करणाऱ्यांचे प्रश्न, प्राॅपर्टी वरून घरामध्ये वाद इत्यादी घटना अत्याधुनिक काळातही अस्तित्वात असलेल्या सामाजिक समस्यां बद्दल काही सांगू पाहतात. हमनवाबाद, बेगम बानूची कबर, तिथला परिसर, फिरोजच्या घरातलं वातावरण इ. वर्णनात्मक भाग हे कादंबरीच्या कथानकाची पार्श्वभूमी प्रभावी करतात. तसेच तितलीव्यतिरिक्त असलेल्या व्यक्तिरेखा ह्या कथानकाला सशक्त बनवतात. प्रथमपुरुषी निवेदनातून समोर येणारं तितलीचं जीवनविषयक चिंतन हे भावनांच्या आणि विचारांच्या वळणवाटा वर नैसर्गिकरीत्या प्रवाहित झालेलं दिसतं. ‘तितली’च्या आयुष्याचा पट हा केवळ त्या एका व्यक्तीपुरत्या मर्यादित न राहता विस्तारत गेलेला दिसतो.
अर्थात कोणतीही लेखनकृती ही १००% उत्तम असू शकत नाही. काही कमी-जास्त असणं हे नैसर्गिक आहे. ‘तितली मध्ये काही ठिकाणी लेखिकेची लेखणी, जरा अघळपघळपणे मोकळी वाट चालल्यामुळे फसल्या सारखी वाटते. त्यामुळे, लेखनात पुसट, अपुरेपणा आल्याची जाणीव होते. उत्तम भाषाशैलीच्या अपेक्षेला हे मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा मोजक्या त्रुटींसहदेखील ‘तितली’ आपल्या मनाचा ताबा घेते, हे अधोरेखित करायला हवं.

काळ आणि अवकाश हे कादंबरी लेखनातले महत्त्वाचे घटक असतात, जे कादंबरीला बांधीव स्वरूपही देतात, त्याच वेळी तिला प्रवाही देखील ठेवतात. वास्तव आणि कल्पित ह्यांचा सहजसुंदर मिलाप म्हणजे ‘कादंबरी’ होय. ती कोणत्याही काळातली असली, तरी तिला मानवीय वास्तवासह कल्पिताचे स्पर्श असले तर ती अधिकाधिक खरेपणाच्या निकषांवर उतरते. ह्या अशा विरुद्ध जाणाऱ्या रेषाच सुंदर आकृती निर्माण करतात. माणसाचं जगणं असंच व्यामिश्र असूनही सुंदर आहे, म्हणूनच त्याचे जीवन-दर्शन घडवणारी कादंबरीही व्यामिश्र असते. ‘तितली’ मध्ये ही व्यामिश्रता जाणवते, म्हणून ती वाचनीय आणि चिंतनीयही झाली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ जिजा आर्ट्स ने बनवलं असून रंगीत आहे. तरुण, आधुनिक, तरीही पारंपारिक अशी नायिका मुखपृष्ठावर चितारली आहे

आकारानं लहान, रुचकर (शाॅर्ट ॲंड स्वीट) आणि चटपटीत असं वाचन करणाऱ्या किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा मुबलक वापर करत वाचन करणाऱ्या आजच्या वाचकांसमोर ‘कादंबरी सारख्या दीर्घ साहित्य-प्रकारातली लेखनकृती ठेवायचे धाडस लेखिका शुभांगी पासेबंद ह्यांनी केलं आहे, जे कौतुकास्पद आहे. त्यांच्या ‘तितली’ ह्या  कादंबरीचं स्वागत रसिक वाचक, अभ्यासक मनापासून करतील ह्या खात्रीसह, लेखिका शुभांगी पासेबंद ह्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखन-वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

— लेखन : निर्मोही फडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments