“बुटीबाई“
आई (माझ्या सासूबाई) त्यांच्या एके काळच्या एकत्र कुटुंबाविषयी नेहमीच मला सांगत. सांगताना अगदी रंगून जात. त्यांच्या सांगण्यामध्ये अनेक भावनांचा ओघ असायचा. भांडारकर कुटुंबांच्या ज्ञात वैभवाविषयी बोलताना त्या अभिमानाने फुलून जायच्या. कधी त्यांच्या हकीकतीत आनंद अभिमानासोबतही काहीशा यातना, वेदनाही मला जाणवत. कधी समाधान, संतोष तर कधी तितकाच रोषही. त्यांच्या मुखातून कुटुंबाच्या या सुरस कथा ऐकताना मला मात्र वाटायचं की एक जाडजूड अशी कादंबरीच आपण वाचत आहोत. अनेक व्यक्ती, अनेक रंगरूपांच्या, स्वभावांच्या पात्रांभोवती सारंच काही पद्धतशीरपणे गुंफलेलं असं एक भलंमोठं कथानक मला त्यात जाणवायचं.
सासूबाईंच्या मनात तर भावनांचं मोहोळ उठलेलं असायचं. त्यांच्या मुखी अनेकांची नावे असत त्यात त्यांच्या जावा, नणंदा, दीर, त्यांची मुलं, भाऊ, वहिनी, बहिणी, भाचे, अनेक माधुकरे, शिक्षणासाठी, नोकरीनिमीत्त राहणारे अशा विविध व्यक्ती असत. तसं पाहिलं तर मी कुटुंबातल्या अनेकांना भेटलेली नव्हते. अगदी आजही मला कित्येक अनोळखीच आहेत. शिवाय कधीतरी झालेली ओळख मनात असली तरी या व्यक्तीशी माझं किंवा विलासचं नेमकं नातं काय याविषयी मी नेहमीच घोटाळ्यात पडते.
समोरची व्यक्ती मला विचारत असते, ”अग ! तू आबाची सून ना ? विलासची बायको ना ?”
समोरच्या व्यक्तीचा जिव्हाळा जाणवत असला तरी आपण यांना ओळखले नाही म्हणून होणारा माझा त्यावेळचा चेहरा जसाचा तसा टिपणं कुठल्याही प्रख्यात छायाचित्रकारालाही जमणं केवळ अशक्य !
पण कधी कधी एखादी व्यक्ती मात्र माझ्या मनात रेंगाळायची. उगीचच मला त्या व्यक्तीबद्दल प्रचंड कुतूहुल वाटायचं. त्यातलं एक नाव म्हणजे “बुटी बाई” आईंच्या बोलण्यात “बुटी बाईंचा” बऱ्याच वेळा उल्लेख असायचा. आईंचं एक मात्र असायचं की त्या कुणाही विषयी बोलताना अनादर व्यक्त करायच्या नाहीत पण बऱ्याच वेळा त्यांच्या मनात असलेला एखादा आकस मात्र हळूच सांडायचा.

माझं लग्न होऊन फार दिवस नव्हते झाले. विलास व्यवसायाच्या निमित्ताने जळगाव अमळनेर अपडाऊन करायचा. मी नाईलाजाने माझी “सिकलीव्ह” वाढवत ठेवायची आणि अमळनेरस्थित आमच्या कुटुंबात नव्याने सारीच नाती जोडण्याचा मनापासून प्रयत्न करायचे. प्रचंड मोठ्या घरात कधीकधी तर सारीच माणसं कुठे ना कुठे विखुरलेली असायची. अशावेळी मी कुठेतरी अधांतरी एखादा कोपरा शोधून एकटीच काहीतरी वाचत बसायची. किचन मधून पायऱ्या उतरून दिवाणखान्यात जाताना लागणाऱ्या एका चौकात एक ऐसपैस लाकडाचा सुंदर बाक होता आणि त्या बाकावर कधी रिकामं, कधी हलकंफुलकंं वाचन करत बसायला मला खूप आवडायचं. अशीच एक दिवस मी बाकावर बसलेली असताना एक अगदीच छोटीशी आकृती थेट बैठकीच्या खोलीतून तुरुतुरु स्वयंपाक घरापर्यंत आली आणि कुणीच नाही घरात समजून तशीच तुरुतुरु घरातून निघूनही गेली. माझ्याकडे त्या आकृतीने ढुंकून पाहिलंही नाही. जेमतेम तीन फुटाची ती आकृती पाहून मी किंचित गोंधळले. गोंधळ अशासाठी होता की ज्या पद्धतीने ती व्यक्ती आली आणि गेली म्हणून. मनाशी अंदाज लावत असतानाच माझ्या मनात एकदम तेच नाव आले.. “बुटीबाई” नक्कीच “बुटीबाई”
आई जेव्हा वरच्या मजल्यावरून खाली आल्या तेव्हा त्यांनी मला सहज विचारले, ”कुणी आलं होतं का ग ?”
मी पटकन म्हणाले ! ”बुटीबाई”
आईंना त्या क्षणी मात्र माझं हे “बुटीबाई” म्हणून संबोधणं आवडलं नसावं. त्या जरा फटकारूनच मला म्हणाल्या, ”अगं ! त्या सर्वात थोरल्या सासूबाई आहेत तुझ्या. मानानं, आदराने उच्चार करावा की.”
चुकलं होतं माझं ! मान्य आहे मला पण याच “बुटीबाईं” विषयी आईंच्या मनात सूक्ष्मपणे लपून बसलेला कधीतरीचा राग त्यांनी कित्येकदा मला सांगितला होता की. तरीही माझ्याकडून नकळत का होईना “बुटीबाई” विषयीच्या उच्चारात असा अनादरी मिस्कीलपणा असावा हे मात्र त्यांना आवडले नव्हते.
“समझनेवालों को इशारा काफी होता है!” अशी जरी माझी अवस्था तेव्हा झाली असली तरी मला प्रकर्षाने एक जाणवलं होतं की आईंसारख्या स्त्रियांच्या ठायी कुटुंबाविषयी किती आपलेपणा होता! कुटुंब धरून राहणं, कुटुंब टिकवणं, माजघरातले वाद शक्यतो ओसरीवर न आणता नाती दुभंगू नयेत म्हणून धडपडणं हे त्या काळातल्या स्त्रियांना कसं जमलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर जेव्हा मी “बुटीबई” नावाची एक व्यक्ती त्रयस्थपणे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र माझ्या मनात दया, करुणा, काहीसे अन्यायी ओघळ टपटपले.

पाच भावांचं हे कुटुंब. आप्पा, नाना, बाबा, अण्णा आणि आबा. (आबा- माझे सासरे) आबा सर्वात धाकटे. आप्पा, नाना मोठे पण बाबा, अण्णा आणि आबांचे सावत्रभाऊ. आप्पा सर्वात मोठे. संयुक्त हिंदू परिवारातले कर्ता करविता आणि “बुटीबाई” हे आप्पांचं अर्धांग. लग्न लहानपणीच, नकळत्या वयात जमलेलं आणि झालेलंही.
काळाबरोबर आप्पांचं एक भव्य पहाडी व्यक्तिमत्व विकसित झालं. आप्पांची नजरेत भरणारी उंची आणि जेमतेम कमरेपर्यंत त्यांच्या या अर्धांगिनीचं अस्तित्व म्हणून “बुटीबाई” हेच नाव त्यांच्या “लक्ष्मी” या मूळ नावापेक्षा प्रचलित झालं असावं. अर्थात काहीही असलं तरी “बुटीबाई”ने तिचं स्त्रीत्व सिद्ध केलं होतं. तिची कूस भरली, तिला मातृत्व लाभलं. तिने वंशासाठी दिवे ही दिले पण एक असतो शरीरधर्म आणि एक असते अंतर्मनातली ओढ. आप्पांनी दुसरा विवाह करून ही दरी सांधली. मला माहीत नाही हे सारं त्यावेळी “बुटीबाई”ने कुठल्या मनोवस्थेत स्वीकारलं असेल. एक असहाय्यता, एक नाईलाज, समाजाचं भय की स्वीकृत समाजरीत, विरोधाची शस्त्रंच हाती नाहीत म्हणून नि:शस्त्र शरणागती ?
पण ते काहीही असलं तरी “बुटीबाई”ने कुटुंबातलं तिचं त्या वेळेचं संयुक्त कुटुंबातील “फर्स्ट लेडी” हे कायदेशीर पद मात्र टिकवलं होतं. त्या पदाच्या अनुशंगाने एक प्रकारचं कुटुंबातील समस्त स्त्री वर्गावर वर्चस्व गाजवण्याचं शस्त्र मात्र तिने हातातून सोडलं नव्हतं आणि याबाबतीत आप्पा तिच्या वाटेत गेलेच नसावेत. हा त्यांचा मोठेपणा की त्यांना वाटणारा अपराधीपणा हे सांगता येणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर आणखी एक स्त्री व्यक्तीमत्वही तितक्याच समर्थपणे नकळत उजळलं जिने “बुटीबाई”च्या हक्कावर कधीच गदा आणली नाही. ती व्यक्ती म्हणजे आप्पांची दुसरी पत्नी सीतामाई. सीतामाईं बद्दल मात्र आई भरभरून बोलायच्या.

“एक दिवस चुलीजवळून उठवलंच की त्यांनी मला. म्हणाल्या, ”अगं जा तुझ्या बाळाला आधी पदराखाली घे, चुलीजवळचं काय होतच राहील गं माय”, माझ्या सासूबाईंनी सांगितलेल्या अशा कितीतरी कथा आज जेव्हा मला आठवतात तेव्हा माझं मन संभ्रमित होतं. कधीही न अनुभवलेल्या एका वेगळ्याच काळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या साऱ्या स्त्रिया मग “बुटीबाई” असो, सीतामाई असो किंवा माझ्या सासुबाई असोत कोण चूक कोण बरोबर हे कसं ठरवायचं ?
कदाचित मी लिहिलेलं हे सगळं जर विलासने वाचलं तर तो एखादी टिपणी अजूनही देईल. घटनांचा साक्षीदार म्हणून म्हणेल, ”माझी आई कधीच कुणाशी भांडली नाही” पण एक दिवस साखर संपली असताना “बुटीबाई”ने तिला ती नाकारली. म्हणाली, ”परवाच तर डबाभर साखर तुला दिली होती ना ? इतक्यात कशी संपली ?” आई म्हणून दुखावली. अगं ! भांडारकरांच्या घरात साखरेची काही कमतरता होती का ?
नक्कीच नव्हती. पण स्त्री मनाला जाणवणार्या कमतरता, उणीवा हा एक महान संशोधनाचा विषय आहे हेच खरं…
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आठवणींचा कोनाडा तुमच्या शब्दांनी उजळून निघाला !