“मंजुळाक्षरे”
मुंबई महानगर पालिकेत तब्बल चौतीस वर्ष शिक्षिकेचे सेवाव्रत पार पाडताना विद्यार्थ्यांना कविता चालीसह शिकविल्या तर त्या त्यांना खूप छान पद्धतीने शिकता येतात, याचे आकलन मंजुळा म्हात्रे मॅडम यांना सुरुवातीलाच झाले आणि पुढे त्यांनी तीच पद्धत अमलात आणली.
शाळेच्या बालकोत्सवात एका प्रसंगावर कविता करायला सांगितली, ज्वलंत विषय होता ‘पाणी वाचवा’ अन् हीच संकल्पना त्यांच्या आयुष्यातली ‘पाणी वाचवा’ या पहिल्या वहिल्या कवितेला जन्म देणारी ठरली. प्रतिभा जागृत होतीच पण स्फुल्लिंग या पहिल्या कवितेत मिळालं आणि “मंजुळाक्षरे” या स्वरचित कवितांचा स्वतःचा असा वेगळ्या वाटेवरचा त्यांचा प्रवास सुरू झाला.

नुकताच मंजुळा म्हात्रे यांचा ‘मंजुळाक्षरे’ हा पहिलाच कवितासंग्रह त्यांच्या चिरनेर गावी प्रकाशित झाला. आपल्या मनोगतात त्यांनी कविता लेखनाची सुरूवात कशी झाली ते सांगितले आहे. या काव्यसंग्रहात त्यांनी त्याच्या ‘पाणी वाचवा’ या कवितेला पहिले स्थान दिले आहे. ‘पाणी वाचवा’, ‘जाग माणसा’ या कविता त्यांच्या ठायी असलेले सामाजिक भान दाखवतात.

कवयत्रीने अनेक वेगवेगळ्या विषयांवर कविता करताना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या आपल्या निसर्गरम्य ‘चिरनेर’ गावाचा त्यांना कसा अभिमान आहे आणि तो किती सार्थ आहे ते आपल्याला ‘माझे गाव’, ‘चिरनेरचा गणपती’ ‘पोवाडा’ अशा कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येते. माझे गाव या कवितेत त्या म्हणतात,
“ऐतिहासिक माझे गाव
नाव त्याचे चिरनेर
क्षुधा तृष्णा शांतीसाठी
आहे इथे चिरकाल नीर”
त्याच गावच्या पाण्याने इथल्या अनेक कलाकारांची कलेची तहान भागवली गेली. गावकऱ्यांच्या मनात क्रांतीची ज्योत धगधगत राहिली. आणि एक इतिहास घडवला गेला. त्यावेळी त्या म्हणतात,
“माझ्या गावच्या भूमीत क्रांतिकारक अनेक
माझ्या गावच्या भूमीत कलाकार हो कित्येक”..
आपले सण, म्हणजे संक्रांत, दिपावली यावर असलेल्या कवितेत त्या त्या सणांचे महत्त्व त्यांच्या प्रतिभेने पटवून दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरतील तसेच बालबुद्धीला चालना देऊन प्रश्न विचारणाऱ्या, विशेष बोध घेणाऱ्या कविता यात सामावलेल्या आहेत. निसर्गाची जपणूक कशी करावी हे सांगणाऱ्याही कविता आहेतच.
‘मंजुळाक्षरे’ म्हणजे कवयित्रीचा निसर्गाप्रती, समाजाप्रती असणारा आदरभावच शब्दाशब्दातून व्यक्त केलेला जाणवतो. एकूण ६९ कविता या संग्रहात आहेत. प्रत्येक कवितेतून आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न कवयित्री मंजुळाताई करतात. सर्वांप्रती कृतज्ञता हा त्यांच्या कवितेचा आत्मा आहे. मुळातच स्वभाव प्रेमळ, मायाळू असल्यामुळे शब्दांची पकड घेताना तितकाच प्रेमळपणा आपोआप त्यांना साध्य झाला आहे, हे खरंच कौतुक करण्या सारखेच.
श्री. वैभव धनावडे यांच्या ‘साहित्यसंपदा’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘मंजुळाक्षरे’ काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत समर्पक असे आहे. निसर्ग, समाजभान, सध्याच्या समस्या, नातेबंध अशा अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केल्यामुळे हा काव्य संग्रह वाचनीय झाला आहे आणि तो काव्य रसिकांना निश्चितच आवडेल.

— परीक्षण : सौ. सलोनी बोरकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800