अंदमान निकोबार हा ५७२ बेटांचा समूह आहे. पण गंमत अशी की त्यातील फक्त ३५ बेटांवर लोकवस्ती आहे. बाकी सगळे निर्जन पण निसर्गाने नटलेले असे आहे. अंदमान निकोबारमधली ३५ ही बेटे पर्यटकांसाठी खुली नाहीत. इथे काही अश्या जमाती राहतात ज्यांना बाहेरच्या जगाशी संबंध ठेवायला आवडत नाही. काही अगदी लुप्त होऊ आलेल्या जमाती ही आहेत. त्यामुळे इथे सहसा परवानगी शिवाय प्रवेश नाही. त्यात काही ठिकाणी रिसर्च संबंधित लोकांनाच परवानगी मिळते.
राजधानी पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, राधानगर बिच, चिडिया टापू, बाराटांग व मढ़ व्हालकानो, रॉस व नॉर्थबे आयलँड, अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. आम्ही निर्मनुष्य असलेले ‘जॉलीबॉय’ हे निसर्गदत्त सुंदर बेट बघितले. सहसा या बेटावर जाण्यासाठी सहज परवानगी मिळत नाही. फार कमी पर्यटकांना परवानगी मिळते, त्यातही या बेटावर वर्षभरातील ६ महिने कोणीही जात नाही. या बेटावर चॉकलेटचे वेष्टनही नेता येत नाही, एवढी काळजी प्रशासन घेते. या बेटावर भ्रमंती करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली हे आमचे भाग्य..!
अंदमानला जाण्यासाठी आम्ही नागपूर येथुनच विमानाने गेलो व आलो. बेट समूह बंगालच्या सागरात असल्याने येथे आपल्यापेक्षा लवकर सकाळ होते, तसेच सूर्यास्तही लवकर होतो. सायंकाळी पाचच्या पुढे अंधार व्हायला सुरुवात होते. येथे बंगाली भाषा जास्त प्रचलित आहे. इंग्लिश, हिंदी या भाषादेखील लोकांना सहज समजतात त्यामुळे भाषेची विशेष अडचण येत नाही.
पोर्ट ब्लेअरला आवर्जून जाण्याचे ठिकाण म्हणजे सेल्युलर जेल. या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. येथे गाईड घेऊनच जेल बघावा. अमर ज्योती, संग्रहालय, स्मारक तर सायंकाळी जेलचा इतिहास व क्रांतिविरांच्या आयुष्यावर आधारित Light and Sound Show दररोज होत असतो. त्याचे तिकीट सहज उपलब्ध होत नाही, म्हणून तिकीट आधीच काढून ठेवणे योग्य. ३० मिनिटांचा हा कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत करतो.
रॉस-नेताजी सुभाषचंद्र आयलंडवर कोण्याकाळी ब्रिटिशांचे वास्तव्य असलेल्या कॉलनीचे अवशेष आहेत. हे बेट सध्या नौदलाच्या देखरेखीत आहे. इथे बरेच वन्य जीव आहेत जसे की ससा, हरीण, मोर. त्यांचा मुक्त वावर तिथे बघायला मिळतो. येथे अनुराधा राव अनेक वर्षांपासून एकमेव गाईड आहेत. त्यांच्या बोलण्याने येथील इतिहास जिवंत होतो. महाराष्ट्रातील स्वातंत्रसैनिकांबद्दल अभिमानाने त्या बोलतात, तेव्हा मराठी माणसांचे हृदय हेलावून जाते.
अंदमानात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते, म्हणून आधीपासून बुकिंग करून जाणे उत्तम. सगळ्या बेटांवर जाण्यासाठी लहान मोठ्या प्रकारची फेरी घ्यावीच लागते. जर एखादे ठिकाण बघून लगेच परत येण्याचा विचार असेल तर फेरीचे तिकीट काढताना शेवटची फेरीची वेळ आणि हवामानाचा अंदाज घ्यायला हवा.
येथे इत्यंभूत माहिती असणारे गाईड सोबत असल्यास, जहाज-बोटींच्या वेळाकडे लक्ष देण्याची गरज भासत नाही. अंदमानातील वेळ पर्यटकांना कटाक्षाने पाळावी लागते नाहीतर पूर्ण दिवस वाया जाऊ शकतो, हे मात्र नक्की.
येथे बीचवर खाण्यासाठी तुरळक गोष्टी मिळतात. जसे नारळ पाणी, शाहाळी, किंवा चिरलेली फळे आणि चहा. बऱ्याच बीचवर public changing रूम्स देखील आहेत, त्या मुळे swimsuits घालणे किंवा कपडे बदलणे या बेसिक सोयी तिथे आहेत. आपल्याकडे ज्या गोष्टी सहज मिळतात त्या तिथे सहज उपलब्ध नाहीत. इथे बऱ्याच वस्तुंचे उत्पादन होत नाही. यामुळे काही गोष्टी जसे भाज्या, दूध लिमिटेड प्रमाणात आहेत. अर्थात पोर्ट ब्लेअरला याची कमतरता जाणवणार नाही, पण पोर्ट ब्लेअर सोडून दुसऱ्या कुठल्या बेटावर याचा तुटवडा जाणवतो. तुम्ही तुमच्याबरोबर काही खाण्याचे पदार्थ घेऊन गेलात तर ते जास्त सोयीचे होऊ शकते.
सहसा ऑक्टोंबर ते एप्रिल दरम्यान अंदमानला जाणे योग्य. मे अखेर पावसाळा सुरू होतो.
आशा बाळगतो की, या माहितीचा उपयोग अंदमान प्रवास करताना सहाय्यक ठरेल. येथील बेटे ही आपल्या देशातील निसर्गाचा खजिना असून ऐतिहासिकही आहे, येथे जरूर भेट द्या.
– लेखन : हरिहर पांडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
🙏🙏
दंडवत प्रणाम!!
अतिशय सुंदर व सखोल माहिती दिली.
पर्यटन स्थळांना आपण एकदा तरी भेट द्यावी ह्याची उच्छुकता निर्माण होते.
धन्यवाद!!