Saturday, March 15, 2025
Homeलेखभले ठेऊ लक्षात...

भले ठेऊ लक्षात…

“भले बुरे जे घडुन गेले विसरून जाऊ सारे क्षण हे
जरा विसाऊ या वळणावर, ह्या वळणावर”….
किती छान ओळी आहेत ह्या ! हे गाणे बऱ्याच वेळा ओठी येत असते. म्हणून आज वर्ष सरता सरता ह्या ओळींवरून काही लिहावेसे वाटले…..

सरत असतात वर्षे आणि काळ एखादया कॅलेंडर प्रमाणे आणि त्याच बरोबर काही सुखद, काही वाईट आठवणी सुद्धा.
प्रत्येक वर्षी नवीन वर्षाचे स्वागत अगदी आनंदाने करतो.पार्ट्या करतो,एकमेकांना शुभेच्छा देतो.
सगळ्यांच्या शुभेच्छामुळे खरेच टिकणारे सुख आणि आनंद मिळतो का ?

खरे तर इतक्या शुभेच्छा आपण सकारात्मक भावनेने देतो का ? नविन वर्षाच्याच नव्हेतर इतर वेळी काही निमित्ताने देत असतो पण खरच अंतरंगापासुन त्या दिल्या जातात का आपल्याकडून ?

मला नेहमी वाटते हे वर्ष सगळ्यांचे सुखाचे व आनंदाचे जावे. पण कसे ? मग विचार केला मी, की सुखाच्या व्याख्या बदलल्या आहेत. पैसा, उच्च शिक्षण, करिअर हेच जीवनाचे इति कर्तव्य ठरवल्यामुळे आपण त्यात इतके गुरफटलो की जीवनातील खऱ्या सुखाकडे न कळतच पाठ फिरवल्या जाते.

आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि दुःखे कधी संपत नाही. काही दुःखे ही आपल्या पुर्व कर्मानुसार येतात. तर काही ह्याच जन्मातील कर्मांमुळे येतात.
त्यामुळेच द्वेष, मत्सर, असुरक्षितता ह्या भावना वाढीस लागतात. दुसऱ्याची हेटाळणी, अपमान, मानवी पिळवणुक आणि मानवी मुल्यांची पायमल्ली फार होऊ लागल्याने सर्वत्र निराशा वाढू लागली आहे.

भावनिक कोरडेपणा, असंवेदनशील मने, काही गोष्टींविषयीची सहजता नसणे, अशा कितीतरी बाबींनी आपण हरवुन गेलो आहोत.

सगळीच सुखे पैशाने मिळत नाहीत. तर ती मिळतात आंतरिक आनंद, प्रेम, वात्सल्य, आणि आत्मसन्मानाने हल्ली मनावरच्या जखमा शारीरिक जखमांपेक्षा वाढल्यात. अगदी अश्वथामाच्या जखमे सारख्या वेदना इतक्या आहेत की त्यामुळे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे.

ह्यावर एकच उपाय आपण करून बघावा. रोज आपल्या आत्म्याच्या आनंदासाठी चांगले चिंतन, मनन, वाचन, चांगली संगती, विचार, सत्संग हेच खरे जीवनातील अध्यात्म आहे. वेगळे काहीच नाही.

आपला आतील देव नक्की काहीतरी देईल ज्यामुळे परमानंद मिळेल. तशीच चांगली कर्मे करण्याचा छंद जडवला पाहिजे. पुजा अर्चा, कुलाचार हे ही त्या बरोबर आलेच. रोज ५ मिनिटे तरी स्वतःला वेळ द्या. शांत मन आणि शांत श्वास हेच आपले ध्यान असते. हळु हळु ते सकारात्मक बोलू लागेल.

आपण कायम कोणाचे ना कोणाचे देणेदार असतो. त्याबद्दल कायम ऋणी राहिले पाहिजेच. सर्वात मुख्य म्हणजे नाते संबंधात दोन्ही बाजूने सोडून देण्यास शिकले पाहिजे. नाही तर जखमेवर खपली कधीच धरली जात नाही.

तुकाराम महाराज म्हणतात, “आनंदाचे डोही, आनंद तरंग “…. जीवन क्षण भंगुर आहे. त्यामुळे काही गोष्टी दोन्ही बाजूने सोडून देणे गरजेचे असते.

ऋणानूबंधातून मुक्त होण्यासाठी दुसऱ्याला माफ करणे आणि धन्यवाद देणे ह्या दोन गोष्टी फार महत्वाचा असतात. प्रत्येकाची आत्मजागृती होणे गरजेचे आहे.
जो पर्यंत आपल्यातील आत्मजागृती होत नाही तो पर्यंत आपल्या अंतरंगातील कस्तुरीचा गंध दरवळणार नाही.
गरज आहे ती सुगंधी मिठीची. आपण दुसरा आनंदी बघायला शिकलो तरच मन निरोगी होईल.

म्हणून परत परत म्हणावेसे वाटते…..

“भले बुरे जे घडुन गेले विसरून जाऊ सारे क्षण हे जरा विसाऊ या वळणावर, ह्या वळणावर”….

शलाका कुलकर्णी

– लेखन : शलाका कुळकर्णी. नेदरलँड्स
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूप छान लेख आहे. आयुष्यातील मृगजळामागे धावता धावता आपण आपल्या मनाचा,आत्म्याचा मूळ गाभाच विसरलो आहोत, पण या विश्वात अजूनही सत्प्रवृत्तीची, तुझ्या सारखी विचार-आचार करणारी अनेक माणसे असल्याने या विश्वाचा तोल सांभाळला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments