शाॅपिझन संस्थेची निर्मिती असलेली लेखिका प्राची राजे ह्यांची कादंबरी मालिका, रियाना हिचा पुस्तक प्रकाशन समारंभ रविवार दिनांक ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी ऑनलाईन कार्यक्रमात संपन्न झाला.
स्मृती-गंध फेसबुक समूह ह्या कै. सौ. मंगला मदन फडणीस स्मृतिप्रीत्यर्थ स्थापित समूहाचा सातवा वर्धापन दिन दिनांक ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी ऑनलाईन कार्यक्रमात साजरा करण्यात आला. स्मृती-गंध समूहाचे प्रेरणास्रोत असलेल्या दिवंगत कै. सौ.मंगला मदन फडणीस ह्यांचा हा ३२ वा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या कार्याचा परिचय आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या स्मृती-गंध समूहाच्या कार्याचा परिचय संस्थेच्या संस्थापिका सौ. मृदुला राजे ह्यांनी करून दिला. त्यांनी आपल्या भाषणात आपल्या दिवंगत आई कै.सौ.मंगला फडणीस ह्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली आणि स्मृती-गंध समूहातर्फे आईच्या सामाजिक कार्याची धुरा पुढे नेण्याचा संकल्प केला.
ह्याच प्रसंगी स्मृती-गंध समूह संचालिका व शाॅपिझनची लेखिका प्राची राजे ह्यांच्या रियाना कादंबरीचा प्रकाशन समारंभ साजरा करण्यात आला. समारंभाच्या प्रमुख अतिथी “आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय संस्था” ह्यांच्या संस्थापिका आणि मान्यवर लेखिका प्रा. पद्माताई हुशिंग, तसेच सन्माननीय अतिथी “शब्दमोती साहित्य मंच, मुंबई” ह्या साहित्यिक संस्थेच्या संस्थापिका व बहुप्रसवी लेखिका सौ.स्वाती शृंगारपुरे ह्यांनी संयुक्त रीत्या “रियाना” कादंबरीचे प्रकाशन झाल्याचे घोषित केले. शाॅपिझन संस्थेच्या मराठी व हिंदी विभागप्रमुख ऋचा कर्पे ह्यांच्या उपस्थितीने समारंभाची शोभा वाढवली. दोन्ही मान्यवर अतिथींनी प्रकाशक ऋचा कर्पे व लेखिका प्राची राजे ह्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
रियानाच्या निर्माण प्रक्रियेत आलेले रोमांचक अनुभव आणि वाचकांचा प्रतिसाद ह्याविषयी ऋचा कर्पे ह्यांनी शाॅपिझन प्रकाशन संस्थेतर्फे आपले विचार व्यक्त केले आणि लेखिका प्राची राजे ह्यांचे अभिनंदन केले व पुढच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्राची राजे ह्यांनी रियाना ह्या गूढ रहस्य कादंबरीचे कथाबीज आपल्या मनात किती खोलवर रुजले होते आणि त्याला शब्द स्वरूप देताना व प्रत्येक आठवड्याला एक भाग ह्या पद्धतीने मालिका साकारताना काय काय अनुभव आले आणि वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेल्याने कसे प्रोत्साहन मिळाले व लेखनाची प्रेरणा मिळत गेली ह्या विषयी निवेदन करून शाॅपिझन संस्थेचे, मराठी विभाग प्रमुख ऋचा कर्पे ह्यांचे व सर्व वाचकांचे आभार मानले. मालिकेला कादंबरी स्वरूपात साकार करताना होत असलेला आनंद व्यक्त केला आणि ह्याच गूढ रहस्य कादंबरी मालिकेचा हिंदी अनुवाद पुढच्याच आठवड्यात शाॅपिझन हिंदी लेखन विभागात चालू करणार असल्याची घोषणा केली.
मराठीतील ह्या मालिकेला लाभलेला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद हेच ह्या कादंबरीचे खरे यश आहे, असा विचार करून प्रारंभापासूनच ही मालिका वाचून त्यावर अभिप्राय लेखन करणाऱ्या शाॅपिझनच्या तीन वाचक प्रतिनिधींना आपले रियाना विषयीचे विचार व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली होती आणि अशा तीन वाचक प्रतिनिधींना कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ लेखिका हेमलता देशपांडे, हरहुन्नरी लेखिका सौ.सीमा पुराणिक आणि रियानाची आतुरतेने वाट पाहात प्रत्येक भाग उत्सुकतेने वाचणारी वाचनप्रिय सखी सौ. प्रेरणा खेडकर ह्यांनी आपल्या रियाना वाचताना होणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करून लेखिका प्राची राजे हिचे अभिनंदन केले.

समारंभाच्या प्रमुख अतिथी प्रा.पद्मा हुशिंग ह्यांनी रियाना कादंबरी वाचताना आलेले अनुभव आणि त्यातून घडणारे वास्तव जीवनाचे दर्शन ह्याविषयी विचार व्यक्त केले. अतिशय अभ्यासू वृत्तीच्या आणि ज्ञानोपासक पद्माताई हुशिंग ह्यांनी “रियाना” ह्या कादंबरीच्या शीर्षकाचा शोध घेऊन त्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट केला. “रियाना” म्हणजे अंधःकारातील प्रकाशरेखा ह्याचा “रियाना” कादंबरीच्या शीर्षकाशी असलेला घनिष्ठ संबंध व्यक्त करत पद्माताई हुशिंग ह्यांनी रियाना कादंबरीचे विविध पैलू उलगडून दाखवले. लेखिका प्राची राजे ह्या स्वतः आय.टी. इंजिनिअर आणि बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर नोकरी करत असूनही त्यांचे साहित्य निर्मितीमधले योगदान, मिळत सातत्यपूर्ण लेखन आणि लेखनातील विविधता व सकसता ह्यांचे त्यांनी कौतुक व अभिनंदन केले.
समारंभाच्या सन्माननीय अतिथी स्वाती शृंगारपुरे ह्यांनी प्राची राजे ह्यांचे स्मृती-गंध समूहातील योगदान आणि लोकप्रियता ह्यांचे वर्णन करून त्यांच्या रियाना कादंबरीतील सकस आशय आणि सुंदर, ओघवती भाषाशैली ह्यांच्यावर भाष्य केले. प्राची राजे ह्यांना लेखनाच्या प्रारंभिक अवस्थेत मार्गदर्शक ठरलेल्या स्वाती शृंगारपुरे ह्यांनी त्यांना पुढच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्मृती-गंध संस्थेच्या संस्थापिका व लेखिका सौ.मृदुला राजे ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि सदस्य सौ.मनीषा जोशी ह्यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाचा समारोप केला.
— लेखन : मृदुला राजे.
स्मृती-गंध समूह संस्थापिका. जमशेदपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
