महानुभाविय साहित्याची गुणवैशिष्ट्ये
तेराव्या शतकात मराठी वाङ्ममयाच्या प्रारंभीच एवढा प्रौढ आणि परिपक्व वाड़्मय प्रवाह निर्माण होणे अत्यंत अभिमानास्पद आहे. अंतरीच्या ओलाव्यातून, स्मरणभक्तीच्या प्रवाहातून आलेले हे साहित्य अत्यंत रसरशीत आणि समृद्ध असे झाले आहे. यातील भाषाशैली प्रौढ, गंभीर तर आहेच त्यासोबतच हळुवार, चटकदार संवाद कौशल्याने त्यातील नाट्यमयता प्रभावी ठरते. साधी सोपी निवेदन पद्धती, सुभाषितवजा भाषा, छोटी छोटी वाक्ये, म्हणी, वाक्प्रचार, अभिनव शब्दकळेमुळे बोली भाषेचे सामर्थ्य प्रमाणभाषेसोबत वावरतांना आढळते. कमीत कमी शब्दात अधिक आशय व्यक्त करण्याची विलक्षण पद्धती तर अत्यंत महत्त्वाची आहे. संपूर्ण साहित्य भाषाशास्त्राच्या दृष्टीनेही नामांची, क्रियापदांची निरनिराळी रूपे, ओव्यांची ठेवण, भाषेची ढब ही सर्व वैशिष्ट्ये सर्वसाधारण वाचकाच्या मनाला मोहिनी घालते.
महानुभाविय साहित्याला वस्तुनिष्ठतेमुळे ‘शास्त्र काट्याची कसोटी’ प्राप्त झालेली आहे. शास्त्रलक्षणांनी युक्त असलेल्या या साहित्याची विश्वसनीयता आणि प्रभाव प्रचंड आहे. तत्कालीन सर्वच ग्रंथकार पंडित असल्यामुळे विविध रस अलंकाराने हे साहित्य भरलेले आहे.
महानुभाविय साहित्यिकांची प्रेरणा अध्यात्मिक आहे. परंतु प्रतिभाविलास मात्र अभिजात साहित्यिकांचा आहे. म्हणून या काव्याने शृंगाराचेही कधी वावडे मानले नाही व सर्वज्ञांच्या निवृत्तीपर तत्त्वज्ञानाची
बांधिलकीही कधी सोडली नाही. विवेकाचा धर्मविचार भक्तीरसातून श्रोत्यांसमोर उभा करण्याची जिद्द ठेवणाऱ्या कवींचा आत्मविश्वास अत्यंत दांडगा आहे.
एकूणच शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, आणि भावसौंदर्यामुळे महानुभाविय साहित्य विविध वाड़्मयीन गुणवैशिष्ट्यातून अभिजात साहित्याच्याही पुढे स्वतःचा वैभवशाली आदर्श निर्माण करते, यात शंका नाही.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800