आज जगात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ८० कोटी इतकी आहे. त्यातील जवळपास वीस टक्के म्हणजेच १५ कोटी जेष्ठ नागरिक भारतात आहेत. ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने “जेष्ठ नागरिक प्राधिकरण” स्थापन करावे, अशी सूचना कामगार नेते श्री मारुती विश्वासराव यांनी नुकतीच केली. ते सानपाडा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या “ज्येष्ठ नागरिकांचे संघटन आणि कल्याण” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते.

श्री विश्वासराव पुढे म्हणाले की, ज्या ज्या क्षेत्रातील संघटना प्रभावी असतात, चांगले काम करतात, त्या संघटना, संघटित शक्तीच्या जोरावर आपले प्रश्न मार्गी लावून घेतात. ही वस्तुस्थिती विचारात घेता, महाराष्ट्र शासनाने ज्या प्रमाणे जेष्ठ नागरिक कल्याण महामंडळ स्थापन करण्याचे ठरविले आहे, त्याच धर्तीवर भारत सरकारने राष्ट्रीय जेष्ठ नागरिक प्राधिकरण स्थापन करावे, ही माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी केलेली मागणी अतिशय रास्त असून, तिच्या पूर्ततेसाठी देशभरातील ज्येष्ठ नागरिक संघानी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. आज ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या भारत सरकार आणि संबंधित राज्य सरकारांच्या जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांच्या अटी आणि शर्ती यातही तफावत आहे, इकडे लक्ष वेधून त्यांनी जर वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती जेष्ठ नागरिक ठरते तर काही योजनांच्या लाभांसाठी वयोमर्यादा साठ आहे तर काही योजनांच्या लाभांसाठी वयोमर्यादा पासष्ट आहे, याकडे लक्ष वेधले. तसेच ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अवस्था पाहता, विविध प्रकाराच्या लाभांसाठी त्यांना विविध ठिकाणी जाणे दुरापास्त होते, हे लक्षात घेऊन सर्व सोयीसुविधा त्यांना एका छताखाली उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बोलताना माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने सर्व स्त्री पुरुष जमत असतात, अशा कंपन्या, कारखाने, कार्यालये, व्यापारी यांचे हेतू समान असल्याने त्यांना संघटित करणे सोपे जाते पण प्रत्येक जेष्ठ नागरिकाचे अनुभवाचे क्षेत्र हे वेगवेगळे असल्याने आणि निवृत्ती नंतर प्रत्येकाच्या समस्याही वेगवेगळ्या असल्याने जेष्ठ नागरिकांचे संघटन करणे हे अतिशय आव्हानात्मक पण तितकेच जास्त गरजेचे आहे. आपले सदस्य असलेल्या आणि नसलेल्या ही जेष्ठ नागरिकांना भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळेल ? यासाठी जेष्ठ नागरिकांनी दुवा म्हणून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी सदस्य श्री बळवंतराव पाटील, अभिनेते श्री शिवाजी पाटणे, निवृत्त मनुष्यबळ व्यवस्थापक श्री बापुराव काळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

प्रारंभी संघाचे अध्यक्ष श्री मारुती कदम यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष मारुती गव्हाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन खजिनदार श्री व्ही जी मुखेकर यांनी केले.


या व्याख्यानास ज्येष्ठ स्त्री पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— लेखन : टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
💦 माननीय श्री देवेंद्र जी..
अतिशय महत्वाचा विषय :जेष्ठ नागरिक यांना, शासकीय सुविधाचा लाभ घेतांना अनंत अडचणी येतात, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला.. एकत्र कुटुंब प्रणाली मध्ये, सामुदायिक उत्पन्न धरतात.. मुलांचे उत्पन्न जास्त असतें, नेमके तेच, जेष्ठाना नीट वागणूक देत नाहीत, उलट वाऱ्यावर सोडतात.. अशा वेळी, कमी उत्पन्नाचा दाखला कसा मिळवावा? हा प्रश्न उभा राहतो. आणि परिस्थिती नाजूक होऊन देखील, उपक्रमांचा लाभ घेता येत नाही. अशा जेष्ठ नागरिकांनी दाद कुठे मागावी.. यावर देखील काही उपाय योजना झाली पाहिजे. अशी विनंती मी करतो. फारच छान उपक्रम हाती घेतला आहे. धन्यवाद.. 🙏
जेष्ठ साहित्यिक..
सुभाष कासार, नवी मुंबई..