देवा तुला घडवीता
जीव दमला थकला
कसे घडवितो तू रे
साऱ्या सृष्टीचा इमला
आलो बघ कुशीतच
माय बाप तूच वाटं
तुझ्या चिंतनानं देवा
चिंता जळमट फिटं
नगं काही नगं मला
तुझी साधना घडू दे
राकट ह्या हातातून
मूर्त सुकुमार घडू दे
तुझ्या रूपाचा गोडवा
कसा आणू मी थकतो
चित्त माझं पायापाशी
तुझ्या जवा मी ठेवतो
एक तेज आत येतं
परकाश हो साकार
तुझी मूर्त काळजात
मग मातीचा आकार
दर वरसाला तुझी
आस लागती जीवाला
तूच जवळचा माझा
सखा मैतर झालेला
तुझ्याइना पानांची बी
सळसळ व्हत न्हाई
तुच करता करविता
श्वासासंग तूच ऱ्हाई
आज निजतो जरासा
तुझ्या अंगाखांद्यावर
आपसुक आशीर्वाद
ऱ्हावो समद्या लेकरांवर
ज्याला गवसला तू रं
त्याला काय पाह्यजेल
नीज सुखाची लागावी
चार दाणं मुखी घाल

— रचना : डॉ.मंजूषा कुलकर्णी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800