जीवनाचे तत्त्वज्ञान साध्या सोप्या काव्यातुन सांगणार्या बहिणाबाईं चौधरी यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या काव्याचा आस्वाद घेणारा हा विशेष लेख.
बहिणाबाईंना विनम्र अभिवादन.
— संपादक
बहिणाबाईंचे काव्य प्रकाशन झाले नसते तर काय झाले असते याचा विचार करण्यापुर्वी आपण त्यांच्या कवितांबद्दल विचार करू. त्या कवितांचे…
१] सामाजिक आशयाच्या कविता
२] जीवनविषयक तत्वज्ञान सांगणाऱ्या कविता
३] आध्यात्मिक आशयाच्या कविता
४] वर्णनात्मक कविता असे वर्गीकरण करू.
१) बहिणाबाईंच्या सामाजिक आशयाच्या कविता…
लेवा पाटीदार समाजामध्ये जन्मलेल्या बहिणाबाईंच्या कवितेत सामाजिक आशयाचा विचार करताना भौगोलिक व भाषिक वैशिष्ठ्ये लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या अनेक कवितांत सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. पूर्वीच्या लग्नात वरमाईला झोपाळ्यावर बसवून वधुपक्षांच्या माणसांनी ‘नको’ म्हणेपर्यंत तिच्या अंगावर पाणी ओतत राहायचे अशी मोठी मानाची समजली जाणारी पध्दत असे. बहिणाबाईंची विनोदबुध्दी, प्रास-अनुप्रास, यमके, कोट्या यांचे शास्त्रीय ज्ञान नसतानाही जे त्यांच्या काव्यात ठाई ठाई विखुरलेले आहे.त्याचे मनोज्ञ उदाहरण खालील कवितेत आढळते.
‘माझ्या माहेरच्या वाटे
रेलवाईच फाटक
आगगाडीचं येनं जानं
तिले कशाची आटाक ?’
माझ्या माहेराच्या वाटे
डाबा पान्याच्या लागल्या
म्हशी बसल्या पान्यात
जशा वरमाई न्हाल्या.
बहिणाबाईंची कविता प्रसन्न, रुजलेली आहे. विधायक आणि संस्कारयुक्त आहे. तीत सहसा नकारात्मक भाव आढळत नाही. बहिणाबाईंनी गाणी गात, सुखाला नकार देत दुःखाला होकार देत खरा संसार केला आणि संसाराचे मर्म पुढच्याना सांगून ठेवले.
अरे संसार संसार
नाही रडनं कुढनं
येड्या गयातला हार
म्हणू नोको रे लोढण
देखा संसार संसार
दोन्ही जीवाचा सुधार
कधी नगद उधार
सुखदुःखाचा बेपार
शेतकऱ्याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’ व ‘बैलाचे कौतुक करण्यासाठी त्याच्या श्रमांविषयी कृतज्ञता म्हणून हा सण साजरा करतात. याबद्दल बहिणाबाईं म्हणतात…
व्हते आपली हाऊस आन l बैलाले तरास
आता पुंजा रे बैलाले l फेडा उपकाराचं देनं
बैल खरा तुझा सण l शेतकऱ्या तुझं हीन l
या व अशा अनेक कवितांतून बहिणाबाईंच्या प्रतिभेचे जीवन सृष्टीचे दर्शन तर घडवितातच, पण त्याच बरोबर त्या आपल्याला तत्कालीन समाजाच्या चाली-रितींचे, मानसिकतेचेही व्यापक भान देतात.

२) जीवन विषयक तत्वज्ञान सांगणाऱ्या कविता –
बहिणाबाईंचे काव्य एका निरक्षर स्त्रीचे काव्य असले, तरी तेही अक्षर वाड्मयाशी जवळीक साधणारे ठरले आहे. कारण ते स्वानुभवावर उभे आहे. जे काही समाजहिताचे तत्वज्ञान त्यातून आपल्याला मिळते, ते बहिणाबाईंनी प्रथम स्वतःसाठी स्वतःला सांगितले आहे. स्वतःच्या सुखदुःखातून – त्रयस्थ – तटस्थ बुध्दीने स्वतःला केलेला उपदेश आहे.
बहिणाबाईंचा एक विशेष असा दिसून येतो की, त्या दैववादी अजिबात नव्हत्या. खरे म्हणजे दुःखाचे आघात झाल्यावर एखादी स्त्री हळवी, दुबळी, असहाय्य होऊ शकते. पण बहिणाबाईं मात्र त्यातली स्त्री नव्हती. ‘लपे कर्माची रेखा’ या कवितेत त्यांच्या या परखड वृत्तीचे दर्शन घडते.
नको नको रे ज्योतिषा l
नको हात माझा पाहू l
माझं दैव माले कये l
माझ्या दारी नको येऊ l
ज्याला स्वतःचे नशीब समजते, स्वतःच्या कर्तबगारीवर आणि देवावर ज्याचा गाढ विश्वास असतो त्याला खऱ्या खोट्या आधारांची गरज वाटत नाही, नव्हे त्यावर विसंबून राहणे आवडतच नाही. अशा होत्या बहिणाबाईं, स्वयंसिध्दा.
३) आध्यात्मिक आशयाच्या कविता –
बहिणाबाईंच्या कवित्वाला परतत्वाचा स्पर्श अनेक ठिकाणी जाणवतो व वाचकाला सुखावून व शिकवून जातो. काहीतरी जीवनाचे तत्वज्ञान जगायला लागणारे शहाणपण, जीवनाचे इतरांना न दिसलेले अर्थ, सामान्य माणसांमध्ये दिसणारे देवत्व, निसर्गातल्या विविध गोष्टींत सापडलेला अर्थ वाचकाला त्यांच्या वेगवेगळेपणामुळे चकित करून सोडणारे असतात.
बहिणाबाईंना प्रतिभेचे वरदान कुठून लाभले हे वाचकांना गूढ वाटत असले तरी त्याचा उगम कुठून आहे हे बहिणाबाईंना मात्र चांगल्या रीतीने ज्ञात होते. त्यांनी त्यांच्या काव्यात जाहीर करून टाकले आहे.
माझी माय सरसोती
मले शिकोयते बोली
लेक बहीनाच्या मनी
किती गुपीतं पेरली
माझी आईच सरस्वती आहे. ती मला बोली शिकविते आणि तिची मी लेक आहे. माझ्या मनात कितीतरी गुपिते तिने पेरलेली आहेत. ती गुपिते काव्याचे रूप घेऊन ठिकठिकाणी उगवलेली, फुललेली, दिसतात. इतकेच नव्हे, तर त्या म्हणतात –
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता भागवत
पावसात समावतं
माटीमंधी उगवत
संतांच्या काव्याला जसा ‘परतत्वस्पर्श’ आहे तसाच तो बहिणाबाईंच्या काव्यालाही आहे. कवित्व, रसिकत्व व परतत्वस्पर्श यांचा बहिणाबाईंच्या काव्यात आढळणारा हा त्रिवेणी संगम. तो या काव्याचा, परंपरेशी असलेला धागा उलगडतो आणि नव्या प्रज्ञेचे दर्शन घडवितो.
४) वर्णनात्मक कविता –
बहिणाबाईंच्या वर्णनात्मक कविता म्हणजे एक प्रकारचे हितगुजच. कवीचे मन कधीच गप्प नसते. ते सतत स्वतःशी तरी बोलत असतेच. जीवनाचे इतर व्यवहार चालू असताना कवीच्या मनाचा आपलाच आपणाशी संवाद चालूच असतो. बहिणाबाईंची वर्णन करण्याची हातोटी इतकी सुंदर आहे की, त्या सांगत असलेल्या कथाकथनाशी वाचक खिळून तर राहतोच पण वर्णनातली उत्कटता व सहजता त्याच्या मनाला मोहून टाकते.
एका गोसाव्याची कथा ‘गोसाई’ या कवितेत त्या सांगताहेत. गोसाव्याचे वर्णन करताना केलेली शब्दयोजना मन वेधून घेते.
तठे बसला गोसाई l धुनी धुनी पेटली शेतात
करे बंब भोलानाथ l चिमटा घीसन हातात
मोठा गोसायी यवगी l त्याच्यापाशी रे इलम
राहे रानात एकटा l बसे ओढत चिलम
बहिणाबाईंच्या वर्णनात्मक कविता वाचताना आपण जणू एखाद्या चित्र दालनातूनच संचार करीत आहोत असे वाचकाला वाटत राहते. त्या व्यक्ती, त्यांचा तो समाज, चालीरीती आणि हे सगळे टिपणारी बहिणाबाईंची सुक्ष्मदृष्टी यांचा एक खोल ठसा वाचकांच्या मनावर उमटतो.
एका दैवी परतत्व स्पर्शाने बहिणाबाईंचं काव्य हे एका निरक्षर स्त्रीनं जन्माला घातलेलं, ‘अक्षरत्व’ पावलेलं थोर वाड्मय आहे. अशी थोरवी लाभलेल्या, श्रध्दामय, भक्तीपूर्ण असा मनाचा दैवी लाभ बहिणाबाईंना झाला होता. त्याच आत्मबळावर त्यांनी स्त्रीजीवनाला जखडून टाकणाऱ्या दुर्बलतेवर मात केलेली आढळते. विचारांची सुस्पष्टता, सुविचार व सदभावनेतून लाभणारे आत्मबळाचे सहाय्य ही बहिणाबाईंच्या निर्मळ असा प्रतिभेचा गाभा आहे. त्यामुळेच त्यांना एक वेगळीच जीवनदृष्टी होती. त्या दृष्टीतूनच जगाकडे पाहता पाहता त्यांना जीवन खऱ्या अर्थाने जगायला लागणारं शहाणपण सहज मिळालं. त्याच सुगंधाने त्यांच्या काव्यप्रांताचा आसमंत दरवळला आहे. निरक्षर असलेल्या या भाग्यवान कवयित्रीला या सर्व गुणांमुळे अक्षर वाड्मयात अढळ स्थान प्राप्त झालेलं आहे.
बहिणाबाईंच्या काव्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते की बहिणाबाईंची गाणी प्रसिध्द होणे किती आवश्यक होते. बहिणाबाईं निरक्षर होत्या त्यामुळे त्या त्यांची गाणी लिहून काढणे शक्यच नव्हते. परंतु त्यांचे सुपूत्र कविवर्य सोपानदेव चौधरी यांनी आणि त्यांचे मावसभाऊ पितांबर चौधरी यांनी बहिणाबाईं गाणी म्हणत असताना लिहून काढली व बहिणाबाईंच्या निधनानंतर १९५२ साली ती गाणी आचार्य अत्रे यांना दाखवली.त्यांना ती खूप आवडली व त्यांनी प्रकाशित करण्यासाठी सहकार्य केले.
बहिणाबाईंचे काव्य प्रकाशन झाले नसते तर दोन गोष्टी झाल्या असत्या…
(१) बहिणाबाईंच्या मृत्युनंतर का होईना कवियत्री म्हणून त्या प्रसिध्दीस आल्या नसत्या.
(२) मराठी वाड्मयात मोलाची भर पडली नसती. यातली दुसरी शक्यता जास्त मोलाची आहे. जर बहिणाबाईंचे काव्य प्रकाशन झाले नसते तर मराठी वाड्मयात मोलाची भर पडली नसती. यासाठी बहिणाबाईंचे काव्य प्रकाशन करण्यास सहाय्य करणारे कविवर्य सोपानदेव चौधरी, आचार्य अत्रे इत्यादींचे आभार मानणे आवश्यक आहे.

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
