Monday, September 1, 2025
Homeलेखधर्मवीर आनंद दिघे

धर्मवीर आनंद दिघे

धर्मवीर आनंद दिघे यांची आज, २६ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.
धर्मवीर आनंद दिघे यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याशिवाय ठाण्याची कल्पनाच करवत नाही. ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब, निराधार, आपत्तीग्रस्त लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारं मानवतावादी व्यक्तिमत्त्व म्हणजे आनंद दिघेसाहेब, अशी त्यांची जनमानसात ओळख होती.

वास्तवात आनंद दिघे यांच्याकडे जावून आपली समस्या सोडविण्यासाठी कोणाच्या ओळखीची गरज भासत नसे. सर्वधर्मियांसाठी त्यांचा आनंद मठ चोवीस तास खुला असायचा. त्यांच्या दारी आलेला माणूस कधीच रिक्त हस्ते परतला नाही, हे सूर्यकिरणाएवढं सत्य आहे.तरुण वयातच त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकहितैशी विचारांशी नाळ जुळवून शिवसेनेच्या विविध चळवळींमध्ये स्वतःला झोकून घेतलं. गरजू व निराधारांना सदासर्वदा मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा दिला. त्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोक त्यांना आश्रयदाता म्हणून संबोधित असत.

धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे झाला अन् जणू गोरगरीबांचा विधाता उदयास आला. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचे ठाण्यात आगमन झालं अन् जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपली नाळ ठाण्याशी अन् ठाणेकरांशी अटूट ठेवली.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या विचाराने प्रभावित होऊन दिघेसाहेबांनी शिवसेनेशी नातं जोडलं. सुरुवातीला ठाणे उपप्रमुख, नंतर ठाणे जिल्हा उपप्रमुख व शेवटी बाळासाहेबांनी ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. बाळासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक पदाला न्याय देऊन त्यांनी शिवसेनेत आपले स्थान भक्कम केलं. त्यांची न्याय्य कार्यपद्धती अन् संघटन कौशल्य पाहून, बाळासाहेब हे शिवसैनिकांना म्हणायचे, “जिल्हा प्रमुख कसा असावा, तर तो आनंद सारखा”! बाळासाहेबांचे हे गौरवोद्गार म्हणजे दिघेंच्या कार्यकर्तुत्वाची खरी पावती होय. अशी स्वयंप्रकाशी विभुती अर्थातच धर्मवीर हे पुन्हा होणे नाही.

दिघेसाहेबांसंदर्भात बोलायचं झालं तर ते मोठे वक्ते नव्हते, परंतु त्यांच्या शब्दाला हिमालयाएवढं वजन होतं. त्यांचा शब्द कोठेही प्रमाण मानला जायचा. विशेष म्हणजे दिघेसाहेब हा शब्द साऱ्या ठाणे जिल्ह्यात जणू परवलीचा शब्द बनला. श्रीमंत-गरीब यातील फरक त्यांना कधीच शिवला नाही. दिवसातील १८-२० तास त्यांचे लोकांच्या समस्या सोडविण्यात व्यतित होत असत. यातूनच त्यांनी सर्वधर्मीय लोकांचा अन् सर्वपक्षीय नेत्यांचा स्नेहभाव, आदर व विश्वास संपादन केला. महत्वाचे म्हणजे त्यांना मुस्लिम समाजाचे लोक खूप मानत असत. ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा राजकीय मंत्र प्रत्यक्ष कृतीने अवलंबून, ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक भागात शिवसेनेची व्याप्ती वाढविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. याची परिणती म्हणजे दिघेसाहेबांना सदैव बाळासाहेबांकडून मानाचं पान मिळत राहिलं आणि हेच दिघेसाहेबांनी आपल्या जीवनाचं खरं फलित मानलं.

सन्माननीय दिघेसाहेबांनी आपल्या साऱ्या जीवनात कधीही राजकीय पदाची अपेक्षा केली नाही. परंतु जिल्ह्यातील निष्ठावान, प्रामाणिक, मेहनती व विकासाचे व्हिजन असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी मोठमोठ्या राजकीय पदांवर बसविलं. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मो.दा.जोशी, माजी मंत्री साबीर शेख, माजी महापौर सतीश प्रधान, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर अनंत तरे, मंत्री प्रताप सरनाईक, माजी खासदार राजन विचारे, माजी खासदार प्रकाश परांजपे, मंत्री गणेश नाईक, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर स्व.राजेंद्र देवळेकर, माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, परिवहन समितीचे माजी सभापती विलासकाका जोशी आदी लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.

राजकारणात अनेक स्थित्यंतरे आलीत, पण दिघे साहेबांनी तत्वांशी कधीच तडजोड केली नाही. शिवसेनेच्या भगव्या ध्वजाची धुरा समर्थपणे सांभाळणारे धर्मवीर हे ब्रह्मचर्य पत्करलेलं तपस्वी, त्यागी, विवेकी अन् सदाचारी व्यक्तिमत्त्व होतं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदनीय दिघेसाहेबांच्या पाऊलखुणा ओळखून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. राजकारणातून समाजकारण करणाऱ्या शिंदेसाहेबांना ठाणे जिल्ह्यातील लोक आता प्रतिधर्मवीर अशी उपमा देऊ लागले आहेत. दिघेसाहेबांचा आदर्श घेत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या शिंदेसाहेबांनी कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करून हजारो लोकांच्या जिवांचे रक्षण केलं. त्यामुळे जिल्ह्यातील लोक त्यांना “अनाथांचे नाथ एकनाथ” असे आदराने म्हणू लागले. धर्मवीर आनंद दिघेसाहेब आणि शिंदेसाहेब ह्या गुरू-शिष्याच्या जोडीला जनमानसात आदराचं-मानाचं स्थान आहे. भाईंच्या राजकीय- सामाजिक जीवनाची जडणघडण दिघेसाहेबांच्या आशिर्वादाने त्यांच्याच छत्रछायेत झाली. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं, याचा बाळकडू शिंदेसाहेबांना धर्मवीर यांच्याकडून मिळाला. दिघेसाहेब हे शिंदेसाहेबांच्या गुरुस्थानी होते व आजही आहेत. ते म्हणतात, “वंदनीय दिघेसाहेब यांच्याबरोबर काम केल्याने मलाही दिवसातून १८-२० तास झपाटल्यासारखे कामं करण्याची सवय जडत गेली. एका सामान्य रिक्षा चालकावर विश्वास टाकून धर्मवीर यांनी मला शाखाप्रमुख बनविले. त्यानंतर नगरसेवक, आमदार, मंत्री या क्रमाने माझी राजकीय पदोन्नती झाली. ही सर्व दिघेसाहेबांची पुण्याई आहे, अशी भावना ते व्यक्त करतात.

कल्याणचे विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावरही दिघे साहेबांचा शालेय जीवनापासूनच वरदहस्त होता. साहेबांचे आशिर्वाद नेहमी श्रीकांतदादांच्या पाठीशी राहिले. परिणामी त्यांनी वैद्यकीय शिक्षणात सर्वोच्च गुण प्राप्त केले अन् पुढे राजकीय व सामाजिक जीवनात पदार्पण करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा जनमानसावर ठसा उमटवला. ते दोन वेळा खासदार म्हणून कल्याणमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. हा दिघेसाहेबांच्या आध्यात्मिक शक्तीचा करिश्माच म्हणावा.

दिघे साहेबांच्या भेदक दृष्टीमध्ये मोठं तेज होतं. त्यामुळे कोणीही त्यांच्या नजरेला नजर भिडवून पाहू शकत नसे. त्यांच्या नजरेत सूर्यासारखी तेजस्विता होती. वंदनीय प्रबोधनकार ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् मांसाहेब मीनाताई ठाकरे या त्रिदेवांचा आदर्श बाळगून, दिघेसाहेबांनी आपल्या संपूर्ण सामाजिक व राजकीय जीवनात जातपात ला कधीच थारा न देता, कर्तुत्व व निष्ठा याला महत्व दिलं. मानवता धर्म हाच त्यांच्या जीवनाचा मापदंड राहिला.वास्तवात ते सर्वधर्म समभावाचे आदर्श प्रतिक होते.

टेंभी नाक्यावरील नवरात्रीचा उत्सव, देवीची भव्यदिव्य मिरवणूक आणि त्यातील साहेबांची आध्यात्मिक भावना ह्या गोष्टी ठाणेकरांसाठी एक पर्वणीच ठरल्या आहेत. इतकेच नव्हे तर, होळीचा उत्सव साजरा करताना रागलोभ विसरून, ते सर्वपक्षीय नेत्यांसमवेत रंग उधळण करायचे. विशेष म्हणजे गोविंदाचे आयोजन खूपच आकर्षक असायचे. ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथके ठाण्यात आमंत्रित करून ठाणे – मुंबईची सांस्कृतिक नाळ जोडण्याचं पवित्र कार्य दिघेसाहेबांनी केलं. एकाच दिवशी तब्बल १५० देशांमध्ये ठाण्याच्या दहीहंडी सोहळ्याचे प्रक्षेपण दिघेसाहेबांनी घडवून आणलं. या उत्सवाला त्यांनी सातासमुद्रापलीकडे प्रतिष्ठा मिळवून दिली, याचा आम्हा ठाणेकरांना सार्थ अभिमान आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ठाण्यात या वर्षी स्पेनहून दहीहंडी उत्सवात सामील होण्यास महिला पथक आले होते. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवास जगभरात नावलौकिक मिळाला, ही गोष्ट मोठ्या अभिमानाची आहे.

युवकांमध्ये देशसेवेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी वडवलीमध्ये सैनिकी शाळा सुरू केली. एसएससीची सराव परीक्षा घेण्याचा पायंडा पाडून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वृद्धिंगत करण्याचा अभिनव प्रयोग केला. दिघेसाहेब आपल्या मित्रांना दिवाळीचे भेटकार्ड न चुकता पाठवत असत. त्यामुळे त्यांना मानणारा मित्र परिवार दांडगा होता. त्यांच्या प्रयत्नांतून गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि तलावांची बांधणी व सुशोभिकरण करण्याची लोकोपयोगी कामे मार्गी लागलीत. त्यामुळे ठाणे हे खऱ्या अर्थाने आदर्श व स्वच्छ-सुंदर शहर म्हणून गणले गेले.दिघेसाहेब आज जरी आपल्यात नसले, तरी त्यांचे सामाजिक व आध्यात्मिक योगदान ठाणेकरांच्या चिरकाल स्मरणात राहील, हे निश्चित.

ठाणे जिल्हा प्रमुख असताना लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिघेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वसई येथे मोर्चा काढण्यात आला होता.त्याप्रसंगी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात दिघेसाहेब जबर जखमी होऊन त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे लोकांमध्ये पोलिसांविषयी मोठा रोष निर्माण झाला होता. लोकांच्या रास्त मागण्या मान्य व्हाव्यात, हीच त्यांची मोर्चामागील भावना होती. दिघेसाहेबाच्या त्यागी व समर्पितवृत्तीमुळे युवक- युवतींच्या मनात निस्सीम आदरभाव निर्माण होऊन त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली.

दरम्यान पूर्वग्रहदुषित दुर्विचारातून पोलीस यंत्रणेने त्यांना एका खून खटल्यात गोऊन अटक केली होती. त्या विरोधात ठाणे जिल्ह्यातल्या सुमारे २० हजार शाळेकरी मुलामुलींनी मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला होता. या मोर्चाेची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होऊन तो अभूतपूर्व ठरला. उल्लेखनीय बाब म्हणजे काही मुलामुलींनी तर आपल्या रक्ताने निवेदन लिहून तत्कालिन पोलीस आयुक्ताना सादर करत दिघेसाहेबांच्या विरुद्ध केलेली अतिरेकी कारवाई रद्द करून त्यांच्या सुटकेची मागणी केली. इतकेच नव्हे तर, त्याची एक प्रत त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना देखील पाठविण्यात आली. वास्तवात अशी घटना आजमितीपर्यंत जगात यापूर्वी कोठेही घडलेली नसावी, असे वाटते. या साहसी घटनेमुळे आख्या महाराष्ट्रात या मुलामुलींचे कौतुक झाले. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, शाळेकारी विद्यार्थी, युवक-युवती अन् ज्येष्ठ नागरिक या तिन्ही वयोगटातील घटकांमध्ये त्यांची ख्याती होती, अन् आजही त्यांच्याबद्दल तोच आदरभाव व सन्मान ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोकांच्या मनात खोलवर रुजला आहे. सच्चा, कर्तव्यदक्ष अन् त्यागी समाजसेवकाचे ते मूर्तिमंत प्रतिक होत.

