नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या गरजू कुटुंबियांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज, दिनांक २८ जूनपासून विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी संबंधितांच्या घरी जाऊन त्यांच्या पर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नुकतीच दिली.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ अशा कुटुंबांना दिला जाईल. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहेत.
महिला व बालविकास विभागांतर्गत बालसंगोपन योजना, शिशुगृह योजना, बालगृह योजना, शुभमंगल सामुहिक विवाह योजना यांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, एपीएल (केशरी) शेतकरी योजना यांचा समावेश आहे. याचबरोबर शालेय विद्यार्थी इयत्ता सहावी ते दहावीसाठी निवासी शाळा, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना यांचेही प्रावधान ठेवले आहे.
राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या धोरणाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील कोरोनामुळे बळी पडलेल्या व्यक्तींच्या अनाथ मुलांना तात्काळ सहाय्य पुरविले जात आहे. पालक गमविलेल्या शुन्य ते ६ वयोगटातील बालकांसाठी शिशुगृह, वय वर्षे ६ ते १८ गटातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र बालगृह अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाने जवळपास ९१ हजार २२५ जण बाधित झाले. त्यापैकी सुमारे ८८ हजार ५७८ बाधित उपचारानंतर बरे होऊन घरी गेले. तर सुमारे १ हजार ९०४ व्यक्ती बळी पडले.
या विशेष मोहिमेचा लाभ या व्यक्तींच्या कुटुंबियांना निश्चितच होईल.
– मूळ स्रोत : जि. मा. का., नांदेड.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Tq sir
Great
Tq sir