न्युज स्टोरी टुडे ने आम्हाला काय दिले ? या विषयीचा प्रतिसाद अजून ही मिळतोच आहे. आज आणखी काही प्रतिक्रिया वाचू या.
१. न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने आम्हाला इतकं दिलंय की लिहावं तेवढं थोडंच. खरं सांगायचे म्हणज न्युज स्टोरी टुडे ने आम्हांला लिहायला प्रवृत्त केलं ! देवेंद्रजी आणि अलकाताई ही जोडीच अफलातून आहे. अतिशय उत्साही आणि inspiring आहेत म्हणून ही असेल कदाचित पण मला तरी त्यांच्यामुळे लिहीण्याची प्रेरणा मिळते हे मात्र नक्की !
मी रोज पोर्टलची वाट पहात असते. अनेकविध विषय घेऊन हे पोर्टल आपल्या समोर येतं आणि ज्ञानाचा, माहितीचा खजिना देऊन जाते. आजकाल वाचनाची, लिखाणाची आवड कमी झाली असं आपल्याला वाटतं पण खरं पहाता हा जुन्या पिढीने नवीन पिढीवर केलेला आरोप आहे. चांगलं, सुटसुटीत, सोप्या शब्दात लिहीलं तर लोक नक्की वाचतात अगदी नवीन पिढी सुद्धा, हे या पोर्टलवरुन समजतं. छोटे छोटे लेख, आटोपशीर मांडणी तरीही भरपूर content देणारं हे पोर्टल आहे. देवेंद्रजी, अलकाताई आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांना खूपखूप शुभेच्छा. या पोर्टलची प्रगती अधिकाधिक होवो हीच आज मनोकामना. धन्यवाद
- — प्रा सुनीता पाठक. छ.संभाजीनगर
- २. न्यूज स्टोरी टुडे हे वेब पोर्टल सुरू होऊन बघता बघता चार वर्षे उलटली. साहित्याचा, माहितीचा, मनोरंजनाचा, सामाजिक, कौटुंबिक घटनांचा, ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक, तात्त्विकतेचा अभिरुचीसंपन्न खजिना या पोर्टल द्वारे वाचकांसमोर सतत उलगडत असतो. एक वाचक आणि कधीकधी एक लेखिका म्हणूनही मी यासाठी न्यूज स्टोरी टुडे ची अत्यंत ऋणी आहे.
- कृतज्ञता व्यक्त करताना मला आणखी एक प्रश्न पडतो की मा. अलकाताई आणि मा. देवेंद्रजी यांनी का हा उपक्रम अथकपणे चालू ठेवला आहे ? आणि तेही कुठल्याही आर्थिक लाभाविना ! मग मनात येते हा उपक्रम नव्हे ही एक चळवळ आहे. मराठी भाषेच्या गाढ प्रेमातून आणि अभिमानातून उगम पावलेली ही एक भाषिक चळवळ आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल तेव्हा मिळेल पण न्यूज स्टोरी टुडे द्वारे जागतिक पातळीवर मराठी भाषा आणि मराठी मने जोडली जात आहेत हे मात्र खरं.
- गेल्या चार वर्षात या माध्यमातून अनेक लेखक/ लेखिका निर्माण झाले, अनेकांना लेखनासाठी हक्काचे व्यासपीठ नव्हे एक गुळगुळीत कागद मिळाला. तसेच अपूर्व असे वैचारिक मंथन इथे होत गेले /होत असते.
- या पोर्टलच्या वर्धापन दिनानिमित्त मी अलकाताई आणि देवेंद्रजींना भरभरून शुभेच्छा देते आणि मानाचा मुजरा करते.
- — राधिका भांडारकर. पुणे.
३. दिनांक २२ जुलै, २०२४ रोजी ‘न्यूज स्टोरी टुडे’ या आंतरराष्ट्रीय मराठी वेबपोर्टलनं साहित्याच्या पटांगणात विजयी ‘चौकार’ लगावल्याबद्दल पोर्टलचे सर्वेसर्वा मा. देवेंद्रजी सर व अलकाजी भुजबळ मॅडम यांचे विशेष अभिनंदन. मागील चार वर्षांत देश-विदेशांतील मराठी भाषिक साहित्यकर्मी व साहित्यप्रेमींना या पोर्टलनं मैत्रबंधात बांधून ठेवण्याची किमया करून दाखवली. तब्बल नव्वद देशांमध्ये पोहोचलेल्या या पोर्टलनं अल्पावधीतंच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. सुटसुटीतपणा, नेमकेपणा व सचित्रता ही ह्या पोर्टलची काही प्रमुख वैशिष्ट्ये. थेट प्रतिसादाच्या माध्यमातून वाचकांना लिहायला भाग पाडणारं ‘वाचक लिहितात’ हे सदर आवर्जून उल्लेख करण्याजोगं. ‘स्नेह-मिलन’ यां सारख्या उपक्रमांद्वारे लेखक व वाचक मंडळी यांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी देखील घडवून आणल्या जातात.
या पोर्टलशी मी दिनांक ३० एप्रिल, २०२४ रोजी जोडले गेले. मी कॅनडाची कायमस्वरूपी रहिवासी असून २१ एप्रिल, २०२४ रोजी संपन्न झालेल्या ‘मराठी भाषिक मंडळ, टोरांटो’ च्या ३६ व्या साहित्य संमेलनासंदर्भातील माझा वृत्तांतवजा लेख सदर पोर्टलद्वारे दिनांक ३० एप्रिल, २०२४ रोजी प्रकाशित झाला. श्री. भुजबळ सरांनी माझ्या लेखणीतून तळपणारं सूर्यतेज बारकाईने हेरलं. त्यांनी हक्काचा मंच आम्हा लेखनकर्ते मंडळींसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. पोर्टलच्या भावी वाटचालीसाठी व साहित्योपक्रमांसाठी शुभेच्छांचा हा पुष्पगुच्छ आपणास प्रदान करून मी आपल्या समस्त टीमचे पुनःश्च अभिनंदन करते.
— प्रियांका शिंदे-जगताप. कॅनडा.
४. न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ने मला काय दिले ?
- मला सर्वदुर प्रसिध्दी मिळाली. मी माझे हिंदी चित्रपट सृष्टीमधील अनुभव लिहीत असतो. ते अनुभव मा.भुजबळजी व त्यांची सर्व टीम हे अनुभव सर्व वाचक, रसिक यांच्यापर्यंत पोहोचवतात.
- मी मागील वर्षी अमेरिकेत होतो .योगायोगानें भुजबळजी तिकडेच होते. तेव्हा त्यांचे प्रवास वर्णन वाचून अमेरिकेत ही मला एकटेपणा जाणवला नाही. आपल्या माणसाची किंमत बाहेर गेल्यावरच जास्त कळते.
- भुजबळ जी तुमचे मन:पूर्वक सुरेल अभिनंदन.
- — सिने गायक उदय वाईकर.
- ५. सर्व प्रथम अलका भुजबळ आणि श्री भुजबळ यांचे मनापासून आभार.
- माझे कविता लिखाण साता समुद्रापार पोचले. इच्छा पूर्ण झाली. आपले विचार लोकांपर्यंत पोचणे महत्वाचे. त्यासाठी कोणीतरी लागते. मला स्वप्नातही वाटले नव्हते माझे लिखाण इतके दूरवर पोहोचेल ! पण ते झाले. खूप आनंद होत आहे.. ते महान कार्य आपल्या पोर्टल द्वारे ही दोघं करत आहेत. परत एकदा त्यांचे आभार. असेच आमचे कायम पाठीराखे रहा, हा प्रेमळ आग्रह.
- — मीरा जोशी. नवी मुंबई.
- ६. अलका, नवोदित कलाकारांना छान platform मिळवून देते. फक्त अप्रकाशित लेख कविता, लेख प्रसिद्ध करते हे यातील वैशिष्ट्य.
- वाचकांच्या प्रतिक्रिया पण वाचनीय असतात. या सर्वा मागे खूप कष्ट आहेत. 5/6 तास काम करते. वाखाणण्याजोगे काम
- — मृदुला चिटणीस. नवी मुंबई
- — टीम एन एस टी. ☎️ 9869484800
‘न्यूज स्टोरी टुडे’ने आम्हाला काय दिले? यातील प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला.
एकंदरीत सकारात्मकता पसरवण्याचे काम भुजबळ दांपत्याचे चालू आहे, याचा अभिमान वाटतो.