सन्माननीय दिघेसाहेबांच्या उज्ज्वल कारकीर्दीत सर्वधर्मीय लोकांना सहसा कोर्टकचेरीत जाण्याची वेळ आली नाही. दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून, कुठलाही वाद, तंटा वा समस्या आनंद मठात सुटत असे. अशाप्रकारे न्यायनिवडा करून दिघेसाहेबांनी ठाणे जिल्हा व आसपासच्या परिसरात सामाजिक सलोखा व धार्मिक सदभाव प्रस्थापित केला. विशेष म्हणजे बेरोजगारांना त्यांच्या गुणवत्तानुसार रोजगार – नोकऱ्या देणे, गरजूंना शाळा प्रवेश करून देणे, त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, क्रीडा साहित्य वाटप आणि वैद्यकीय कारणांसाठी आर्थिक सहाय्य देणे अशी दैनंदिन कामे त्यांना नित्यनेमाने करावी लागायची. त्यामुळे दिवसातून त्यांना वाट्याला नशिबाने ४-५ तास विसावा मिळाला तर मिळाला. काही गुंडागर्दी करणाऱ्या युवकांमध्ये त्यांनी समुपदेशनद्वारे परिवर्तन घडवून आणून त्यांना विधायक कार्यांमध्ये जुंपले.

दिघेसाहेबांनी ठाण्याला जे सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभव प्राप्त करून दिलं, ते ठाणेकरांच्या सदैव स्मरणी राहील, हे नक्की.

आज त्यांच्या स्मरणार्थ आनंद आश्रमात दिव्यांग बंधू- भगिनींना जयपूर फूटच्या धर्तीवर मोफत कृत्रिम हातपाय बसवून देण्यात येत आहेत. तसेच आरोग्य शिबिरे भरवून गोरगरीब, गरजू रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून औषधोपचार अन् महागडे ऑपरेशन्स करून देण्यात येत आहेत. थोडक्यात धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचा सामाजिक वसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मा.आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर सौ.मीनाक्षीताई शिंदे वl शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक चालवत आहेत. हीच खरी स्व.दिघेसाहेबांना मानवंदना होय.

मित्रहो, अंतत: विधिलिखित टळत नसतं, हे त्रिकाल सत्य आहे. एके दिवशी दुर्दैवाने दिघे साहेबांचा कार ॲक्सिडेन्ट झाला. यास्तव त्यांना गंभीर अवस्थेत ठाण्याच्या सुनितीदेवी सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये त्यांचं २६ ऑगस्ट २००१ रोजी दुःखद निधन झालं. या दुर्दैवी व क्लेशजनक घटनेमुळे जनसमुदायात मोठा रोष निर्माण झाला. दिघेसाहेबांचा जनमानसावर एवढा मोठा पगडा होता की, त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी या हॉस्पिटलची नासधूस केली. या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे साहेबांचा नाहक बळी गेला, अशी लोकांमध्ये चर्चा होती. याबाबतीत जनसमुदायाच्या भावना तीव्र होत्या.त्याची परिणती म्हणजे साहेबांचे चाहते बेकाबू झाले होते. त्यांच्या तीव्र भावनांना आवर घालणे,अशक्यप्राय होतं. त्यांच्या आक्रोशाला पारावार नव्हता. यावरून हे निष्पन्न होते की, त्यांची लोकप्रियता सागरासारखी अफाट होती. त्यांच्या स्मरणार्थ आर्य क्रीडा मंडळात त्यांचे शक्तीस्थळ उभारण्यात आलं. आजही तेथे अखंड नंदादीप जळत असतो. आजही आनंद मठात नित्यनेमाने आरती होत असून, त्यांच्या वस्तूंची पूजा होत असते. वंदनीय आनंदजी दिघेसाहेब हे ठाणेकरांचे दैवत होते अन् आजही आहेत. म्हणून लोक म्हणतात ना धर्मवीर पुन्हा होणे नाही !

अन्यायावर प्रहार अन् न्याय मिळे गरिबांना, दीनांच्या, दुबळ्यांसाठी तळमळी हा धर्मवीर…!
वादळ, वारा, पूर असो की भूकंप, कसल्याही संकटात लढतो, सळसळतो हा धर्मवीर…!

रणवीर राजपूत

— लेखन : रणवीरसिंह राजपूत.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments