Tuesday, September 16, 2025
Homeलेख'बातमीदारी करताना' (२३)

‘बातमीदारी करताना’ (२३)

बातमीदार अलेक्स
टी पी  ए अलेक्झांडर किंवा अलेक्स या नावाने आमच्या क्षेत्रात ओळखलं जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे एक अवलिया होतं. मुंबई  शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या आमच्या वृत्तसंस्थेला देणारा तो प्रसिद्ध बातमीदार होता. आमच्या कार्यालयातील प्रथेप्रमाणे त्याला ‘टी पी ए’ या अद्याक्षराने  आम्ही ओळखत  असू.

पण त्या विषयी थोडं नंतर… त्याला अवलिया का म्हणायचे यासाठी एक-दोन छोटे मुद्दे आधी….
माझी त्याची ओळख झाली तेव्हा तो माझ्यापेक्षा वर्षभराने सिनियर होता. केरळ येथून पोटापाण्यासाठी इतक्या लांब वर आला होता. नोकरी मिळाली तरी तात्पुरती आणि खूप कमी पगाराची अशी परिस्थिती सतत होत राहायची. मग दुसरं काही काम मिळतं का हे बघायचं. त्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाच्या छोट्या जाहिराती कडे त्याचं लक्ष असायचं.

पेडर रोड मधील आजोबांची छोटी जाहिरात होती. मुलगा आणि सून पॅरिस मध्ये नोकरी करत होते. नातू चारेक वर्षाचा होता. त्याला फ्रेंच भाषा शिकवणारा टयूटर- शिक्षक किंवा शिक्षिका- हवी होती.  फ्रेंच, जर्मन, जापनीज भाषा शिकवणारे असंख्य क्लासेस आता प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये खूप मोठ्या संख्येने  उपलब्ध आहेत. त्याकाळी म्हणजे 1972 मध्ये तसे ट्यूटर मिळत नसत.

दिलेल्या  पत्यावर अलेक्स  पोहोचला. मोठ्या बंगल्यात  लॉनवर आजोबा आणि आजी सकाळचा नाश्ता करीत होते. नातू हुंदडत होता. आजोबांनी थोडक्यात तपशील सांगितला. मुलगा आणि सून  उच्चपदस्थ होते. पॅरिस मध्ये नोकरी करीत होते. त्यांनी नातवाला आजोबा आजी कडे मुंबईत ठेवलं होतं. सहा महिन्यात मुंबईला येऊन बाळाला घेऊन पॅरिस ला जायचा त्यांचा प्लान होता. तिथे गेल्यानंतर त्याला तिथल्या मॉटेसरी मध्ये प्रवेश  द्यायचा होता. तोपर्यंत त्याची अक्षर ओळख तरी व्हावी म्हणून ट्यूटर हवा होता.

बाळ व्रात्य होतं. दोन मिनिट सुद्धा एका ठिकाणी बसत नव्हतं. जमेल तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करायचा एवढीच आजोबा आजींची माफक अपेक्षा होती. फी चा प्रश्न नव्हता. आजोबा आजी यांना फ्रेंच भाषा अजिबात येत नव्हती. सकाळी ब्रेकफास्ट च्या वेळी  तासभर ट्युशनला यायचे ठरले. मुबलक फी ठरली.  छोटी आकर्षक पुस्तके, खेळणी आणण्याची जबाबदारी त्याच्यावर त्यांनी सोपविली. दोन पुस्तकं – एक स्वतः साठी  आणि दुसरं  बाळासाठी – अशी खरेदी करून अलेक्सने सुरुवात केली. त्याला तरी कुठे फ्रेंच येत होतं !

स्वतः मूळाक्षर -अल्फाबेट-  शिकून त्याने दुसऱ्या दिवशी ट्यूशन सुरू केली. दोघांचा  ब्रेकफास्ट झाला की ट्यूशन सुरू करायची असं ठरलं होतं. पण प्रत्यक्षात बाळ बंगलाभर खाली वर उड्या मारत दंगा मस्ती करायचा. ट्युशन ची वेळ निघून जायची. दोन अडीच महिने हाच उपक्रम सुरू राहिला. बाळ शिकणे अशक्य  होते. अलेक्सने स्वतः फ्रेंच भाषा जुजबी शिकून घेतली एवढाच फायदा झाला.

तेवढ्यात अलेक्स ला युएनआय ची नोकरी मिळाली. त्याचे काम भागले. आमची ओळख त्याच वेळी झाली. खूप छान इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीज तो द्यायचा. सब एडिटर म्हणजे उपसंपादक असल्यामुळे माझ्या शिफ्ट मध्ये त्याच्या बातम्यांचं संपादन करणं हे माझं काम. आमची चांगली गट्टी जमली.

माझ्या लग्नाची पत्रिका घेऊन त्या दिवशी मी त्याला भेटलो. पत्रिका स्वीकारताना ज्या औपचारिक गोष्टी विचारायच्या असतात तेवढ्या त्याने विचारल्या आणि गंभीर चेहरा करत ‘सॉरी, किरण. मी नाही येऊ शकत लग्नाला. मुंबईहून नाशिकला लग्नाला येण अवघड आहे हे तुला माहितीच आहे. पण तुझ्या लग्नाची बातमी मी त्या दिवशी टेलिप्रिंटर वरून रिलीज  करेन. असं तोंडभरून आश्वासन दिल. तो चेष्टा करतो आहे हे लक्षात आलं होतं. तरी त्याला मी म्हणालो ‘कशी देणार तू माझी  बातमी ?’

दोन मिनिटात त्याने टाईपराइटर वर बातमी लिहिली.
Nashik, May 15. United News of India sub-editor Kiran Thakur got married to Miss  Nanda Nikam here today.  He was 25.
लक्षात आलं ?  ‘बिचारा किरण कालपर्यंत मुक्त जीव होता तो  आज म्येला !.
ऑफिस मधल्या उपस्थित सर्वांना या मजकुराचा कागद फिरवला. वाचून वाचून प्रत्येक जण फि’सकन हसून स्वतःच्या कॉमेंट्स खरडून पुढे बातमी सरकवत होता.

दोन चार महिन्यांनी एका शनिवारी माझी रात्रपाळी असताना तो मला टाईप केलेले एक मोठे फीचर  संपादनासाठी देऊन गेला. विषय मला पूर्णपणे नवीन होता पण इतक्या छान सोप्या भाषेत तो संपूर्ण लेख इंग्रजीत मला देऊन गेला. चुका फारशा नव्हत्या.  त्यामुळे संपादन करून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी आमच्या टेलिप्रिंटर वर रिलीज करण्यासाठी  ठेवून दिला. रविवारी वृत्तपत्रामध्ये आणि वृत्तसंस्था मध्ये बातम्याचा फ्लो खूप कमी असतो. त्यामुळे “संडे मॉर्निंग रिलीज” असं नोंदवून सकाळच्या उपसंपादकाकडे तसं मी तयार करून ठेवलं. रविवारी माझी सुटी असल्यामुळे बातमीचा विषय पूर्णपणे विसरलो.

तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळच्या शिफ्टला ड्युटीवर पोहोचलो. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, या सकट देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या वर्तमानपत्रात ठळकपणे यु एन आय ची ती बातमी झळकली. ती वाचल्यानंतर लक्षात आलं. “अरे, हे तर मीच संपादन  केलेले  फीचर !”

आमच्या दिल्लीच्या मुख्य संपादकांकडून आणि सर्व प्रमुख शहरातील ब्युरो मॅनेजर्स कडून अभिनंदनाचे संदेश येत राहिले.  यु एन आय ची ती बातमी ठळकपणे आल्याचे ते संदेश होते. आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा विषय होता.

हा अलेक्स ने  लिहिलेला लेख मटका किंग रतन खत्री याच्या विषयी होता. मटका  खेळण्याचे पत्ते (प्लेइंग कार्ड) सकाळी आणि संध्याकाळी रोज विशिष्ट  वेळी रतन खत्री काढायचा आणि त्याच्यावर देशभर सट्टा लावला जायचा. आकडा काढला की तो देशातील लहान मोठ्या सर्व गावी कानाकोपऱ्यात कळवण्यासाठी  टेलिफोन चे कॉल ऑपरेटर लावून द्यायचे. हे सर्व लाईटनिंग कॉल असायचे. यासाठी  कॉल दर आठ पट ज्यादा असायचा. इतर सर्व कॉल बंद ठेवून मटक्याचे कॉल द्यावे लागायचे. हा आकडा कळाला की ज्याच्या बरोबर लागला असेल त्याला अनेकपटीने मटक्याचे बुकी पेमेंट करायचे. आकडा बरोबर लागला नसेल त्यांचे सट्ट्यावर लावलेले पैसे बुडायचे.

मटका किंग रतन खत्री

हा सर्व  व्यवहार एका रात्रीत कोट्यवधी रुपयांचा देखील असायचा. मटका चा आकडा लावण्याचे कोट्यवधी लोकांना व्यसन लागले होते. पैसे बुडाले की ते परत मिळण्याची शक्यता अजिबात नव्हती.  त्यामुळे कुटुंबाच्या कुटुंब बरबाद होत चालली होती. कुठे  कागदोपत्री नोंद असणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी धाडी घातल्या तरी त्यांच्या हाती काहीही लागायचे नाही. पोलीस यंत्रणा हतबल झाली होती.

त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील हा सट्टा बंद करा असे आदेश देशभरातल्या पोलीस यंत्रणेला दिले होते. पण ते काहीही करू शकले नाहीत .
सट्टयाविरुद्ध पत्रकार सुद्धा फार काही करू शकले नाहीत. कारण कुठेही पुरेसा पुरावा उपलब्ध नव्हता. वर्तमानपत्रात दोन ओळींची सुद्धा बातमी येत नव्हती.  अलेक्सने जीवाची जोखीम पत्करत पण अतिशय सुरक्षित पद्धतीने तपशील देत देत हे मोठे फीचर इंग्रजीत लिहीले होते. यु एन आय च्या माध्यमातून देशभर अनेक ठिकाणी ते छापून आले.

दिल्ली-मुंबई चे वरिष्ठ पोलीस अधिकारी खडबडून जागे झाले. रतन खत्री चे नाव समाजाला, मटका खेळणाऱ्या बुकींना आणि पैसे  लावून रोज संध्याकाळी पैसे हरणाऱ्या पंटर्सना देखील माहीत नव्हते. अलेक्स मुळे एका दिवसात देशभर त्याचे नाव झाले. रतन खत्री ची माणसं हल्ला करतील, जीव देखील घेतील अशी रास्त भीती होती. पण काही घडले नाही. रतन खत्री चा मटक्याचा सट्टा चालूच राहिला.

त्यावेळच्या इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या साप्ताहिकात अलेक्झांडरने लिहिलेला आणखी एक सविस्तर लेख फोटोसकट प्रसिद्ध झाला. रतन खत्री याच्या जीवनावर आधारित एक हिंदी सिनेमा फिरोज खान ने ‘धर्मात्मा’ या नावाने काढला.

अलेक्स

आणीबाणी पूर्वी 1975 अलेक्स ने यु एन आय ची नोकरी सोडली. काही काळ गल्फ मध्ये जाऊन तेथे  पत्रकारिता केली. केरळ मधील कोट्टायम जिल्ह्यात आपलं जन्मगाव कांजिरापल्ली येथे रबराच्या शेतीत काम केलं. तिथे देखील स्वस्थ बसवेना म्हणून आपल्या घरूनच पत्रकारिता केली. बारा मे 2013 रोजी त्याने अंतिम श्वास घेतला. तेव्हा  जगभर पसरलेले त्याचे मित्र आणि सहकारी हळहळले. मी त्यात होतो हे वेगळे सांगायला नको…..

प्रा. डॉ. किरण ठाकूर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments