Friday, February 27, 2026
Homeसाहित्यमराठी भाषा दिन : काही कविता

मराठी भाषा दिन : काही कविता

आज मराठी भाषा दिन आहे. या निमित्ताने काही कविता पुढे सादर करीत आहे.

मर्चंट नेव्हीत मुख्य अभियंता असलेल्या पती समवेत जग भर फिरून आलेल्या वेदवती कुलकर्णी यांची कविता प्रथम देत आहे. न्युज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.

आपण सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

1) माय मराठी

वऱ्हाड बोली, कोकण बोली
आणिक ती ही अहिराणी
माय मराठी लेउन सजली
सोळा बोली गुणखानी ||१||

झाडीबोली, पांचाळी ती
वारली अन् वाडवळी
कातकरी अन् मराठवाडी
शोभसे ही वेल्हाळी ||२||

सामवेदी तशी कोल्हापुरी
ही बंजारा अन् नागरी
कादोडी अन् संगमेश्वरी
तशीच ती ही तंजावरी ||३||

बोलींच्या शोडष कलातुन
मायेचे लावण्य खुले
विधिकन्येच्या चरणावरती
अर्पियली गंधाळ फुले ||४||

बाळ बोधी, देवनागरी
मोडी लिपीच्या आरशात
शब्द-ध्वनींचे अरूप सौष्ठव
सुरुप होतसे साक्षात ||५||

माया करिते, कौतुक करिते
प्रीती भरविते निरंतर
माये मराठी कुशीत तुझीया
तृप्त होत असे मदंतर ||६||

प्रतिक्षणीच्या अस्तित्वाची
पहाट तुझिया पदी उघडे
ऋणात तुझिया सदैव राहो
असेच माझे मन वेडे ||७||

– रचना : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.

2) माय मराठी : अभिजात मराठी

वैविध्याने नटलेल्या माय “मराठी”चा;
शृंगार काय तो वर्णावा?
प्रत्येक त्या प्रचलित शब्दाचा;
मतिथार्त जाणून मग तो उच्चारावा.

महत्त्वाकांक्षी असणे असते भूषण;
हटवादीपणा मात्र निंद्य व्यक्तिमत्वाला,
हुशार असणे कधीही चांगले;
धूर्तपणा घातक सर्वांना.

चौकसपणा फुलवितो ज्ञान;
चिकित्सकपणा गोष्टी अवघड करतो,
बुद्धिमान तो उठून दिसतो;
कपटीपणा नेहमीच नामुष्की आणतो.

उदारपणाने दानधर्म घडतो;
उधळेपणा देशोधडी लावतो,
काटकसरी परिस्थितीत निभावतो;
कंजुशपणा लाज आणतो.

भावनिक माणुसकी जपतो;
हळवेपणा तो खचवून टाकतो.
असामान्य तो चमकून दिसतो;
विक्षिप्तपणा बदनामी करतो.

स्वच्छंदी मन रसिक घडवते;
स्वैराचारी मनमानी करते,
निश्चयी ते ठाम राहते;
हेकट मात्र हटवाद मांडते.

स्वाभिमानी बाणा शोभून दिसतो;
अहंकारी तो उन्मत्त वागतो,
धांदरट असतो भोळा भाबडा;
ढोंगी लबाड अन् खोटा असतो.

सामर्थ्य त्या मराठी भाषेचे;
किती आणि कसे वर्णावे ?
थोरवी कितीही गायली तिची तरी;
शब्द भांडार न संपावे.

अभिमान मला मी मराठी असण्याचा;
माय मराठी आमुची वैभवशाली;
अभिजात दर्जा तिचा, महिमा तिचा गौरवशाली !

— रचना : सौ योगिनी चेतन पंडित. डोंबिवली

3) रसिक मनाची माय मराठी मला आवडे भारी
वृत्त- लवंगलता (८+८+८+४)

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या गर्जत गाजवणारी
रसिक मनाची माय मराठी मला आवडे भारी ||ध्रु||

महानुभावी वारकरी अन् शैव वैष्णवे जमती
संत कवी अन् पंत मंडळी कवने अभंग रचती
ज्ञानेशाची ओवी होउन झरझर पाझरणारी
रसिक मनाची माय मराठी मला आवडे भारी ||१||

संस्कृत, प्राकृत, अपभ्रंशाची गोडी वाढवणारी
शौरसेनि सवे मागधी मूळा साठवणारी
पैशाची सह आंग्ल, फारसी, तुर्की सामवणारी
रसिक मनाची माय मराठी मला आवडे भारी ||२||

लोककलेचे भारुड, फटके, पोवाडे दुमदुमती
गोंधळ, जागर, म्हणी, उखाणे, अंगाई गुणगुणती
जात्यावरच्या ओव्यांमधुनी घरघर घरघरणारी
रसिक मनाची माय मराठी मला आवडे भारी ||३||

वैभवशाली सदा प्रवाही नवोन्मेष तुज पाशी
देवनागरी वळणांमधुनी सदैव विहरत जाशी
अभिजाताच्या अनन्यतेला शिखरावर नेणारी
रसिक मनाची माय मराठी मला आवडे भारी ||४||

— रचना : हेमंत कुलकर्णी. मुलुंड, मुंबई.

4) मराठी सुसंस्कृत..

सन्मान करी सर्वांचा
मायमराठी सुसंस्कृत
नाळ जोडली पुरातन
भाषा भगिनी संस्कृत

जे जे येतीलं संगतीस
ज्ञानप्रवाहांत स्विकृत
अभिजात दर्जा लाभे
सिंहासन हे अधिकृत

समृद्ध शब्दसंपदा ती
कैक गुणांने अलंकृत
सहजसुलभ शिकाया
साधेपणा गं अंगिकृत

उदया आले महापंडित
जिव्हेला केले उपकृत
भाषा जनसामान्यांची
जरी असामान्य प्राकृत

तू आमची बोली झाली
असेलं गतजन्म सुकृत
वाणी संतृप्त ओघवती
लाभलेओसंडून अमृत

समृद्ध ऐश्वर्या पाहवेना
दुस्वासकाहींचाविकृत
आपसूक होणार दास
भाषाकळता सालंकृत

आपण सन्मान राखता
जगतात मिळेल आदृत
अस्मिता हवी अंतर्मना
सन्मान गाजवेलं आहृत

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments