“माझं पार्ल्यातलं घर”
22 मे 1979 ला आमचं सांगलीला लग्न झालं. दहा-बारा दिवस सांगलीतच सासरी घरी राहिलो. तिथे सत्यनारायण, गोंधळ वगैरे सर्व कुलाचार पार पडले. तिथून पाच जूनला मुंबईला आलो.
पार्ल्यातलं घर हेच माझं खरं घर !
आता नवं घर, नवं गाव, नवं आयुष्य सुरू झालं.
मुंबईला घरी सासूबाई, सासरे, माझी धाकटी नणंद, शिकायला राहिलेला शाळेतला चुलत दीर आणि आम्ही दोघे अशी मंडळी होतो.
सासुबाईंनी घरी सत्यनारायण केला. आजूबाजूची, शेजारची तसेच नात्यातली बरीच मंडळी आली होती. नव्या ओळखी होत होत्या.
माझ्या सासूबाई फार प्रेमळ होत्या. त्यांचं माहेरचं नाव शांता आणि सासरचं सुमती ! नावाप्रमाणेच त्या फार शांत आणि सात्विक होत्या.
त्यांना घरी सगळेच वहिनी म्हणायचे, अगदी त्यांची मुलं सुद्धा !
मी त्यांना आई म्हटलं तर म्हणाल्या, “अगं सगळेच मला वहिनी म्हणतात. त्यामुळे तू पण वहिनीच म्हण बाई.”
सासूबाई दिसायला सुरेख, टपोरे भावदर्शी डोळे, किंचित स्थूल नीटस बांधा आणि गुडघ्यापर्यंत लांबसडक काळेभोर केस ! तळहाताएवढी रुंद, गुडघ्याच्या खाली पोहोचणारी लांबसडक वेणी, त्यावर एखादं शेवंतीचे किंवा ॲस्टरचं फूल खवलेलं असायचं. नऊवारी साडी नेसायच्या. ती पण अगदी रेखीव.
माझ्यावर त्यांनी अपरंपार प्रेम केलं. अगदी आईची माया दिली.त्या सुगरण तर होत्याच, पण कमालीच्या टापटीप आणि व्यवस्थित असायच्या. त्यांनी कधीही आवाज चढवला नाही. टोचून बोलणं, टोमणे मारणं, अधिकार गाजवणं हे त्यांनी आयुष्यात कधीच केलं नाही.कोणाबद्दल तक्रार नाही की कोणाची निंदाही नाही.खरोखर त्या आदर्श सासू होत्या.
सासरे ही शांत प्रेमळ होते. एस.टी. महामंडळात नोकरीला होते.एस् टी कामगारांच्या हितासाठी लढणारे कामगार चळवळीचे नेते होते.त्यांनी दिलेल्या लढ्याने कामगारांना भरपूर बोनस मिळाला. त्यांचं वाचन, व्यासंग प्रचंड होता. घरी सगळेच त्यांना दादा म्हणत. मित्रमंडळीत ते बंडोपंत या नावाने प्रसिद्ध होते.आमच्या लग्नानंतर चारच महिन्यांनी ते रिटायर झाले.
वहिनी स्वत: स्वयंपाक करायच्या. हाताला उत्तम चव होती. माझी मदतीसाठी मध्येमध्ये लुडबुड सुरू असायची.
माझी खरी गट्टी जमली ती धाकट्या नणंदेशी….. वृंदाशी !
ती माझ्यापेक्षा तीन-चार महिन्यांनी लहान,त्यामुळे दोघी अगदी बरोबरीच्या.
ती आणि मी एका क्षणात खरोखर जिवलग मैत्रिणीच झालो…. soul mates.
नणंद-भावजईचं असं इतकं प्रेमाचं नातं किती जणींच्या वाट्याला येत असेल ? खरोखर दृष्ट लागण्यासारखं आमचं नातं. कधी कधी माहेरच्या आठवणीने मला रडू यायचं. वहिनी, वृंदा समजूत घालायच्या.
वृंदाची नवीन नोकरी नुकतीच सुरू झाली होती.तिच्या मैत्रिणी माझ्या ही मैत्रिणी झाल्या. ती ऑफिस मधून कधी येणार याची मी वाट बघत राहायची. ती आल्यावर आम्ही दोघं तिला घेऊनच बाहेर फिरायला जायचो. “तुम्ही दोघे जा ना, नवं लग्न झालंय तुमचं.” तिचा आग्रह असायचा. पण तिला सोडून कधी जाववलंच नाही.
भाजी आणायला मार्केटमध्ये जायचं. भाजी राहिली बाजूला. प्रथम मार्केटमध्ये शर्मा भेळपुरी वाल्याकडे आम्ही दोघी रोज रतिबाने शेवपुरी किंवा पाणीपुरी खायचो. मुकुंदांना खायला नको असायचं. ते शांतपणे दुकाना बाहेर उभे असायचे. ते खाऊन झालं की एकमेकींना सांगायचो की “घरी जाऊन चाट खाल्लेले वहिनीला सांगायचं नाही. कारण रात्री नीट जेवलो नाही तर वहिनी रागवेल.” आणि दोघीही रात्री परत व्यवस्थित जेवायचो. ते वयच तसं होतं !
शेजारची माणसं पण छान, प्रेमळ होती. नवी सून म्हणून कौतुकाने गप्पा मारायची. अगदी मजेत, आनंदात दिवस जात होते.
मुकुंदांचा चीफ इंजिनियरच्या शेवटच्या परीक्षेचा एक लहानसा भाग राहिला होता. त्याचा त्यांनी अभ्यास सुरू होता… (असं ते म्हणायचे !) दुपारी मस्त झोप काढायचे. रात्री जागून अभ्यास करण्यासाठी चहा प्यायला हवा म्हणून आमच्या बेडरूम मध्ये चहाचं साहित्य… चहा, साखर, दूध, छोटी पातेली, स्टोव्ह असं सगळं आणून ठेवायचं. रात्री बाराला मला चहा करायला लावायचे तो प्यायचा, मग अर्धा तास अभ्यास करत असावेत आणि परत झोपायचे. त्यांच्या अभ्यासाची ही भन्नाट पद्धत बघून मला तर टेन्शनच यायचं. मी “आहो जरा अभ्यास करा की” म्हटलं तर मोठ्या मिश्किलपणे मला त्यांनी दोन महामंत्र सांगितले.
एक म्हणजे देव दयाळू असतो. त्यामुळे आपण पास होतो
आणि दुसरा मंत्र म्हणजे
Don’t hope for miracles, rely upon them.
मी मनातच म्हटलं, “डोंबल ! एवढ्याशा अभ्यासाने कसं काय पास होता येतं ?” आम्ही आपले मनातच म्हणायचे.
पण मुकुंदचा आपल्या तत्त्वावर इतका भक्कम विश्वास होता की देवाच्या दयाळूपणाने ते मिरॅकल घडलंच.
जूनमध्ये ठरलेल्या तारखेला ते परीक्षेला गेले. ही परीक्षा अवघडच असते म्हणे. लेखी आणि oral exam हे सर्व असतं. तुम्ही लिहिलेले, तपासलेले पेपर समोर ठेवूनच प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. काही वेळेला oral exam दीड दोन तास पण घेतली जाते. प्रचंड मोठं जहाज, त्यातली मशीनरी, त्यातली माणसं, त्यात भरलेला कार्गो अशा अनेक गोष्टींची जबाबदारी पेलायला समोरचा इंजिनियर त्याचं इंजीनियरिंगचं ज्ञान, तसेच शारीरिक आणि मानसिक अशा सर्व दृष्टीने सक्षमच असावा लागतो. परीक्षेचा निकाल ताबडतोब तोंडावर सांगितलं जातो.
मुकुंद परीक्षेला गेले. माझा जीव दिवसभर टांगणीला लागला होता. संध्याकाळी ते परत घरी आले ते चीफ इंजिनियरचं qualification आणि certificate घेऊनच !
मुकुंद चीफ इंजिनियरची परीक्षा उत्तम तऱ्हेने पास झाले होते. घरी आनंदाचा जल्लोष उडाला. पेढे आणले.सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, माझे आई बाबा भावंडे यांचे अभिनंदनाचे फोन आले. Marine engineering मधलं शीपवर काम करण्यासाठी highest qualification मुकुंदनी मिळवलं होतं.
त्यानंतर बंगलोर म्हैसूरला हनिमून, सांगलीमध्ये सासरी आणि माहेरी मंगळागौरी वगैरे करून आम्ही मुंबईला परत आलो.
मुकुंदानी परीक्षा, लग्न यासाठी बरीच रजा साठवली होती. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट घेणं, माझा पासपोर्ट तयार करून घेणे हे सर्व करून झालं.
आता मात्र जहाज जॉईन करायचं होतं. त्यावेळी मुकुंद मोगल लाईन या Shipping company मध्ये काम करत होते.
त्यांनी ऑफिसला ready to join the ship असं कळवलं होतं. आता फक्त ऑफिस कडून शिप जॉईन करण्यासाठी येणाऱ्या मेसेजची वाट पहात होतो.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ.☎️ 9869484800

अगदी ओघवत्या शैलीत छान लिहिलयसं
खूप छान वाटलं प्रज्ञा तुझ्या लेखाचा हा ही भाग वाचून. वहिनींचे वर्णन तू हुबेहूब केलेस. फार गोड होत्या त्या 🙏! पुढचा लेख वाचायची उत्सुकता वाढली आहे.