सख्यांचे यथार्थ मार्गदर्शन
“स्मार्ट फोन घेताय तर स्मार्ट बना !” – सुनीता नाशिककर
निसर्गोपचार आश्रम, उरळी कांचन पुणे आणि न्यूज स्टोरी टुडे च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष निसर्गोपचार शिबिराच्या चौथ्या दिवशी, निवृत्त पोलिस उपअधीक्षक सौ सुनीता नाशिककर यांनी दिवसेंदिवस सायबर फसवणूकीचे प्रकार फार वाढत चालले आहे असल्याने “सायबर फसवणूक कशी टाळावी ?” या आजच्या आव्हानात्मक समस्येविषयी खूप तपशीलवार मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा सारांश पुढे देत आहे.
नाशिककर मॅडम यांनी मार्गदर्शन सुरू करण्यापूर्वी सुरुवातीला एका तरुण मुलीला, वडिलांचे अंत्य संस्कार करणारी संस्था भासवून लाखो रुपयांची फसवणूक कशी होती, याची मन हेलावून टाकणारी व्हिडिओ क्लिप दाखवली. यामुळे सर्व जण सुन्न होऊन गेले आणि त्यांना सायबर फसवणुकीचे गांभीर्य चांगलेच लक्षात आले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आजकाल प्रौढ लोकं मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला बळी पडत आहे. यासाठी आपण अतिशय सावध राहिले पाहिजे. तसेच फोन बंद पडला आहे, पैसे जमा न केल्यास कट केला जाईल, वीज बिल भरलेले नाही, ते त्वरित न भरल्यास वीज कट करण्यात येईल, असे संदेश, फोन येतात आणि घाबरून जाऊन आपण ते भामटे म्हणतील, तसे करायला जातो आणि लाखो, करोडो रुपये गमावून बसतो.
काही वेळा व्हॉट्स ॲपवर, आपली बदली झाल्याने फर्निचर विकण्याबाबत छायाचित्रांसह माहिती दिली जाते आणि शहानिशा न केल्यास फसवणूक केली जाते.
पोलिस स्टेशनहून फोन आल्यास घाबरून जाऊ नका. तर त्याचे वरिष्ठ कोण आहेत, ते कुठून बोलत आहेत, असे प्रश्न विचारून त्यांना बोलते करा आणि तुम्ही फसू शकत नाही, हे पाहून ते तुमचा फोन कट करतील.
तुमचे पार्सल आले आहे आणि त्यात ड्रग्ज आहेत म्हणून घाबरवून सोडतील आणि फसवतील. मुलगा, मुलीचा अपघात झाला आहे, त्यांना ताबडतोब उपचारांची गरज असून त्यासाठी पैसे भरा म्हणून फोन येईल तर अशा फोन ना बळी पडू नका. तर ताबडतोब आपल्या मुलामुलीला फोन करून खातरजमा करून घ्या.
स्मार्ट फोन घेताय तर तसे स्मार्ट व्हा ! नाही तर फोन करण्यासाठी, फोन घेण्यासाठी साधा मोबाईल फोन वापरा ज्यामुळे तुम्ही फसवणूक टळू शकेल.
आता लग्न सराई सुरू असल्याने लग्न पत्रिका पाठवून त्या द्वारे फसवणूक होत आहे. त्यामुळे माहिती नसलेल्या नंबर वरून आलेली पत्रिका डाऊनलोड करू नका.
यानंतर विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्र्नांची, शंकांचे त्यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली.
कोणत्याही आजाराला घाबरु नका ! – सौ अलका भुजबळ
६ वर्षांपूर्वी कॅन्सर वर यशस्वी मात करून गप्प न बसता इतर कॅन्सर ग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर, दिलासा देण्याचे काम करीत असलेल्या सौ अलका भुजबळ यांनी थोडक्यात पण भाव विवश होऊन स्वतःच्या कॅन्सर वर मात करताना, शस्त्रक्रिया, केमोथेरपी याविषयी आलेले अनुभव कथन केले.
सकारात्मक विचार, कुटुंबीयांची, मैत्रिणींची साथ कशी महत्वाची ठरली याचे वर्णन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
कॅन्सर उपचाराने बरा होऊ शकतो, म्हणून कॅन्सर झाला म्हणून घाबरुन जाऊ नका. तर धीराने तोंड द्या. आजकाल अनेक प्रकारचे कॅन्सर होत असतात. म्हणून आपली जीवनशैली आरोग्यपूर्ण असली पाहिजे. अर्थात त्यामुळे आजार होणारच नाही असे नाही पण झाल्यास त्याचा आपण सक्षमपणे मुकाबला करू शकतो.
एखादा आजार जितक्या लवकर लक्षात येईल तितका तो बरा होण्याची शक्यता असते. म्हणून दरवर्षी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, जेणे करून काही आजार सुरू झाला असल्यास तत्काळ उपचार सुरू होऊ शकतात. आपण आपल्या डॉक्टरवर पूर्ण विश्वास ठेवावा. त्यांच्या उपचारांना सकारात्मकपणें प्रतिसाद द्यावा. शस्त्रक्रिया, केमोथेरपी याविषयीचे अनुभव कथन केले.
तसेच केवळ कॅन्सर च नाही, तर अन्य कोणताही आजार झाल्यास घाबरून न जाता आपण धीराने आणि अतिशय सकारात्मक राहिले पाहिजे तरच उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतो, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पकपणे उत्तरे देऊन उपस्थितांचे समाधान केले.
घरीच प्राकृतिक व्यंजन बनवा – सौ जयश्री मेमाणे
रविवारी, पाचव्या दिवशी आश्रमातील सौ जयश्री मेमाणे यांनी “अन्नपूर्णा” भोजनालयात आयोजित करण्यात आलेल्या
“प्राकृतिक व्यंजन” या विषयावर सांगोपांग मार्गदर्शन करून आपण घरच्या घरी सर्व “प्राकृतिक व्यंजन”, रस, काढे कसे बनवू शकतो यावर मुद्देसूद मांडणी केली. अपेक्षेप्रमाणे यावेळी आश्रमातील साधक भगिनींनी गर्दी केली होती. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना, शंकांना सौ जयश्री मेमाणे यांनी आत्मीयतेने उत्तरे देऊन उपस्थितांचे शंका समाधान केले.
एकंदरीतच ३ सख्यानी आपापल्या अनुभवांनी, विचारांनी, केलेले शंका समाधान यामुळे सर्व उपस्थित भारावून गेले. या तिघीं चे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
तिन्ही सख्यांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त तर आहेच आणि आवर्जून आचरणात आणण्यासारखेही आहे.
खुप सुंदर….सामाजिक न्याय मिळवण्या साठी आज पुरुष धडपडतो.पण त्यात ज्यांच्यावर विश्वास ठेवतो .ते न्यायाधीश ही छळ करत असतील .तर काय करेल तो पुरुष.वाचताना अस वाटलं की ही गोष्ट किती पुरुषांच्या बाबतीत घडत असेल.त्यांचे बळी जात असतील. आपला आभारी आहे अलका मॅडम..