Friday, October 17, 2025
Homeयशकथादेवेंद्र भुजबळ यांचा प्रेरक प्रवास

देवेंद्र भुजबळ यांचा प्रेरक प्रवास

रेडिओ मुलाखतीतून उलगडला  देवेंद्र भुजबळ यांचा प्रेरक प्रवास

दहा वर्षाचे असताना पितृछत्र हरपले… घरची परिस्थिती …बिकट झाली..
यातून परिस्थितीवर मात करीत शिक्षण पूर्ण करीत मुद्रित माध्यमा पासून ते दृक्श्राव्य माध्यमापर्यंत आणि आता वेब पोर्टलचे संपादक हा सगळा प्रवास प्रेरक आणि थक्क करणारा आहे. देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या मुलाखतीतून हा प्रवास श्रोत्यांपर्यंत मांडत देश-विदेशातील श्रोत्यांची मने जिंकली.

..निमित्त होते ‘रेडिओ विश्वास‘ या इंटरनेट रेडिओवरून शनिवारी प्रसारित झालेल्या न्यूज स्टोरी टुडे या लोकप्रिय वेबपोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या मुलाखतीचे..! ‘रेडिओ विश्वास‘ वरून ‘आजचे पाहुणे‘ या सदरात दर शनिवारी मान्यवरांच्या मुलाखती प्रसारीत होत असतात. हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय असून कार्यक्रमाचे श्रोते केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून जगभर आहेत. शनिवारी दुपारी एक वाजता ही मुलाखत प्रसारित करण्यात आली आणि रात्री दहा वाजता त्या मुलाखतीचे पुन्हा प्रसारण करण्यात आले.

नाशिक येथे मुख्यालय असलेल्या रेडिओ विश्वासच्या समन्वयक, एकपात्री कलाकार, लेखिका मेघना साने यांनी ही मुलाखत घेतली .

मेघना साने

दहावी नापास ते माहिती संचालक पदापर्यंतच्या जीवनसंघर्षावरील अनेक प्रश्न विचारीत त्यांनी भुजबळ यांना बोलतं केलं आणि ही मुलाखत रंजक बनवली.
देवेंद्र भुजबळ हे मूळचे विदर्भातील अकोला येथील रहिवासी. दहा वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. दहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण अकोला येथे झाले. गणित आणि विज्ञानाची फारशी आवड नसल्यामुळे ते दहावी इयत्तेत नापास झाले.

त्या काळी दहावी इयत्तेत नापास झाल्यानंतर प्रचंड अपयशाचा शिक्का त्या मुलावर मारला जायचा. हा मुलगा जगण्यास लायक नाही आदी हेटाळणी व्हायची…. भुजबळ यांच्या वाट्याला पणही अशी हेटाळणी आली आणि ते प्रचंड निराश झाले. त्याची त्यांना लाज वाटत असे.

परंतु यातून ते सावरले आणि काहीतरी करून दाखवावे लागेल म्हणून त्यांनी पुणे गाठले. भावाकडे राहून त्यांनी डेक्कन जिमखाना येथील दर्शन फ्रुट्ज्यूस बारमध्ये नोकरी स्वीकारली. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे कळून चुकल्यामुळे आणि आपल्या मुलाने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करावे अशी आईची तीव्र इच्छा असल्यामुळे त्यांनी भारती विद्यापीठात अकरावी मध्ये प्रवेश घेतला.मिळेल ती नोकरी मिळवत त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले.

शिक्षण घ्यायची जिद्द असल्यामुळे आणि पत्रकारितेची आवड असल्यामुळे भुजबळ यांनी मास कम्युनिकेशन ही पदवी संपादन करण्याचे ठरवले. त्यानुसार पुणे विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी आपल्या मुलांनी इंजिनियर – डॉक्टर किंवा सरकारी अधिकारी व्हावे असाच बहुतांश पालकांचा होरा असायचा. याचा दबाव भुजबळ यांच्यावरही होता. परंतु चरितार्थासाठी त्यांनी स्वार्थ आणि परमार्थ बघत अनेक मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करीत पत्रकारितेत आपले करियर घडवले.

