Saturday, July 12, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : 25

मी वाचलेलं पुस्तक : 25

“विचार नियम-द पाँवर आँफ हॅपी थाँट्स”

“विचार नियम-द पाँवर आँफ हॅपी थाँट्स” या पुस्तकाचा एक कोटी इतका खप झाला असल्याचे समजल्यावरून मी नुकतीच 12 वी आवृत्ती विकत घेतली.

“शोध स्वत्ःचा” या बेस्ट सेलर पुस्तकाचे रचनाकार श्री सरश्री यांचे हे पुस्तक आहे. त्यांचे व्यक्तिमत्व विकासावरचे “‘आत्मविश्वास आणि आत्मबळ” हे पुस्तक मी यापूर्वीच वाचले असल्याने वरील “विचार नियम- द पॉवर ऑफ हॅपी थाँट” पुस्तक उत्सुकतेने वाचून काढले. मला ते अतिशय आवडले !

आपल्या सर्वांनाच संपन्न, समृध्द जीवनाचा आस्वाद घ्यायचा असतो. शिवाय प्रत्येकाचे नातेसंबंधांवर गोड असा आपलेपणा हवा असतो. आर्थिक स्तरावर स्वातंत्र्य आणि उत्तम स्वास्थ्य या गोष्टी आपणा सर्वांनाच हव्या असतात. प्रत्येक काम रचनात्मक पध्दतीने करून अधिकाधिक कार्यक्षम बनावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु या गोष्टी मिळविण्यासाठी आपण आपली ‘आंतरिक शांती’ हरवून बसतो. या दोन्ही गोष्टी एकाचवेळी प्राप्त करण्याच्यादृष्टीने या पुस्तकाची निश्चितच मदत होईल असे माझे तरी मत झाले आहे.

या पुस्तकातून आपणास जीवनात अंतर्गत व अंतर्बाह्य ताळमेळ साधता येण्याच्या दृष्टीने शांत, स्थिर, जीवनाचा आनंद घेता येऊ शकतो, जी आपली मुळ अवस्था आहे त्यावर विचारापलीकडे जाऊन आपलं खरं ‘स्व’रुप जाणता येण्यास मदत होते. हे विचार नियमांना जीवनात प्रत्यक्ष अंगिकारले तर आपण सर्वोच्च शक्यतांप्रत पोहचू शकतो, असा रचनाकारांचा दावा आहे.

विचारसूत्र 16 अध्यायात असून मौनायामात 11 मंत्रांची विभागणी करून आनंद जीवनासाठी योगाचा उपयोग कसा करावा यासंबंधीचे स्वतंत्र मार्गदर्शन केले आहे.

विचारसूत्रात विश्वात कोणतीही माहिती भौतिक रुपात निर्माण होण्याआधी तिची निर्मिती वैचारिक स्तरावर कशी होते याचे लेखक सरश्री यांनी सोप्या भाषेत विवेचन केले आहे.जे विचार होश आणि जोशमध्ये आपण करतो तेच वास्तवात बदलता येतात आणि अचानक आपल्या हव्या असणाऱ्या सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून नको असणा-या नकारात्मक गोष्टी कडे दुर्लक्ष करण्या संदर्भात अनेक अनुभव देखील सांगितले आहेत.

आपल्याला जग जसे दिसतं तसे आपले विचार असतात. आपल्यातील विचार, भाव,वाणी,आणि क्रिया यांच्यात एकरूपता आणण्यास आपल्यात सर्वोच्च शक्यता प्रकट होतात असेही विचारसूत्र विभागात सांगितले गेले असून काही प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत.

मौनायाम विभागात प्रेम, आनंद, करुणा, विपुलता, आणि सर्जनशीलता हे गुण मिळवून आपण आविष्कृत होऊ शकतो असा हितोपदेशही केला आहे.

आजवर 30 लाखाहून अधिक लोकांनी विचारांशी संबंधीत शक्तीशाली विचार नियम आणि मंत्राद्वारे आंतरिक शांती आणि यश प्राप्त केले आहे असेही या पुस्तकात पटवून दिले गेले आहे.

माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्या पत्नी श्रीमती गुरुशरण कौर, दलाई लामा, योगाचार्य अयंगार, वैज्ञानिक डॉ विजय भाटकर, चित्रपट सुपरस्टार शाहरुख खान, सुरेश ओबेरॉय, गायक अनुप जलोटा यांचे तसेच ‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्राचे अभिप्राय देखील पुस्तकात नमूद केले आहेत.

इच्छापूर्तीचा कल्पवृक्ष असलेले आपल्या यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनाला आकार देणारे हे पुस्तक आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला आंतरिक शांती, आनंद, प्रेम आणि पूर्णत्व देण्याच्या दृष्टीने प्रेरणा देणारे हे आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही !

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments