विटाळ हा स्त्रियांचा देहधर्म असल्याने त्याबाबत स्पर्शास्पर्श श्री चक्रधर स्वामी यांना मान्य नव्हते. एकदा उमाइसा विटाळाशी होती म्हणून तिने स्वामींना दुरून नमस्कार केला. स्वामींनी तिच्या कपाळाला आपल्या पायाचा अंगठा लावून म्हटले, “आमच्या अंगठ्याला तुम्ही विटाळ केला आहे. आता हा लोणार तीर्थाला न्यावा लागेल, केदारा न्यावा लागेल, नाहीतर मलीनाथा न्यावा लागेल ,”असे विनोदाने उद्गार काढून विटाळ कल्पनेची निरर्थकता दर्शविली.
श्री चक्रधर स्वामींनी विटाळासारख्या अनिष्ट प्रथेला बाजूला सारण्याचा विचार दिलेला आहे. अशा विटाळाचे कारण देतांना स्वामी म्हणतात. “बाई शरीरात नऊ नाड्या बाहत्तर सांधे आहेत. नऊ नाड्यांमध्ये एक नाडी कृष्णनाडी असते. एक शुक्लनाडी असते, कृष्णाचा विटाळ का धरावा ? शुक्लेचा विटा का होऊ नये, त्याच्यावर काही नाही : कधी एरवी एखादे वेळी इंद्रियाच्या एखाद्या नाडीचा स्त्राव होतो. कधी कृष्णनाडी वाहते तर कधी शुक्लनाडी वाहते, अशा कृष्ण आणि शुक्ल नाडी शरीरात कार्य करतात. तर कृष्ण नाडीतून वाहणाऱ्या स्त्रवाचा विटाळ मानू नये, बाई शरीराला नऊ तारे आहेत, तसे नाकाला शेंबूड येतो, डोळ्याला चिपड येतो, कानाला मळ येतो, तोंडाला थुंका येतो, गुदद्वारातून मळ येतो, असाच या एका धातूचा स्त्राव होतो. याचा विटाळ धरू नये.
वैज्ञानिक दृष्टीने विटाळ मानणे अज्ञानतेचे लक्षण आहे असे सांगून, पूजाविधी, कार्य, ज्ञानचर्चा, यामध्ये स्वामींनी समतेची वागणूक दिली. यावरून स्वामींचा स्त्रीविषयक वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो. स्त्री बाहेर कुठेही वावरली तर तिच्याकडे बोट दाखवून लोक बोलतात म्हणून अशा बोलण्याला भिऊन आपण आपले हित चुकवू नये, असा महिलांच्या सशक्तीकरणाचा उपदेश स्वामींनी केलेला आहे.
एकदा एकाईसा स्वामींजवळ गर्दी पाहून लोक आपल्याला बोलतील म्हणून परत गेली .त्यावेळी सर्वज्ञ म्हणाले : ‘बाई, मुलगी एकासाठी सात पाच लोकांचा सासुरवास सहन करते. मग विश्वाचा पती परमेश्वर त्याच्यासाठी धरणे मांडले असेल तर जगाचा सासूरवास साहावा की:’ यावरून स्त्रियांना निर्भीड व धीट बनविणारी स्वामींची शिकवण स्त्रियांचा सर्वांगीण विकास घडविणारी आहे असे म्हणता येईल.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
