ओघवती रसाळ, मधाळ भाषा, नम्रता, स्मितहास्य, प्रसन्न मुद्रा, प्रचंड आत्मविश्वास, परिपूर्ण पूर्वतयारी, अभ्यासू विवेचन, हजरजबाबीपणा प्रसंगावधान हे चांगल्या निवेदकाचे गुण आहेत. वारंवार चेहरावरून हात फिरवणे, हाताची घडी यातून आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. तर विषयानुरूप संदर्भासह, मुद्देसूद मांडणी, सादरीकरण व अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळते, असे मार्गदर्शन प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे हे आसमंत वाईस अकॅडमीच्या संचालिका आणि आकाशवाणी निवेदिका पूर्णिमा शिंदे यांनी नुकतेच पनवेल येथे केले.
महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकार्याने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर कळंबोली व अमरदीप बालविकास फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दोन तास चाललेल्या कार्यशाळेत अतिशय खुमासदार रंजकतेने सौ पौर्णिमा शिंदे यांनी सुसंवाद साधला. माईकचा वापर कसा करावा, अंतर किती असावे, उभे राहणे, हावभाव, देहबोली शब्द फेक कशी करावी, वाचन, मनन, चिंतन, अवलोकन पठन त्याचप्रमाणे अनावश्यक हालचाली कशा टाळाव्यात, आवाजातील लय, नाद चढ-उतार, रोह अवरोह आवाजाची घ्यावयाची काळजी कोणकोणती व्यायाम करावे याविषयीचे बहुमोल मार्गदर्शन पूर्णिमा शिंदे यांनी केले. तसेच सादरीकरणासाठी आवश्यक कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा हेही प्रशिक्षणातून सांगितले.

या कार्यशाळेत 40 शिक्षकांनी सहभाग नोंदवला. त्यातून उत्साही, उत्स्फूर्त सहभाग प्रतिक्रिया दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे एबीएफचे संस्थापक एन.डी.खान यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाली. श्री एन.डी.खान यांनी आपले समयोचीत मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीमती सुनिता थोरात तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीमती स्वाती पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास श्री. राजकुमार ताकमोगे, सौ मीना ताकमोगे, अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या सचिव सौ. सलमा खान तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञानमंदिरच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संजना बाईत, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ प्रियांका फडके आणि श्रीमती वर्षा पाचभाई इत्यादी मान्यवर तदप्रसंगी उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800