Home साहित्य नाती : आजी

नाती : आजी

0

आजी ! एक मनातला हळवा सायसाखरी मायेचा कोपरा. आजीचं एक विशेष म्हणजे ती मनातुन कधी जातच नाही. ठाण मांडुन, मनाचा एक मोठ्ठा कोपरा अडवून बसलेली असते.
कृती, शब्द, किंवा एखादा स्पर्श!डोळे ओले होतातच.
अशी ही आजी ज्या घरात असते ना, त्यांना ते घर नेहमी ‘भरलेलं असते’.
ती देवाघरी गेल्यावर ते कायमचेरिकामे रिकामे होते. अगदी काळजापासुन.
मग सगळ्या आठवणींनी काळीज कायमचे भरुन रहाते.
आजी …. हे वळण तसं शब्दात पकडायला फार अवघड आहे. अपार माया, खडीसाखरेचे मधाळ शब्द, सायीसारखा मखमली स्पर्श सारेच तिचे असणे लाघवी आणि मधाळ असते. करू म्हंटले तरी शब्दात नाही बसवता येत.
या जगात आल्यावर तीनच स्पर्श लगेच कळतात. पहिला एका जिवंतपणाचे दोन करणारी मायाममतेची आई, दुसरा नवलाई व जबाबदारीचा वडिलांचा स्पर्श व तिसरी आनंद ओसंडुन वाहातोय असा अमृताचा अनुभव देणारी आजी.
याच तिन्ही हातात बाळ छान हंसत खेळत, प्रतिसाद देत, जगण्याचा ऊत्सव करत असते.
हळू हळू आजीच्या हातात, मांडीवर, कडेवर बाळ जग बघत मोठं होतं. आजी मायेनी तेल चोळणं, अंघोळ, भरवणे, काऊ चिऊ ताई, चांदोबा पासुन रामायण, महाभारत पर्यंत गोष्टीत रंगवते. काही नाहीतर आदित्य राणूबाई सारख्या कहाण्या, ओव्या, भजन असं बाळासाठी आजी मनाला येईल ते गाते, सांगते. विशेष म्हणजे बाळ डोळे विस्फारुन ते सारे ऐकते. जणू काही त्याला सारे समजत असते.
पत्ते भातुकली, सागरगोटे, असे छोटुले खेळ शिकवते, खेळते सुद्धा.
झोपायला तर आजीच्या मायेच्या कूशीखेरीज दुसरी जागाच सापडत नाही. अंगाई गीतात कोण नसते?सारे असतात. कधी त्या डोक्यावरून फिरणार्या हाताच्या स्पर्षाची जादू झोपेच्या दुनियेत कधी अलगद् सोडते ते कळतही नाही.
अशी आजी मायेच्या रेशमी बंधनात अडकवुन ठेवते.
आजीच्या ठेवणीतली गाणी ही बहुदा रामकृष्णाची असतात. ओव्या सासर माहेरवरती असतात. कथा ही कहाणीतल्या आटपाट नगराच्या असतात.
मोठं झाले तरी आवडतात. त्यात रहस्य, भय, कूचेष्टा, भूत इ. नसतेच.
माझ्या आजीची साडी आजही गोधडीत शिऊन सांभाळुन ठेवलेली आहे. खरी जरीची, खंबायती, तलम पोताची, गडद रंगाची, आजीच्या ओळखीच्या गंधाची, मायेच्या स्पर्षाची, आजी सारखीच जीर्ण झालेली, हात धरुन ठेवणारी अशी आहे कि, जी साक्षात माझी आजी समोर ऊभी करते.
समोरच्या भिंतीवरचा तिचा नथ घातलेला जरीच्या साडीतला तेजस्वी फोटो बघितलं कि लगेच विचारतो. “कधी आलीस?आता रहा चार दिवस !”.
परत जाताना म्हणतो ,”निघतेस ?, जपून जा. काळजी घे.!”
नुसती डोळे भरवत नाही तर अंतराचा ठाव घेते. मी खरंच सुखी आहे ना?जाणून घेते.
तिची दुसरी वस्तू आजही जपली आहे ती म्हणजे. आजीची फणी रफ पेटी.
अंघोळी आधी त्यात बघून केस विंचरणारी गोरी धप्प, गोलमटोल तेजस्वी आजी आजही तिथेच बसलेली दिसते. प्रथम, मेण, मग मोठे गोल कूंकू लाऊनच ती ऊठणार. पुन्हा ऊद्या. अधेमधे फणेरीपेटी कोनाड्यातच असे.
आजीची एक जूनी पिशवी होती. त्यात, बिब्ब्यापासुन अनेक मुळ्या, सुकलेली पाने फुले, पावडरी, ऊ5गाळायच्या बीया असं काही बाही व्यवस्थित सांभाळुन जपलेलं असे. काही होतंय म्हणताच ऊगाळून, ऊकळवून, भाजून इ. नंतर एक रामबाण औषध घ्यायला लागायचं कि, आजार घाबरुन पळायचाच.
किती रान पाले तिला औषधासाठी जमवायचा नाद होता. चेष्टेने त्या पिशवीला बटवा म्हणत असू.
आजीजवळ कवड्यांचा खेळ होता. आपल्या ल्यूडो सारखा पण जाड लाल कापडात शिवलेला. अजुनही पेटीत छान आहे. फाटतच नाही.
काही जाणत्या बायका कधी दुपारी हा खेळ खेळत आम्ही बघायचो.
आजीजवळ खडीसाखर, सुंठीची गोळी, आवळा सुपारी, आंबा फणसाची साठे व भाजके काजू हा असा पळवण्यासारखा खाऊचा साठा कायम असे. कांहीतरी हवे आहे म्हणताना आजी यातलंच काही हवं आहे हे ओळखायची.व आनंदाने द्यायची.
दुसरा तिचा आयत्यावेळचा खाऊ म्हणजे तिनेच कढवलेले तूप त्यात खमंग भाजलेल्या दाण्याचे जाडसर कूट व गुळ किंवा पिठीसाखर.
अक्षरश:अमृताच्या चवीचा, मुलायम स्पर्षाचा तो लाडू आजी दोन मिनिट मधे मॅगी नाही होणार पण हा लाडू होणारच. काय चव ? पुन्हा मिळालाच नाही.
तिच्या हातचे खास पदार्थ तर वरणभातापासुन अनारशांपर्यंत वर्णनातीतच.
दहीदूध भात खायचा तर तिच्याच हातचा खात असू. ती कृष्णभात म्हणायची. आम्ही तूटुन पडायचो.
डोक्यात अनंत, सोनचाफा, मोगरा काहीतरी फूल छान आकड्यात खोवलेलं इतकं छान दिसायचं व तिच्या अंबाड्याला खुलवायचं.
चापून चोपून साडी कूठेही पीन न लावता अशी दिवसभर रात्रभर अंगाला लपेटुन असायची ,कि कधीच पदर हलला नाही की निरी पायात आली नाही.
नऊवार साडीत आजी भारी दिसायची.
सारे घर तिच्या मायेचे ऋणी पण शिस्त दरारा, व वचक नोकरांपासुन असा असायचा ना ?
कोणी पुढे बोलत नसेच.
वाळवणात सर्वच आज्या कूशल असतात. पण आम्ही ती पळवायचो तरी रागवत नसे.
तिची शिकवण, वळण, संस्कार, शिकवलेल्या परंपरा रिती रिवाज, स्वच्छता, काही फूकट घालवायचे नाही तसेच वायाही जाऊ द्यायचे नाही हीच शिस्त असे.
घरी वेळीच यावे, धार्मिक असावे, पापभिरू असावे, दुसर्याच्या अडीनडीला ऊभे असावे. ही तिची शिकवण होती.
अन्न, पाणी व जूने वस्त्र यासारखे अनमोल दान नाही हे ती कृतीतूनच सांगे.
शेवटी लक्षात येऊ लागलं. तीला ऐकायला येत नाही. चालता ऊठता बसता वेदना होतायत, खाणं कमी झालंय. आठवत नाही. कामं चूकायला लागली. शिवण भरतकाम विणकाम चुकायला लागली.
नाव गाव विसरलायला लागली.
हळूहळू विस्मरण वाढत गेले. ती एका अंधारलेल्या काळ्या रंगाच्या डोहात सापडू लागली व आम्ही तिचे हात घट्ट धरून वाचवू लागलो.
मूद्दाम आजीला आठवणी करून द्यायला लागलो.
पण ती शुन्यात बघू लागली. स्पर्शातली डोळ्यातली, शब्दातली ओळख दाखवेना. मायेचा स्पर्श मात्र तोच होता. घट्ट पकडून ठेवायची.
ती पण बावरली होती. समोरचं माणुस व नाव एकत्र येईना. आठवण सांगता येईना.
शेवटी काय जेवलो चव, पदार्थ कोणता काहीच समजत नव्हतं. कपड्याचे भान नसे. एक दिवस मी तिला घट्ट धरली आणि डोळ्याला डोळा भिडवून सांगितले.
तू कोणाची काळजी नको करू. तू शिकवलंस त्याच वाटेवरुन जाऊ. पण तुझी अजुन दुरावस्था नाही बघवणार. हाल वेदना तर विचारही नको.
आणि ती विस्मरणात पण तिच्या आठवणींचा डोंगर आमच्या कायमचा मनात ठेऊन त्याच दिवशी रात्री आजी देवाकडे गेली.
संपला… आजी हा मायेचा आध्याय संपला … पण आठवणीतली आजी आजही तशीच आहे.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version