मेघना साने यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ यांनी ‘केसरी‘ वर्तमानपत्रात काम करीत असतानाचा एक किस्सा सांगितला. केसरीने त्याकाळी ‘श्री ‘ या साप्ताहिका प्रमाणे ‘सह्याद्री ‘ हे साप्ताहिक सुरू केले होते. शनिशिंगणापूरवर भुजबळ यांनी कव्हर स्टोरी लिहिली. तेथे जाऊन अनेकांच्या भेटीगाठी, मुलाखतीतून त्यांनी शनिशिंगणापूरवर कव्हरस्टोरी लिहिली आणि ती इतकी गाजली की शनिशिंगणापुर व भुजबळ यांचे नाव उभ्या महाराष्ट्राला कळाले.

मुद्रित माध्यमांच्या मर्यादा ओळखून असलेल्या भुजबळ यांना १९८६ मध्ये दूरदर्शनवर काम करण्याची संधी मिळाली. जाहिरात, वृत्त विभाग प्रस्तुती विभागात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. कोर्टाची पायरी, आमची माती आमची माणसं. ग्रामदर्शन आदी कार्यक्रमाचे सादरीकरण करीत त्यांनी दूरदर्शनवर घडी बसवत आपली वाटचाल चालू ठेवली.

त्याकाळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. घराघरात पोहोचण्याचे ते एकमेव साधन होते. स्टाफ आर्टिस्ट की गव्हर्मेंट सर्वव्ट असा पर्याय त्यांच्याकडे ठेवण्यात आला. सरकारी नोकरीत प्रतिष्ठा आणि सोयी, सवलती खुप असतात. ग्लॅमर असते. त्यामुळे तुलनात्मक अभ्यास करीत सरकारी सेवेत काम करण्याचा पर्याय भुजबळ यांनी स्वीकारला.

पुढे यूपीएससी च्या स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची १९९१ साली त्यांची प्रोग्राम एक्झिक्युटिव्हच्या ३ पदांसाठी, इंडिअन इन्फॉर्मेशन सर्विस- सिनिअर ग्रेड या पदासाठी, शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता अधिव्याख्याता आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा माहिती अधिकारी वर्ग -१ अशा ६ पदांसाठी निवड झाली. सर्व पदांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी अलिबाग येथे १९९१ साली जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली.

दीड – पावणे दोन वर्षानंतर त्यांना वरिष्ठांनी अलिबागहुन मुंबईत, मंत्रालयात बोलावून घेतले. मुंबईत दंगल झाली होती.. त्या वेळी दूरदर्शन हे घराघरात पोहोचलेले एकमेव साधन होते. महाराष्ट्र शासन आणि दूरदर्शन समन्वयाचे ते काम करू लागले. पुढे त्यांच्या अहवालानुसार शासनाने दृक्श्राव्य शाखा सुरू केली.

दूरदर्शनचे महाचर्च, माहिती खात्याचा दिलखुलास कार्यक्रम लोकप्रिय करण्यात भुजबळ यांचा सिंहाचा वाटा आहे.

महिलांच्या व पुरुषांच्या कथावर आधारित “गगनभरारी” व “प्रेरणेचे प्रवासी”, “भावलेली व्यक्तिमत्वे”, “करिअरच्या नव्या दिशा”, “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” ही पुस्तके त्यांनी लिहिले आहेत.

सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ‘न्युजस्टोरीटुडे‘ हे वेब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर त्यांनी कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या यशकथाना प्रसिद्धी दिली आहे. राजकारण, गुन्हेगारी आणि वाईट गोष्टींना स्थान न देता चांगल्या कल्पनांचा प्रसार करणे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे.

कार्यक्रम शेवटाकडे जात असताना मेघनाताईनी देवेंद्र भुजबळ यांना श्रोत्यांना आपण काय संदेश देणार ? असा प्रश्न विचारताच स्वार्थ आणि परमार्थ पाहिलाच पाहिजे, आनंदाने जगा आणि आनंदाने जगू द्या असे भुजबळ म्हणाले. आणि अर्ध्या तासापर्यंत रंगलेली हे मुलाखत संपली. तुमचं जगणं तुमचा आवाज सांगणारी ही प्रेरक मुलाखत रंजक ठरली एवढे मात्र खरे….!

गोपाळ कुलकर्णी

– गोपाळ कुलकर्णी, संपादक, लातूर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप