आपण प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा करीत असतो. त्या आधीच्या पूर्ण सप्ताहात विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात.
या साऱ्याला पार्श्वभूमी आहे ती १९७१ साली पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धाची. तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाई दल सातत्याने घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही त्यात फारसा फरक पडला नव्हता.
खरे तर १९७१ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानच्या सततच्या कारवायांनी भारताच्या संयमाचा कडेलोट होणेच केवळ बाकी होते. अशा वेळेस युद्धाच्या निर्णयासंदर्भात बोलावलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी खंबीर भूमिका घेत आताचा ऋतू आणि एकूणच परिस्थिती ही आपल्याला परवडणारी नाही, अशी ठाम भूमिका घेतली.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा दरारा इतका होता की, त्यांच्या समोर कोणाचीही बोलण्याची शामत नव्हती, अशा परिस्थितीत भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी सत्य बोलण्याचे धाडस दाखवले.
त्यांनी सीमेवरील हवामान लक्षात घेऊन नोव्हेंबर पर्यंत थांबण्याचा सल्ला दिला, जो मान्य करण्यात आला. तोपर्यंत सैन्याची जुळवाजुळवही व्यवस्थित करता येईल, याची खात्रीही देण्यास ते विसरले नाहीत.
अखेरीस इरेस पेटलेल्या पाकिस्तानने ३ डिसेंबर रोजी ती चूक केलीच. त्यांनी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याच वेळेस भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका या युद्धात सागरतळाला धाडण्याची योजनाही पाकने आखली. मात्र तेच लक्षात घेऊन भारतीय नौदलाने चुकीचे संदेश पाठवून ‘पीएनएस गाझी’ची दिशाभूल केली आणि डाव साधला. भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यात ‘गाझी’ या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यानंतर मात्र ‘आयएनएस विक्रांत’ने बंगालच्या उपसागरात आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले.
विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करून लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुडय़ा त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरून गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तान नौदलाने केलेली नव्हती, किंबहुना तिकडची ताकद पूर्वेकडे वळविण्याचा त्यांचा इरादा होता, पण त्यालाच नौदलाने सुरुंग लावला. ३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली.
नौदलाच्या त्या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये दीर्घकाळ केवळ भारतीय नौदलच सामर्थ्यशाली नौदल म्हणून वावरत होते.
आज भारताचे नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे, ही आपणासर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
