Tuesday, June 3, 2025
Homeयशकथानाट्यकर्मी श्याम शिंदे, झाले डॉक्टर !

नाट्यकर्मी श्याम शिंदे, झाले डॉक्टर !

शिक्षणाला वयाचे, व्यवसायाचे बंधन नसते, बौद्धिक आनंद, समाधानासाठीही शिक्षण घ्यायचे असते, संशोधन करायचे असते हे अहमदनगर येथील ‘सप्तरंग थिएटर्स‘ या प्रथितयश नाट्यसंस्थेचे अध्यक्ष, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्याम शिंदे यांनी,          डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती‘ ही पदवी वयाच्या पन्नाशीत मिळवून दाखवून दिले आहे.

श्री श्याम शिंदे यांनी, ‘लघुपटातून मांडला जाणारा सामाजिक आशय-एक संवादशास्त्रीय अभ्यास‘ या विषयावर पीएच.डी.च्या संशोधनासाठी प्रबंध सादर केला होता.

अल्प परिचय
डॉ.श्याम शिंदे यांनी सन १९८८ मध्ये येथील न्यु आर्ट्स, अँड सायन्स कॉलेजमधून बीएस्सी. ची पदवी घेतली. त्यानंतर कुठेही नोकरी न करता त्यांनी ‘सप्तरंग’ या नावाने फोटो व व्हिडीओ शूटिंग हा व्यवसाय निवडला. या व्यवसायात त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटवला.

श्याम शिंदे यांनी २८ ऑगस्ट १९८६ रोजी अहमदनगर येथे ‘सप्तरंग थिएटर्स’ या नाट्य संस्थेची स्थापना केली. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांनी नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, व्हिडीओ चित्रपट, हिंदी राज्य नाट्य स्पर्धा अशी चौफेर कामगिरी केली.

सुरुवातीच्या काळात सांस्कृतिक कार्य संचालनालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच एन.सी.पी.ए. मुंबई च्या वतीने आयोजित विविध नाट्य प्रशिक्षण शिबिरातून नाट्य विषयक ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर औरंगाबादच्या सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयातून नाट्य विषयक पदविका प्राप्त केली.

१९९२ मध्ये ‘नाट्य दर्पण’ च्या एकांकिका स्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या ‘भोवरा’ या एकांकिकेस प्रथम क्रमांक मिळाला.

सन २००२ मध्ये कै.वि.र. बाम, स्मृती एकांकिका स्पर्धेत त्यांनी लिहलेल्या ‘टॅप देम’ या एकांकिकेस प्रथम क्रमांक मिळाला. सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष व नाट्य दिग्दर्शक या नात्याने सलग ३५ वर्षांपासून त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

श्री शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या मन धुव्वाधार, थँक यु मिस्टर ग्लॅड, डॉ. हुद्दार, हातचा एक, अंदमान, तरपण, याचक व तिर्थरूप चिरंजीव या नाटकांना प्रादेशिक केंद्रावर दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली.

सन २००४ मध्ये झालेल्या ४३ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘तर्पण’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. २००६ मध्ये झालेल्या ४५ व्या हिंदी राज्यनाट्य स्पर्धेत ‘मृत्यूछाया’ या नाटकासाठी दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

प्रादेशिक राज्य नाट्य स्पर्धेत झालेल्या ‘डॉ. हुद्दार’ या नाटकासाठी प्रकाश योजनेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर ‘मृत्यूछाया’ या हिंदी नाटकाकरिता अंतिम फेरीत प्रकाश योजनेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

त्यांनी सप्तरंग थिएटर्स या नाट्य संस्थेच्या माध्यमातून सलग ५ वर्षे राज्य पातळीवरील एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले. गेल्या ३५ वर्षांपासून नवोदित व हौशी नाट्य कलावंतांसाठी दरवर्षी नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. ९० च्या दशकात ‘मृगजळ’ या पहिल्या व्हिडीओ चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात तो प्रदर्शित करण्यात आला.

१९८८ पासून सातत्याने मराठी राज्य नाट्य स्पर्धा, हिंदी राज्य नाट्य स्पर्धा व विविध एकांकिका स्पर्धेत त्यांचा सहभाग असतो. बाकी इतिहास, भवर, अंदमान, तरपण, मृत्यूछाया या हिंदी नाटकाचे प्रयोग मुंबई नगरीत सादर करून अनेक पारितोषिके मिळविली. राज्य नाट्य स्पर्धेत २५ हुन अधिक नाटके सादर करून १०० हुन अधिक पारितोषिके त्यांच्या संस्थेने मिळविली आहेत. त्यांना दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी संकलन व लेखन क्षेत्रात अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

व्यावसायिक व नाट्यक्षेत्रातील यशस्वी वाटचालीनंतरही त्यांना उच्च शिक्षणाची आस स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून सुमारे २५ वर्षांच्या शैक्षणिक खंडानंतर त्यांनी ‘मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम’ या अभ्यासक्रमाचेे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर सी.एस.आर.डी. अहमदनगर येथे काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले.

मास्टर्सची पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. श्याम शिंदे यांना संशोधनासाठी  डॉ.विशाखा गारखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. अहमदनगर जिल्हयाच्या नाट्यक्षेत्रातील व्यक्तीने मिळविलेली बहुधा ही पहिलीच पीएच.डी.आहे.

श्री श्याम शिंदे यांना मिळालेल्या या यशाबद्दल न्यू आर्टस कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे , डॉ.पंधरकर, डॉ. बापू चंदनशिवे, कला क्षेत्रातील विविध मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या न्युजस्टोरीटुडे परिवारातर्फेही श्री शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

– देवेंद्र भुजबळ, 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on हेच विसरूनी जाई
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम