Home बातम्या प्रकाशनाचा मान मुलांना !

प्रकाशनाचा मान मुलांना !

1

आपण नेहमी बघतो की, लेखक, प्रकाशक यांचा प्रयत्न हा त्या त्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे असा असतो. आणि ते साहजिक ही आहे.

पण पुणे येथे मात्र एक अभिनव पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.

कवियीत्री, हाडाच्या शिक्षिका आणि त्या जोडीलाच सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या स्मिता धारूरकर यांनी त्यांच्या “शालेय प्रार्थना व गीत संग्रह” या पुस्तकाचे प्रकाशन विद्यार्थ्यांच्या हस्ते केले. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन विद्यार्थ्यांच्या हस्ते हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

नेहमी पुस्तकात वाचल्या जाणाऱ्या कविता लिहिणारे कवी नेमके कोण, ते कविता कशी लिहितात या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाली.

या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी राजेंद्र वाघ, सिंहगड परिसरातील कवी राहुल भोसले लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी सुधाकर धोपटे होते.

यावेळी झालेल्या बालकवी संमेलनात प्रज्ञा अंदुरे, स्मिरल कंदले, भक्ती मोळे, आदित्य घोलप, अपूर्वा धारूरकर, अनन्या कानडे, प्रियंका गायकवाड या बालकवींनी सहभाग घेतला. तसेच शुभदा कोकीळ, पंकज काटकर, केशव वारे, स्मिता कंदले, योगिता कोठेकर, प्रतिभा विभुते, योगेश हरणे, राहुल भोसले, सुभाष कासार, राजेंद्र वाघ, सुधाकर धोपटे यांनीही आपल्या बालकविता हसत खेळत सादर केल्या.

कवी राजेंद्र वाघ, राहुल भोसले, सुभाष कासार, पंकज काटकर , केशव वारे आदी कवींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सायली खुटाळेची गणेशवंदना, स्पृहा कंदलेची शिववंदना, साईश धोपटे याचे गणेश स्तोत्र सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले.

प्रसिद्ध गायक मुकेश ललगुणकर यांच्या “मेरा जुता है जापानी” या गाण्याला सर्वांनी टाळ्यांनी सुंदर साथ दिली.

विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड वृध्दींगत व्हावी यासाठी सर्व मान्यवरांनी सहकार्य करण्याचे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास ललित पब्लिकेशन्सच्या प्रियंका पाटील कोलते, राहुरीचे माजी प्राध्यापक ज्ञानदेव अष्टेकर, सिंहगड रोड कासार समाज ग्रुपचे संस्थापक- अध्यक्ष दीपक अंदुरे, विद्यमान अध्यक्ष सचिन पातुरकर, महेश अष्टेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. मुलांच्या हस्ते प्रकाशन ही अभिनव कल्पना आवडली.पुढच्या पिढीला मराठीची गोडी अशा उपक्रमांनी लागेल. कार्यक्रमाचा वृत्तांत वाचून सर्वच कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्याचे जाणवते. अभिनंदन.
    .. नीला बर्वे,
    सिंगापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version