सृष्टीला नवचैतन्य देवून सर्वांगाने सजवणारा, नटवणारा, नैसर्गिक सौन्दर्याची पखरण उधळवत आगळीवेगळी झळाळी प्राप्त करून देणारा, अन सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या कमानी सर्व बांधवाना पावसाचे पागोळ्या जणू मोत्याच्या माळांमध्ये सकल जनान्सी (सजीवांना) भिजवून मृत्तीकेच्या मृदगंधाने, सुगंधित फुलवेलीनी आसमंत रंगीबेरंगी रंगांची उधळण करणारा सर्व मराठी महिन्यात कौतुक ज्याचे होत असते तो मनभावन श्रावण मास संपेपर्यंत कायम मन्मनी रेंगाळणारा, सर्वांच्या मनात रुंजी घालत रेशीम धारेने तृप्त करणारा, अन् चित्ताला अनामिक ओढ लावणारा, उल्हासित करणारा, साहित्यिक अन् कविवर्य यांच्या अलंकारिक शब्द समूहाने समृद्ध असा गेय अन् प्रेयस श्रावणच्या अनेक गीत संगीतकारांनी श्रवणीय संगीतांनी संगीतबद्ध केलेला अन् सुमधुर आवाजात गायिकेच्या गळयांतून कानसेन यांना तुप्त करत आत्मिक आनंद मनभरून व भरभरून देणारा मनभावन श्रावण असे मनी भासते की हे दिवस आयुष्यातील संपुच नयेत. सकारात्मक ऊर्जेचे दिवस गाण्यांच्या सोबतीने कायम सोबत राहोत असे मला नित्य जाणवते.

श्रावण मासे आगमनाची चाहूल लागता सर्व आसमंतात सृजनेचे धुपारे पसरत नवचैतन्यने वसुंधरा मुदित होत बहरू लागते. वातावरण आल्हाददायी होते. वृक्ष, वेली, फुलापानाना बहर, मोहोर येतो. त्यावर फुलपाखरे बागडतात. मयूर पिसारा फुलवून आनंद व्यक्त करतो, पशुपक्षी किलबिलतात, साऱ्या धरतीवर पर्ण पोपटी शेला पांघरून तृप्ती चे तेज विलोभनीय दुरवर पाहतच राहावेसे वाटते. सकळजनाच्या चित्तवृत्ती फुलून येतात, बळीराजा धनधान्य पिकवून सुखवतो. ऊन पावसाच्या या लपंडाव, पाठशिवणी खेळात आकाशी इंद्रधनुष्य मनमोहक दिसते.

याच श्रावण मासात हिंदू पारंपारिक सणवार यांची रेलचेल असल्याने लेकी, सुना, नववधू, माहेर च्या ओढीने सर्व नातलग, जिवलग भावंड यांना व जन्मदाते यांना भेटण्यास आतूर होतात. सासरी अन् माहेरी, दोन्ही ठिकाणी सण साजरे करतात. गोडाधोडाची रेलचेल, पक्वानंचा आस्वाद घेत तृप्त होतात.

अशा या रंगीत, गंधित, धुंद श्रावण मासात, निसर्गाची पखरण, अन् सुवासाची दरवळ अनुभवत सात्विक वातावरणात व्रत वैकल्ये, ईश्वर आलवणी, भजन पूजन, अन् जपतप यामुळे नैसर्गिक सृजनास नमन करत सकलजन मुदित होत, गुणगुणु लागतात…..
आनंदाचे डोही आनंद तरंग.

— लेखन : सौ. मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800